जीर्ण वीज उपकरणांची तपासणी करा:: महिन्यात उपकरणे बदलण्याची अभियंत्यांची ग्वाही

By admin | Published: December 9, 2014 09:49 PM2014-12-09T21:49:53+5:302014-12-09T23:22:41+5:30

सावंतवाडीत शुक्रवारी ‘बंद’ची हाक ::सर्वपक्षीय बैठकीत निर्णय

Inspect electrical equipment: Monthly replacement of Engineer replacement equipment | जीर्ण वीज उपकरणांची तपासणी करा:: महिन्यात उपकरणे बदलण्याची अभियंत्यांची ग्वाही

जीर्ण वीज उपकरणांची तपासणी करा:: महिन्यात उपकरणे बदलण्याची अभियंत्यांची ग्वाही

Next



सावंतवाडी : सावंतवाडी शहरात जीर्ण झालेल्या विद्युत उपकरणांची तपासणी करा, अशी मागणी करीत त्यावर तातडीने उपाययोजना व्हावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा सावंतवाडी नगरपालिकेच्या लोकमान्य टिळक सभागृहात झालेल्या बैठकीत देण्यात आला. यावेळी महावितरणचे कार्यकारी अभियंता नामदेव मोरे यांनी एक महिन्याच्या आत सर्व समस्या सोडवू, तसेच निकृष्ट खांब, वाहिन्या तातडीने बदलण्यात येतील, अशी हमी यावेळी दिली. या बैठकीत नागरिकांनी अभियंता मोरे यांना चांगलेच धारेवर धरले.
सावंतवाडी शहरात विद्युत तार पडून दोन युवकांचा मृत्यू झाला होता. तर सोमवारी याची पुनरावृत्ती होताना दोन युवक थोडक्यात बचावले होते. या प्रकारानंतर सावंतवाडी शहरात महावितरणविरोधात उद्रेक झाला. याची दखल घेत राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी तातडीने शहरातील जुन्या झालेल्या विद्युत तारा बदलण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार कार्यकारी अभियंता नामदेव मोरे मंगळवारी सावंतवाडीत दाखल झाले. त्यानंतर येथील पालिका सभागृहात विद्युत विभागाचे अधिकारी, नगरपालिका, पोलीस व नागरिक यांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीत नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी वीज समस्यांबाबत माहिती दिली. तसेच घडलेल्या प्रकारानंतर विद्युत विभाग काय कारवाई करणार, याची माहिती घेतली. नगरसेवक सुभाष पणदूरकर यांनी, पालिका विद्युत विभागाला दर महिन्याला अडीच लाख रुपये देते. तसेच वर्षभरापूर्वी १० लाख रूपये स्ट्रीट लाईटचे भरले. मात्र, यावर कोणतीही कारवाई झाली नाही, अशा तक्रारी केल्या.
प्रकाश बिद्रे यांनी, साहित्य निकृष्ट असून मध्यंतरी कुडाळ येथून साहित्य मागे पाठवले असताना सावंतवाडीत असे साहित्य कसे वापरले जाते, असा प्रश्न केला.
बैठकीत सतीश नार्वेकर यांनी, प्रभागाप्रमाणे जर शाखा अभियंता व विद्युत वायरमन दिले असतील तर त्यांची पाटी त्या प्रभागात लावा, अशी मागणी केली. तसेच खांब खराब होऊ नये, म्हणून त्यावर रंंग काढा, खड्ड्याच्या बाहेर खांबाच्या भोवती सिमेंटचे आवरण घाला, अशी सूचना राजन पोकळे यांनी केली. राजू पनवेलकर तसेच बाळ बोर्डेकर, आनंद नेवगी यांनी विद्युत तार पडून मृत पावलेल्यांच्या कुटुंबीयांना नोकरीमध्ये सामावून घ्या, अशी मागणी केली. कार्यकारी अभियंता मोरे यांनी सर्व समस्या लिहून घेत येत्या एक महिन्यात या समस्या तडीस लावल्या जातील, अशी भूमिका घेतली.
यावेळी पोलीस निरीक्षक रणजीत देसाई, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र शेलार, शाखा अभियंता महेश गोंदलेकर, प्रकाश मिसाळ, वसंत केसरकर, नगरसेवक विलास जाधव, गोविंद वाडकर, कीर्ती बोंद्रे, शर्र्वरी धारगळकर, देवेंद्र टेमकर, शुभांगी सुकी, राजू पनवेलकर, बबलू मिशाळ, सतीश नार्वेकर, शब्बीर मणियार, जयवंत कुलकर्णी, संदीप टोपले, राजू मसूरकर, मंदार नार्वेकर, सुधीर आडिवरेकर आदी उपस्थित
होते. (प्रतिनिधी)


नागरिकांची आक्रमक भूमिका
अचानक वीजप्रवाह सोडला
ज्या दिवशी दोन युवकांचा मृत्यू झाला, त्या दिवशी कोलगाव येथील वीज उपक्रेंद्रातून जादा वीज पुरवठा सोडण्यात आला होता. त्यामुळे शहरातील विद्युत खांबावर लोड येऊन विद्युत तारा खाली पडल्या, असा गंभीर आरोप राजू मसूरकर यांनी केला. कार्यकारी अभियंता मोरे यांनी तसा प्रकार घडल्याचे कबूल केले.

