सवेश नाट्यगीतांनी प्रेक्षकांची मने जिंकली
By admin | Published: December 17, 2014 09:15 PM2014-12-17T21:15:36+5:302014-12-17T22:50:40+5:30
नाट्यदर्शन कार्यक्रम : सरस्वती संगीत विद्यालयाचा पुढाकार
वेंगुर्ले : येथील श्री सरस्वती संगीत विद्यालय व युवाशक्ती प्रतिष्ठान, सिंधुुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ‘नाट्यदर्शन’ कार्यक्रमात सरस्वती संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या एकापेक्षा एक सवेश नाट्यगीतांनी प्रेक्षकांची मने जिंकली.
येथील सिध्दिविनायक मंगल कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन देवगड येथील संगीतज्ञ
डॉ. भा. वा. आठवले यांच्या हस्ते व युवाशक्ती प्रतिष्ठान, सिंधुुदुर्ग या संस्थेचे अध्यक्ष विलास गावडे यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी सरस्वती संगीत विद्यालयाच्या संचालिका अनघा गोगटे, अरुण गोगटे, संगीततज्ञ भाई शेवरे, मनमोहन दाभोलकर, दिगंबर नाईक, रवी रेगे, अरुण गोगटे, आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात तेजस मेस्त्री याच्या ‘निराकार आेंकार...’ या गीताने झाली. त्यानंतर काजल परब हिने ‘नाथ हा माझा...’ चिन्मयी खानोलकरने ‘कोण तुज सम सांग...’, वैभवी नाईक हिने ‘धनराशी जाता...’, इंद्राणी कडुलकर हिने ‘मर्मबंधातली ठेव ही...’, अंकिता आरोलकरने ‘जगी या श्वास वेड्यांचा...’, आदिती गोगटे हिने ‘विकल मन आज...’, श्वेता मेस्त्री हिने ‘रमवाया जाऊ...’, जागृती पेठे हिने ‘लागी करेजवा कटार...’, श्रीकृष्ण परब याने ‘जय जय कुंजविहारी...’ ही गीते सादर केली.
अंकिता आरोलकर हिने ‘संगीत मत्स्यगंधा’ या नाटकातील ‘दूर दूर व्हा मत्स्यांनो...’, ‘जन्म दिला मज ज्यांनी....’, तव भास अंतरा झाला...’, ‘गर्द संगाती रान साजणी ही...’ तेजस मेस्त्री याने ‘फुलला दारी तुझ्या धिवरा..’, ‘देवाघरचे ज्ञात कुणाला...’, गुंतता हृदय हे...’, ‘नको विसरू संकेत मिलनाचा...’ या गीतांना प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली. शेवटी अनघा गोगटे यांनी सादर केलेल्या ‘तम निशेचा सरला...’ या भैरवीने या तीन तास रंगलेल्या नाट्य संगीताच्या रजनीची सांगता झाली.
या सर्व गायकांना अमित मेस्त्री (हार्मोनियम), भालचंद्र केळुसकर (आॅर्गन), प्रसाद मेस्त्री (तबला) यांनी साथ दिली. निवेदक म्हणून संजय कोन यांनी काम पाहिले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सरस्वती संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी विशेष सहकार्य केले. या कार्यक्रमास सुमारे ८०० संगीतप्रेमी उपस्थित होते. (प्रतिनिधी)