कोकण रेल्वे विद्युतीकरण मार्गाची तपासणी सुरू, रेल्वे सुरक्षा आयुक्त सिंधुदुर्गात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 12:07 PM2022-03-23T12:07:25+5:302022-03-23T12:08:05+5:30
कोकण रेल्वे मार्गावरील रोहा ते वेर्णा या मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम गेली सात वर्षे सुरू होते. रोहा ते रत्नागिरी या २८५ किलोमीटर टप्प्याचे विद्युतीकरण डिसेंबर २०२१ मध्ये पूर्ण झाले.
कणकवली : कोकण रेल्वे मार्गावरील रत्नागिरी ते वेर्णा या मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. या विद्युतीकरण मार्गाची तपासणी करण्यासाठी रेल्वेचे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा यांच्या नेतृत्वाखाली पथक सिंधुदुर्गात दाखल झाले आहे. हे पथक आज कणकवली ते वेर्णा या मार्गाची तपासणी करणार आहेत.
कोकण रेल्वे मार्गावरील रोहा ते वेर्णा या मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम गेली सात वर्षे सुरू होते. रोहा ते रत्नागिरी या २८५ किलोमीटर टप्प्याचे विद्युतीकरण डिसेंबर २०२१ मध्ये पूर्ण झाले. सध्या या मार्गावर रत्नागिरी ते दिवा ही पॅसेंजर गाडी तसेच रत्नागिरीपर्यंत येणाऱ्या मालगाड्या विजेवर धावत आहेत. त्यानंतर फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात रत्नागिरी ते गोव्यातील वेर्णा या स्थानकापर्यंत विद्युतीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले. त्यानंतर आता या विद्युतीकरण कामाची रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा यांच्या पथकाकडून कसून तपासणी केली जात आहे.
रत्नागिरी ते नांदगाव या स्थानक दरम्यान रेल्वे मार्ग, विद्युत यंत्रणा आदींची तपासणी काल करण्यात आली. तर आज कणकवली ते सावंतवाडी या दरम्यानच्या मार्गाची तपासणी केली जाणार आहे. त्यानंतर हे पथक मडुरा ते वेर्णा या मार्गाची तपासणी करणार असल्याची माहिती रेल्वे सूत्रांकडून देण्यात आली.
कोकण रेल्वेच्या संपूर्ण ७४० किलोमिटर मार्गाचे विद्युतीकरण अंतिम टप्प्यात आले आहे. यातील रोहा ते रत्नागिरी, मडगाव ते कारवार, कारवार ते ठोकूर आणि मडगाव ते थीवी या विद्युतीकरण झालेल्या मार्गाची रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा यांनी यापूर्वीच तपासणी केली आहे. आता रत्नागिरी ते वेर्णा या मार्गाची तपासणी पुढील दोन दिवस सुरू राहणार आहे. तर मार्च पासून कोकण रेल्वे मार्गावरील सर्व गाड्या विजेवर धावण्याची शक्यता आहे. मुंबईपासून रत्नागिरीपर्यंतचा सलग मार्ग विद्युतीकृत असल्याने सध्या डाऊन दिशेला रत्नागिरीपर्यंत माल गाड्या तसेच दिवा- रत्नागिरी पॅसेंजर गाडी विद्युत इंजिनासह चालवली जात आहे.
रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या तपासणीनंतर कोकण रेल्वेचा संपूर्ण मार्ग डिझेल ऐवजी विद्युत इंजिनावर गाड्या धावण्यासाठी सज्ज होणार आहे. इलेक्ट्रिक इंजिनाची उपलब्धता आणि वीज सबस्टेशनची उर्वरित कामे पूर्ण होईपर्यंत कोकण रेल्वे मार्गावरील सर्व गाड्या टप्प्याटप्याने इलेक्ट्रिक इंजिनासह चालवल्या जाणार आहेत. यात सुरवातीला लांब पल्ल्याच्या गाड्या विद्युत इंजिनद्वारे चालवल्या जातील व त्या पाठोपाठ इतर गाड्या देखील विजेवर धावू लागतील अशी माहिती रेल्वेकडून देण्यात आली.