‘नाम’ फाऊंडेशनकडून आचरा खाडीची पाहणी
By admin | Published: May 18, 2016 10:28 PM2016-05-18T22:28:42+5:302016-05-19T00:14:53+5:30
लोकसहभागाची गरज : दिवाळीनंतर काम सुरू होण्याची शक्यता
आचरा : गाळाने भरलेल्या आचरा खाडीला ‘नाम’ फाऊंडेशनच्या माध्यमातून गाळ उपसा केल्यानंतर नवसंजीवनी मिळणार आहे. याबाबतचा सर्व्हे या फाऊंडेशनच्या तज्ज्ञ पथकाने रविवारी आचरावासीयांसोबत केला. या कामाला आता पावसाळा तोंडावर आल्याने दिवाळीनंतरच सुरुवात होणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
पूर्वी परबवाडी येथील खाडीवर पूल होण्याअगोदर या खाडीतून पडाव्यातून एक हजार पोत्यांची ने-आण केली जायची. होड्यांमधून वाहतूक होण्याएवढी खोली या खाडीची होती. वाढत्या वृक्षतोडीबरोबरच डोंगरमाथ्यावर होणारे यांत्रिकी आक्रमणामुळे खाड्या गाळाने बुजू लागल्या. यामुळे गाळ साचून खाड्यांची खोली कमी होऊ लागली. पारवाडीमुळे देवगड-आचरा वाहतुकीने खाडीतील होडी वाहतूकही बंद पडली. या खाडीत गाळ वाढत जाऊन बारमाही वाहणाऱ्या या नद्या पावसाळ्यापुरत्याच प्रवाही दिसू लागल्या. आचरा पारवाडी खाडी सध्या पूर्णपणे गाळाने भरल्याने खाडी किनाऱ्यावरील पोयरे, मुणगे कारिवणे, आचरा नागोचीवाडी, पारवाडी, जामडूल, डोंगरेवाडी, आदी भागांना धोका निर्माण झाला आहे. मोठ्या पावसात खाडीचे पाणी किनाऱ्याबाहेर पडून पूरसदृश स्थिती निर्माण होत होती. या अगोदरही १९९३ पासून हे भाग पावसाळी जोखीमग्रस्त म्हणूनच संबोधले जात आहेत.
त्यातच मुणगे बाजूने या खाडीला पक्का सिमेंट बंधारा झाल्याने प्रवाह बदलून पारवाडी भागाला धोक्याची शक्यता अधिक वाढली होती. त्याबाबत गाळ उपसा, पारवाडी बाजूने बंधाऱ्यासाठी वारंवार अर्ज विनंत्या करत होते; पण त्याला यश मिळत नव्हते. यात पारवाडीचे समीर ठाकूर यांच्यासह इतर ग्रामस्थ पुढाकार घेत होते. पण त्यांची व्यथा आचरा भेटीला आलेल्या प्रसिद्ध अभिनेते आणि नाम फाऊंडेशनचे संस्थापक नाना पाटेकर यांना कळल्यावर त्यांनी फाऊंडेशनच्या माध्यमातून या खाडीचा गाळ उपसा करण्याचे ठरविले. यासाठी या गावचे ग्रामस्थ, पदाधिकारी यांची बैठकही घेतल्याचे समजते.
या फाऊंडेशनचे सचिव राजू सावंत तसेच इतरांनी पाहणी केल्यानंतर गेल्या रविवारी तज्ज्ञ पाच व्यक्तींचे पथक या खाडीच्या पाहणीसाठी पाठविले. यात कुमार नांगरे जाधव तसेच त्यांचे तीन सहकारी सहभागी झाले होते. या पथकासोबत पारवाडी ब्राह्मणदेव सांस्कृतिक विकास मंडळाचे अध्यक्ष समीर ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य परशुराम शेट्ये, वामन परब, कारिवणे येथील जोशी, आदी सहभागी झाले होते. या पथकाने पोयरे सीमेपासून आडबंदर भाटी जामडूल पिरावाडी नस्तापर्यंत पाहणी केल्याचे सांगण्यात आले.
याबाबत माहिती देताना ब्राह्मणदेव सांस्कृतिक विकास मंडळाचे समीर ठाकूर यांनी सांगितले की, नाम फाऊंडेशनच्या तज्ज्ञ पथकाने रविवारी संपूर्ण खाडीपात्राचा सर्व्हे केला. काही ठिकाणी अडचणींवर मात करत ही पाहणी झाली. याबाबत तातडीने मशिनरी उपलब्ध झाल्यास पावसाळ्यापूर्वी हे काम सुरू होईल; न पेक्षा दिवाळीनंतर या कामाला सुरुवात होणार आहे. हे काम मोठ्या आर्थिक बजेटचे असून, नाम फाऊंडेशनने यासाठी पुढाकार घेतला आहे. या खाडीच्या गाळ उपशाने या भागातील सर्वांनाच त्याचा फायदा होणार असल्याने हे आपलेच काम आहे, यादृष्टीने लोकसहभागाचीही आवश्यकता आहे. यासाठी काही अंशी आर्थिक सहकार्यही लागणार आहे. त्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. (वार्ताहर)