बोगस पदवीधर शिक्षकांची चौकशी गुलदस्त्यात
By admin | Published: February 9, 2015 01:19 AM2015-02-09T01:19:07+5:302015-02-09T01:21:59+5:30
मात्र, कर्नाटक, उत्तरप्रदेश, बिहार, दिल्ली व अन्य राज्यातील मुक्त विद्यापीठातून हजारो लोकांनी पदव्या मिळविल्या आहेत.
रत्नागिरी : अलाहाबाद विद्यापीठासह परराज्यातील इतर विद्यापीठांमधून बोगस पदवी धारण केलेल्या शिक्षकांची चौकशी करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीने घेतला होता. तीन महिन्यांपेक्षा जास्त दिवस उलटले तरी अद्याप या चौकशीबाबत काहीही झालेले नाही. ही चौकशी बासनात गुंडाळल्याची चर्चा सध्या शैक्षणिक क्षेत्रात सुरु आहे.
शिक्षण अर्धवट राहिलेल्या अनेक जणांनी मुक्त विद्यापीठातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. राज्यातील मुंबई मुक्त विद्यापीठ, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ येथून अनेक पदवीधर बाहेर पडत आहेत. मात्र, कर्नाटक, उत्तरप्रदेश, बिहार, दिल्ली व अन्य राज्यातील मुक्त विद्यापीठातून हजारो लोकांनी पदव्या मिळविल्या आहेत.
इतर शासकीय कार्यालयांमध्ये नोकऱ्या करणारे आणि जिल्हा परिषदेतील काही प्राथमिक शिक्षक उत्तर प्रदेशातील अलाहबाद मुक्त विद्यापीठातून पदव्या धारण करुन त्याद्वारे पदोन्नती मिळविण्यासाठी धडपड करीत होते. मात्र, मागील चार-पाच वर्षांत अलाहबाद मुक्त विद्यापीठातून पदवी मिळवलेल्या शिक्षकांना शिक्षण विभागाने पदोन्नती दिली होती. त्यानंतर अलाहबाद मुक्त विद्यापीठातून पदवी मिळविलेल्या प्राथमिक शिक्षकांबद्दल जिल्ह्यातील काही शिक्षकांनीच पदवी बोगस असल्याबाबत शिक्षण विभागाकडे तक्रारी केल्या आहेत. या तक्रारींची दखल उशिरा का होईना, शिक्षण विभागाने घेतली होती.
शिक्षण समितीचे तत्कालीन सभापती सतीश शेवडे यांच्या कालावधीत अलाहाबाद विद्यापीठातून पदवी धारण केलेल्या पदवीधर शिक्षकांची पदोन्नती नाकारण्यात आली होती. त्यामुळे अशा प्रकारे पदवी मिळवलेल्या शिक्षकांना पदोन्नती नाकारण्यात आली होती. याप्रकरणी शिक्षण समितीच्या सभेत चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे अलाहाबाद विद्यापीठाची पदवी धारण केलेल्या शिक्षकांचे धाबे दणाणले होते. शिक्षण समितीच्या चौकशीच्या निर्णयानंतर याप्रकरणी चौकशी होणार हे निश्चित झाले होते. मात्र, हा निर्णय घेऊन तीन महिने उलटले तरी अद्याप याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे बोगस पदवीधर शिक्षकांची चौकशी गुंडाळली काय, अशी चर्चा शिक्षकवर्गामध्ये सुरु असून, ही चौकशी झाल्यास अनेक शिक्षक अडचणीत येण्याची शक्यता आहे. (शहर वार्ताहर)