बांदा-डेगवे रस्त्याची पाहणी, त्वरित डागडुजीचे आश्वासन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 04:43 PM2020-09-16T16:43:42+5:302020-09-16T16:47:25+5:30
बांदा-दोडामार्ग राज्य मार्गाच्या दुरवस्थेबाबत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार नीतेश राणे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याची झोप उडाली. कार्यकारी अभियंता श्रीकांत माने व उपकार्यकारी अभियंता विजय चव्हाण यांनी बांदा ते डेगवे रस्त्याची पाहणी केली.
बांदा : बांदा-दोडामार्ग राज्य मार्गाच्या दुरवस्थेबाबत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार नीतेश राणे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याची झोप उडाली. कार्यकारी अभियंता श्रीकांत माने व उपकार्यकारी अभियंता विजय चव्हाण यांनी बांदा ते डेगवे रस्त्याची पाहणी केली.
यावेळी त्यांनी ग्रामस्थांना रस्त्याची त्वरित डागडुजी करण्याचे आश्वासन दिले. रस्त्याची तत्काळ डागडुजी न केल्यास रस्त्यावर उतरून तीव्र जनआंदोलन करण्याचा इशारा यावेळी सरपंच अक्रम खान व माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी यांनी दिला.
बांदा-दोडामार्ग राज्य मार्गाची अक्षरश: चाळण झाली आहे. या मार्गावरून वाहने चालविणे तारेवरची कसरत आहे. मात्र, संबंधित विभागाला जाग काही येत नाही. वेळोवेळी बांधकाम खात्याला निवेदने देऊन, घेराव घालूनही जाग न आल्याने याविरोधात भाजप पदाधिकारी आक्रमक झाले होते.
यावेळी सरपंच अक्रम खान, उपसभापती शीतल राऊळ, बांदा तंटामुक्ती अध्यक्ष गुरुनाथ सावंत, डेगवे सरपंच प्रवीण देसाई, माजी उपसरपंच मधु देसाई, माजी सरपंच बाळा आकेरकर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष मकरंद तोरस्कर, संजय विर्नोडकर, दत्तप्रसाद स्वार आदींसह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.