पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी संचालकांची चौकशी करा -राजन तेली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 04:16 PM2018-11-21T16:16:23+5:302018-11-21T16:17:45+5:30
तिलारी धरण प्रकल्पाचे काम पहाणारे कोकण पाटबंधारे विभागाचे कार्यकारी संचालक खलील अन्सारी यांनी कोल्हापुर व संपूर्ण महाराष्ट्रात ज्या ठिकाणी अतिरिक्त कार्यभार सांभाळला आहे
कणकवली : तिलारी धरण प्रकल्पाचे काम पहाणारे कोकण पाटबंधारे विभागाचे कार्यकारी संचालक खलील अन्सारी यांनी कोल्हापुर व संपूर्ण महाराष्ट्रात ज्या ठिकाणी अतिरिक्त कार्यभार सांभाळला आहे. त्या सर्व ठिकाणच्या त्यांच्या कामांची तातडीने चौकशी करावी . अशी मागणी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली आहे. अशी माहिती भाजप प्रदेश चिटणीस राजन तेली यांनी येथे दिली.
कणकवली येथे बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रथमेश तेली उपस्थित होते.
राजन तेली म्हणाले, महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागाच्या निर्णयानुसार राज्यातील कालव्यांची कामे ही बंदिस्त पाईप लाईन द्वारे करण्यात येणार आहेत. शासनाने तसे आदेश काढले आहेत. त्याप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारी धरण प्रकल्पांची जवळपास 150 कोटि रूपयांची कामे बंदिस्त पाईप लाईनची काढलेली आहेत. ही कामे 2017-18 च्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या दर सूची नुसार दर घेऊन अंदाज पत्रके तयार केली आहेत.
पहिल्या वेळी निविदा मागविण्यात आल्या होत्या त्यावेळी त्या निविदा अंदाजपत्रकीय दराने भरलेल्या होत्या. असे असताना त्या निविदा काही कारणे दाखवून उघडल्या गेल्या नाहीत. त्याच कामाच्या निविदा पुन्हा मागविण्यात आल्या. त्यावेळी पहिल्यांदा निविदा भरलेल्याच ठेकेदारानी पुन्हा निविदा भरल्या. त्या निविदा 35 टक्के ज्यादा दराने भरायला लावण्यात आल्या आहेत.
मुळात त्या अंदाज पत्रकाचा दर हा 2017-18 चा असताना निविदा भरतेवेळी किमान 3 निविदा कॉलिफाय होणे आवश्यक होते. मात्र, 1 व 2 निविदा भरलेली व कॉलिफाय झालेल्या निविदा उघडल्या गेल्या. असे का झाले? तसेच त्या निविदा जादा दराने का भरायला लावण्यात आल्या . याची चौकशी होणे गरजेचे आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात अशा कामांच्या निविदा याच कालावधीत अंदाजपत्रकीय दराने किंवा त्यापेक्षा कमी दराने भरलेल्या होत्या. त्या निविदा स्वीकारण्यात आल्या आहेत. मग फक्त कोकणातील प्रकल्पाच्या निविदाच 35 टक्के ज्यादा दराने का स्वीकारल्या गेल्या याची चौकशी होणे आवश्यक आहे. यामध्ये कीमान 50 कोटि रुपयांचा गैरव्यवहार झाला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याची पडताळणी व्हावी.
या निविदा भरलेले सर्व ठेकेदार हे मुख्य अभियंता असलेल्या खलील अन्सारी यांच्याशी संबधित असून त्यांचे एकमेकाशी लागेबांधे आहेत. तसेच या कामासाठी लागणारे पाईप तयार करण्यासाठी मोठी कंपनी कोल्हापुर येथे खलील अन्सारी यांनी आपल्या मुलाला काढून दिली आहे. त्या कंपनीतून पाईप खरेदी करण्याच्या अटीवर ठेकेदाराबरोबर अन्सारी यांनी सौदा केला आहे.
सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून तसेच पैशाचे आमिष दाखवून चुकीची अंदाजपत्रके तपासून घेतली आहेत. अशा प्रकारे बंदिस्त पाईप लाईनच्या कमात मोठा भ्रष्टाचार झाला आहे.त्यामुळे खलील अन्सारी यांची चौकशी व्हावी अशी मागणी आपण केली असल्याची माहिती राजन तेली यांनी दिली.
तिलारीतील अधिकारी जाग्यावर नाहीत !
तिलारी धरणग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी अधिकाऱ्यांना वेळ नाही. मात्र , कामाच्या निविदा काढण्यासाठी ते दिवस रात्र एक करतात. तिलारीतील अधिकारी कधीही जाग्यावर मिळत नाहीत. अभियंता धाकतोड़े यांची तर स्थितिच वेगळी असून त्यांच्या विमान प्रवासाची आपण माहिती मागवीली आहे.तसेच प्रधान सचिव चहल यांना या सर्व गोष्टींकडे लक्ष देण्याची विनंती केली आहे.असेही राजन तेली यानी यावेळी सांगितले.
कालवा फुटण्याचे प्रमाण जास्त !
तिलारी धरणातून पाणी मिळावे अशी वर्षानुवर्ष शेतकरी मागणी करीत आहेत. गोवा राज्याला आपण पाणी देतो. पण सिंधुदूर्गातील शेतकऱ्यांना जवळ असून पाणी मिळत नाही. या प्रकल्पाचा कुठला ना कुठला कालवा आठ दिवस होत नाहीत तोपर्यन्त फूटतो. कालवा फुटण्याचे प्रमाण जास्त असून जनतेला त्यामुळे त्रास सहन करावा लागत असल्याचेही राजन तेली यावेळी म्हणाले.