बाळ बोर्डेकर, राजू पनवेलकर यांनी सावंतवाडीत विद्युत वाहिनी पडून मृत्यू झालेल्या दोन युवकांच्या कुटुंबाला काय मदत देणार, याची माहिती मागितली.
तसेच जोपर्यंत तुम्ही या प्रश्नावर तोडगा काढत नाही, तोपर्यंत आम्ही तुम्हाला जाऊ देणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेतली.

सावंतवाडीत शुक्रवारी ‘बंद’ची हाक
मूक मोर्चाचे आयोजन : सर्वपक्षीय बैठकीत निर्णय
सावंतवाडी : विद्युत तारा पडून मृत्यू झालेल्या संदीप गवस व सागर हुक्कीरे यांना न्याय मिळवून देण्यासाठी नागरिकांनी मंगळवारी येथील विठ्ठल मंदिरात बैठकीचे आयोजन केले होते. यामध्ये शुक्रवार १२ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता काळ्या फिती लावून मूक मोर्चा काढण्याचे ठरविण्यात आले. तसेच यावेळी संपूर्ण सावंतवाडी बंद ठेवणार असल्याचे व्यापारी संघाचे अध्यक्ष जगदीश मांजरेकर यांनी सांगितले.
विद्युत तारा पडून सावंतवाडीतील संदीप गवस व सागर हुक्कीरे हे दोघे जागीच मृत झाले होते. ही घटना विद्युत वितरणच्या अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे झाल्याचे कळताच संतप्त नागरिकांनी आंदोलन छेडून अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची तसेच मृतांच्या कुटुंबियांना नुकसानी देण्याची मागणी केली होती. रात्री उशिरापर्यंत नागरिकांनी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला होता.
त्यानंतर मृत युवकांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी सावंतवाडीवासियांनी एकत्र येत शुक्रवारी येथील विठ्ठल मंदिरात बैठकीचे आयोजन केले होते. ज्या अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे दोघा युवकांना प्राण गमवावे लागले, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. तसेच गवस आणि हुक्कीरे यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत आणि त्यांच्या वारसास अनुकंपेखाली शासकीय सेवेत सामावून घेण्याची मागणी आदी ठळक मुद्दे यावेळी बाळ बोर्डेकर यांनी उपस्थित केले. तसेच शहरातील सर्व रिले सबस्टेशन, जीर्ण झालेले विद्युत खांब बदलणे, मुख्य शहरातून जाणाऱ्या विद्युत तारांची तत्काळ दुरुस्ती आदी मागण्यांचे ठराव यावेळी घेण्यात आले.
संदीप गवस आणि सागर हुक्कीरे यांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी नवीन बँक खाते उघडण्यात येणार आहे. दोन दिवसात बँक शाखा आणि खाते नंबर जाहीर करणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. या बैठकीप्रसंगी सावंतवाडी व्यापारी संघातर्फे दोन्ही कुटुंबियांसाठी प्रत्येकी २५ हजार रुपयांची मदत यावेळी जाहीर करण्यात आली. तसेच राजू भालेकर यांनी पाच हजार रुपये मदत केली असून, रिक्षा युनियन व रोटरी क्लब यांनी मूक मोर्चास पाठिंबा जाहीर केला आहे.
या बैठकीस सभापती प्रमोद सावंत, बाळ बोर्डेकर, मंदार नार्वेकर, जगदीश मांजरेकर, नकुल पार्सेकर, आनंद नेवगी, उमेश कोरगावकर, सतीश नार्वेकर, बाबल्या दुभाषी, दिलीप नार्वेकर, विलास जाधव, संजय पेडणेकर, बाळ चोडणकर, देवेंद्र टेमकर, कीर्ती बोंद्रे, शर्वरी धारगळकर, शुभांगी सुकी, दिलीप भालेकर,
संजू शिरोडकर आदी उपस्थित
होते. (वार्ताहर)

Web Title: Inspect electrical equipment: Monthly replacement of Engineer replacement equipment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.