सिंधुदुर्गनगरीत लाईफ लाईन एक्सप्रेसमध्ये तपासणीस प्रारंभ
By admin | Published: April 17, 2017 05:48 PM2017-04-17T17:48:11+5:302017-04-17T17:48:11+5:30
सुविधेचा मोठ्या संख्येने रुग्णांनी लाभ घ्यावा, जिल्हाधिकारी उदय चौधरी यांचे आवाहन
आॅनलाईन लोकमत
सिंधुदुर्गनगरी : दि. १६ : लाईफ लाईन एक्सप्रेस रेल्वेमध्ये वीस विशेष तज्ञ डॉक्टराचे पथक कार्यरत आहे. स्तनांच्या व मुख कॅन्सरचे पुर्व निदान, दंतोपचार कानाचे आजार, आथोर्पेडीक शस्त्रक्रिया, डोळे तपासणी अशा प्रकारच्या आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया या लाईफ लाईन एक्सप्रेसमध्ये केल्या जाणार आहेत. या आरोग्य सुविधांचा सिंधुदुर्गनगरीतील रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी सिंधुदुर्गनगरी रेल्वेस्थानकावर आयोजित लाईफ लाईन एक्सप्रेस उद्घाटनप्रसंगी केले.
केंद्रीय रेल्वेमेंत्री सुरेश प्रभू यांनी सिंधुदुर्गनगरी, विशाखापट्टणम, भुवनेश्वर या तीन ठिकाणच्या लाईफ लाईन एक्प्रेस सुविधेचे उद्घाटन व्हिडिओ कॉन्फरसींगव्दारे केले. सिंधुदुर्ग रेल्वेस्थानकावर आयोजित कार्यक्रमास माजी आमदार राजन तेली, संदेश पारकर, अतुल काळसेकर, प्रभाकर सावंत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, अवधुत मालंडकर, विजय केनवडेकर आदी उपस्थित होते.
केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या सहकार्याने सिंधुदुर्गात प्रथमच लाईफ लाईन एक्सप्रेसचे आगमन होत आहे. जिल्ह्यातील गरजू रुग्णांना याचा मोठा लाभ होणार आहे. याबाबत आभार मानून जिल्हाधिकारी चौधरी म्हणाले की, सिंधुदुर्गात विशेषत: महिलांच्या ब्रेस्ट कॅन्सर किंवा मुख कॅन्सर याची पूर्व तपासणीची सोय नाही. पण या लाईफ लाईन एक्सप्रेसमुळे ही सुविधा मोफत उपलब्ध झाली याचा लाभ विशेषत: महिला भगिनींनी घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह म्हणाले की, या लाईफ लाईन एक्सप्रेस सुविधेचा लाभ ग्रामीण भागातील जनतेला व्हावा यासाठी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र,उपकेंद्र, उप जिल्हा रुग्णालयाच्या परिसरातील इच्छुक रुग्णांना या ठिकाणी आणण्याची व्यवस्था केली आहे. ब्रेस्ट कॅन्सर किंवा मुख कॅन्सर पूर्व निदानासाठी आवश्यक असलेला मॅनोग्राफी हे यंत्र या एक्सप्रेसमध्ये उपलब्ध आहे. याचा लाभ घेऊन जास्तीत जास्त संख्येने इच्छुक रुग्णांनी या सुविधेचा लाभ घ्यावा. लाईफ लाईन एक्सप्रेसव्दारे तीन दिवसाची ही आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया मोहीम यशस्वी होईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी संदेश पारकर, अतुल काळसेकर यांचीही समयोचित भाषणे झाली. लाईफ लाईन एक्सप्रेसचे प्रकल्प अधिकारी डॉ. याज्ञिक वझा यांनी रत्नागिरी येथील रेल्वेच्या मुक्कामात रत्नागिरी जिल्ह्यातील सहा हजार रुग्णांची तपासणी तर ६00 शस्त्रक्रिया केल्या असल्याची माहिती यावेळी दिली. प्रारंभी कोकण रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक बी.बी.निकम यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.