विहिरीमधील ‘टीसीएल’ पावडरच्या प्रमाणाची चौकशी
By admin | Published: May 18, 2016 11:12 PM2016-05-18T23:12:59+5:302016-05-19T00:11:21+5:30
शेखर सिंह : साळिस्तेतील साथरोग प्रकरण
सिंधुदुर्गनगरी : साळिस्ते येथील उद्भवलेल्या साथरोगाच्या पार्श्वभूमीवर त्यावेळी तेथील पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या विहिरीमध्ये योग्य प्रमाणात टी.सी.एल. टाकण्यात आले होते का, याची चौकशी सुरू आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
दरम्यान, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आर. के. जोशी यांनी देखील बुधवारी साळिस्ते गावास भेट दिली. साळिस्ते येथे १२ मे रोजी अतिसाराची लागण झाली होती. या चार-पाच दिवसांत ४८ रुग्ण आढळून आले होते. यानंतर आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली होती व साळिस्ते येथील सर्व पाण्याच्या उद्भवांचे पाणी तपासण्याचा धडक कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. ज्या विहिरींच्या पाण्यामुळे ही साथ पसरल्याचे समजले होते, त्या विहिरीतील पाण्याची टी.सी.एल. तपासणी करण्यात आली होती. त्यात पुरेसा २७ टक्के इतका टी.सी.एल.चा अंश टाकण्यात आला होता. मात्र, त्यापूर्वी त्या पाण्यात टी.सी.एल. टाकण्यात आले होते का? याची चौकशी करण्यात येत आहे. सध्या पाणीटंचाईच्या कालावधीत १४ व्या वित्त आयोगातून मिळालेला निधी हा विहिरीतील गाळ काढणे, स्रोतांचे बळकटीकरण करणे, अशा कामांसाठी वापरण्याच्या सूचना शासनाने दिल्या होत्या. त्यानुसार जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना २० कोटी रुपये प्राथमिक निधी दुसऱ्या टप्प्यात प्राप्त झाला आहे. मात्र साळिस्ते येथील या कामासाठी तो वापरण्यात आला नसल्याचेही निदर्शनास आले आहे. पाणीटंचाई उद्भवू नये म्हणून तात्पुरत्या स्वरूपासाठी तिथे टँकरने पाणीपुरवठा ग्रामपंचायतीमार्फत सुरु असल्याचेही सिंह यांनी सांगितले.
जिल्ह्यात पाणीटंचाई आहे, मात्र ती भीषण नाही, असे स्पष्ट करत शेखर सिंह म्हणाले की, मागच्यावर्षी कमी पडलेला पाऊस व त्यामुळे कमी झालेला जलसाठा यामुळे थोडी पाण्याची कमतरता जिल्ह्यात जाणवत आहे. मात्र कुठल्याही वाडीत अगदीच पाणी नाही अशी परिस्थिती आपल्या जिल्ह्यात नाही. स्थानिक पातळीवर थोडीबहुत पाण्याची कमतरता आहे हे मान्य करावे लागेल. मात्र टँकरने पाणीपुरवठा करण्यासारखी परिस्थिती जिल्ह्यात इतरत्र कोठेही नाही.
शिक्षक बदल्यांच्या आॅर्डरवर सही
शासनाची २० पटसंख्येच्या आतील शाळा समायोजन करण्याची संकल्पना स्तुत्य आहे. मात्र त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. आर.टी.ई. कायद्यानुसार तीन किलोमीटरच्या टप्प्यात शाळा असणे आवश्यक आहे.
मात्र येथील भौगोलिक परिस्थिती पाहता ते थोडे कठीण आहे. तसेच यानुसार कार्यवाही झाल्यास त्या विद्यार्थ्यांच्या वाहतुकीचे पैसे कोण देणार किंवा कसे हा प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहे. त्यामुळे त्यावर अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याचे सिंह यांनी स्पष्ट केले.
मुंबई येथे एका मिटींगनिमित्त गेलो असल्याने शिक्षकांच्या बदल्यांच्या आॅर्डरवर सही करायची राहून गेले होते. त्या आॅर्डरवर मंगळवारी रात्री सह्या केल्या असून, त्या त्या जागेवर शिक्षक नियुक्त होणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)