खाण व्यवसायाची चौकशी करा
By Admin | Published: October 23, 2015 11:27 PM2015-10-23T23:27:57+5:302015-10-24T00:30:13+5:30
सखाराम गवस : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; उपोषणाचा इशारा
सिंधुदुर्गनगरी : सावंतवाडी तालुक्यातील नेतर्डे गावात कोणतीही शासकीय परवानगी व सहहिस्सेदारांची संमती न घेता चिरेखाण व्यवसाय राजरोसपणे चालू आहे. संबंधितांची चौकशी करून तत्काळ कारवाई करावी. अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सहहिस्सेदारांना घेऊन उपोषण करणार असल्याचे निवेदन मंगळवारी नेतर्डे येथील सखाराम चंद्रकांत गवस यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
सावंतवाडी तालुक्यातील नेतर्डे येथील सखाराम चंद्रकांत गवस यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांना निवेदन दिले असून, त्यात नेतर्डे गावातील सर्व्हे नं. ४४ मध्ये ३५० भागीदार शेतकऱ्यांची मालकी आहे. या सर्व्हे नंबरमध्ये गेली पाच वर्षे कोणत्याही सहहिस्सेदाराची संमती किंवा कुलअखत्यारपत्र न घेता बेकायदेशीररित्या चिरेखाण व्यवसाय सुरु आहे. त्यांनी याकरीता महसूल खात्याची परवानगी घेतलेली नाही आणि जरी घेतलेली असेल तरी ३५० भागीदार (हिस्सेदार) असतानाही परवानगी कशी देण्यात आली? या खाणी चालू असल्याचे मंडल अधिकारी व तलाठी तसेच तहसीलदार कार्यालय यांना माहिती असूनही डोळेझाक कशासाठी केली जात आहे? जर महसूल खात्याने रेती ट्रक किंवा चिऱ्याचा ट्रक पकडला तर हजारो रुपये दंड होतो. मग नेतर्डे गावात दिवसरात्र चालू असलेल्या चिरेखाणी व बेकायदेशीर चिरे वाहतूक याला कोणाचे अभय आहे? हे महसूल खात्याचे नुकसान नाही का? असे सवाल उपस्थित केले आहेत. तसेच संबंधित चिरेखाण व्यावसायिकांना याबाबत विचारले असता धमकावले जात आहे. त्यांचे परराज्यातील कामगार रात्री - अपरात्री गावात फिरत असल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या बेकायदेशीर चिरेखाणी पहाटे ३ ते रात्री १२ वाजेपर्यंत सुरु असतात. मात्र, कोणताही वरिष्ठ अधिकारी याठिकाणी भेट देणार असल्यास त्यांना तलाठी किंवा अन्य कार्यालयाकडून आगाऊ माहिती दिली जाते. त्यामुळे तेवढ्या कालावधीपुरत्या खाणी बंद ठेवल्या जातात.
सर्व्हे नं. ४४/१ अ हा सामाईक असल्याने व गेली कित्येक वर्षे हा बेकायदेशीर चिरेखाण व्यवसाय चालू असल्याने कोट्यवधींचा दंड झाल्यास तो आम्हा सहहिस्सेदारांना भरणे परवडणारे नाही. तरी या बेकायदेशीर चिरेखाणी व्यवसायावर तत्काळ कारवाई करून दंडासहित रॉयल्टी वसूल करावी. तसे न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचा इशारा सखाराम गवस यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)
नेतर्डे येथे कोणतीही शासकीय परवानगी व सहहिस्सेदारांची संमती नसताना चिरेखाण व्यवसाय सुरू असल्याची तक्रार करण्यात आली आहे. या विरोधात सखाराम गवस यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे धाव घेतली आहे.
सावंतवाडी तालुक्यातील नेतर्डेै येथे व्यवसाय सुरू.
३५० हिस्सेदारांची परवानगी घेतलेली नाही.
दंडासहित रॉयल्टी वसूल करण्याची मागणी.
पहाटेपासून व्यवसाय सुरू.