नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना पोलिसांचा दणका, गोवा व दोडामार्ग पोलिसांची संयुक्त मोहीम 

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: November 18, 2023 06:09 PM2023-11-18T18:09:14+5:302023-11-18T18:09:39+5:30

दोडामार्ग ( सिंधुदुर्ग ) : दोडामार्ग व गोवा पोलिसांनी महाराष्ट्र व गोवा सीमेवरील दोडामार्ग येथील तपासणी नाक्यावर वाहनांची कसून ...

Inspection of vehicles at check post at Dodamarg on the border of Maharashtra and Goa | नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना पोलिसांचा दणका, गोवा व दोडामार्ग पोलिसांची संयुक्त मोहीम 

नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना पोलिसांचा दणका, गोवा व दोडामार्ग पोलिसांची संयुक्त मोहीम 

दोडामार्ग (सिंधुदुर्ग) : दोडामार्ग व गोवा पोलिसांनी महाराष्ट्र व गोवा सीमेवरील दोडामार्ग येथील तपासणी नाक्यावर वाहनांची कसून तपासणी केली. यावेळी वाहनांची कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता न करणाऱ्या वाहन चालकांना दंड ठोठावला. शुक्रवारी ११ तर शनिवारी एकूण १४ वाहनांवर कारवाई करण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक अरुण पवार यांनी सांगितले.

दोडामार्ग पोलिसांनी वाहनांची तपासणी करण्याची मोहीम हाती घेतली आहे. महाराष्ट्र व गोवा सीमेवरील महाराष्ट्र हद्दीतील दोडामार्ग तपासणी नाक्यावर येथील पोलिसांचे एक पथक कार्यरत होते. तसेच लगतच्या गोवा राज्यातील पोलिसही या मोहिमेत सामील झाले. यावेळी गोव्यात जाणाऱ्या व महाराष्ट्रात येणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून तपासणी केली जात होती. तसेच वाहन चालकांकडे परवाना व वाहनांच्या कागदपत्रांची तपासणी केली जात होती. या कागदपत्रांची पूर्तता न करणाऱ्या वाहन चालकांना दंड ठोठावला गेला.

दोन दिवसांत ७० वाहनांची तपासणी

शुक्रवारी सायंकाळी ५ ते ७ वा.पर्यंत ही मोहीम राबविले असता एकूण ११ वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई केली. तर शनिवारी सकाळी १० वा. ते दुपारी १२ वाजेपर्यंत वाहनांची तपासणी करण्यात आली. एकुण ७० वाहने तपासली असता १४ वाहन चालकांनी वाहनांसंबंधी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न केल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केल्याचे पोलिस निरीक्षक अरुण पवार यांनी सांगितले.

वाहन चालकांचे धाबे दणाणले

यावेळी पोलिस उपनिरीक्षक नाईक, कॉन्स्टेबल समीर सुतार, पोलिस कर्मचारी, होमगार्ड व लगतच्या गोवा राज्यातील दोन पोलिस कर्मचारी उपस्थित होते. महाराष्ट्र व गोवा पोलिसांनी केलेल्या या संयुक्त कारवाईमुळे सारेजण अचंबित झाले. मात्र, या कारवाईने वाहन चालकांचे चांगलेच धाबे दणाणले.

Web Title: Inspection of vehicles at check post at Dodamarg on the border of Maharashtra and Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.