‘त्या’ अधिकाऱ्याची चौकशी करा
By admin | Published: August 13, 2015 11:12 PM2015-08-13T23:12:09+5:302015-08-13T23:12:09+5:30
सभापतींचे आदेश : वैभववाडी पंचायत समिती कृषी विभागात संशयास्पद कामे
सिंधुदुर्गनगरी : शेतकरी मासिकाच्या रकमेची पावती शेतकऱ्यांना दिली जात नाही. त्यामुळे मागील ३ वर्षांपासून या पैशांबाबत संशय वाटतो असा आरोप करत चुकीच्या पद्धतीने काम करणाऱ्या वैभववाडी पंचायत समितीच्या कृषी विभागाच्या विस्तार अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य दिलीप रावराणे यांनी केली. दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशीचे आदेश उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी सभेत दिले.जिल्हा परिषद कृषी समितीची सभा उपाध्यक्ष तथा कृषी समिती सभापती रणजित देसाई यांच्या अध्यक्षतेखाली येथील बॅ. नाथ पै समिती सभागृहात पार पडली. यावेळी दिलीप रावराणे, सोनाली घाडीगांवकर, योगिता परब, समिती सचिव तथा जिल्हा कृषी अधिकारी एस. एन. म्हेत्रे, अधिकारी, खातेप्रमुख उपस्थित होते.
जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांकडून (लाभार्थ्यांकडून) प्रत्येकी २५० रुपये शेतकरी मासिकासाठी घेतले जातात. या मासिकांच्या प्रति काही ठराविक म्हणजेच हाताच्या बोटावर मोजण्याइतपत शेतकऱ्यांना देण्यात येतात. उर्वरित शेकडो शेतकऱ्यांना पैसे देऊनही मासिक पावती मिळत नाही. तसेच पैसे दिल्याची पावतीही दिली जात नसल्याने मागील ३ वर्षांपासून या पैशाबाबत घोळ सुरु असल्याचा आरोप दिलीप रावराणे यांनी केला. तसेच वैभववाडीचे कृषी विस्तार अधिकारी हे चुकीच्या पद्धतीने काम करत असल्याचा आरोप करत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झालीच पाहिजे अशी मागणी केली. त्यानुसार या मुद्यावर बोलताना सभापती रणजित देसाई यांनी रावराणे यांची मागणी मान्य करत चौकशीचे आदेश दिले.अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची ३७ कोटी रुपयांची नुकसान भरपाई प्रशासनाकडे प्राप्त आहे. मात्र वितरणाबाबत होत असलेल्या दिरंगाईमुळे सभापतींनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ती लवकरात लवकर वितरीत करावी. तसेच एकाच सातबारावर अनेक भागदारांची नावे असल्यानेही अनेक शेतकरी या नुकसान भरपाईपासून वंचित रहात आहेत. यापुढे अन्य भागधारकांनी हमीपत्र दिल्यास संबंधित लाभधारकास या नुकसान भरपाईचा लाभ देण्याची मागणी करणारा ठरावही करण्यात आला. (प्रतिनिधी)
अखेर पाणलोट सचिवांचे मानधन मिळाले
पाणलोट सचिवांना मागील ९ महिन्यांपासून मानधन दिले गेले नसल्याबाबतची बाब सभागृहासमोर आली होती. याची गंभीर दखल घेत उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी पाणलोट सचिवांचे थकीत ९ महिन्यांचे मानधन जमा करण्याचे आदेश दिल्यानंतर ते मानधन संबंधित सचिवांना अदा करण्यात आले.
शेतीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव
शेतीवर पडलेला करपा, अळी व अन्य रोगांवरील किटकनाशक उपलब्धता व फवारणीबाबतची माहिती ग्रामसेवकांमार्फत शेतकऱ्यांना द्यावी तसेच ग्रामपंचायत स्तरावर औषधे उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.