रूग्णालयासाठी संस्थेने पुढे यावे

By admin | Published: September 13, 2015 09:45 PM2015-09-13T21:45:22+5:302015-09-13T22:15:47+5:30

अनंत गीते : गुहागरचा विकास व दैनंदिन समस्यांवर परिसंवाद

The institution should come forward for the hospital | रूग्णालयासाठी संस्थेने पुढे यावे

रूग्णालयासाठी संस्थेने पुढे यावे

Next

गुहागर : तालुक्यात एकही अद्ययावत रूग्णालय नसल्याने आयसीयू सुविधेसाठी नागरिकांना ४५ कि. मी. दूर चिपळूणला जावे लागते, अशी खंत श्री दुर्गादेवी देवस्थानचे अध्यक्ष किरण खरे यांनी व्यक्त केली. यावर केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी एखादी संस्था पुढे आली तर हे रूग्णालय सुरू करण्यासाठी आवश्यक सर्व मंजुरी देऊ, अशी ग्वाही केंद्रिय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी दिली.प्रथमच गुहागरमध्ये श्री दुर्गादेवी देवस्थान सभागृहामध्ये तालुक्यातील विविधस्तरातील क्रियाशील लोकांना बोलावून ‘गुहागरचा विकास व दैनंदिन समस्यांवर परिसंवाद’ साधला. यावेळी त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांना समर्पक उत्तरे दिली.
कोकणात केमिकल झोन व इतर प्रकल्प येण्याच्या घोषणा होत आहेत. त्यासाठी आवश्यक रोजगार संधीची माहिती देणे आवश्यक असल्याचे यावेळी सुचित करण्यात आले. यावेळी लोटे येथे पेपरमिलचे एक युनिट व गुहागर तालुक्यात आशिया खंडातील सर्वात मोठी रिफायनरी आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे गीतेंनी सांगितले.
कराड, चिपळूण व (जिंदाल) डिंगणी असे नवीन रेल्वेमार्ग जोडले जात असताना गुहागर तालुक्याला जोडणारा रेल्वेमार्ग व्हावा, अशी मागणी सचिन बाईत यांनी केली. यावर गीते यांनी दिघी हा नवीन रेल्वे मार्गापासून चिपळूण जोडले जाणे शक्य असून, दिघी ते जयगड हा मार्ग जोडणे कठीण असल्याचे सांगितले.
इस्त्रायलच्या धर्तीवर समुद्राचे खारे पाणी गोडे करुन पिण्यासाठी वापरात आणणे शक्य होईल का? असा प्रश्न अ‍ॅड. संकेत साळवी यांनी केल्यानंतर सध्यातरी कोकणात मुबलक पाणी असून, अशा खर्चीक प्रकल्पाची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट केले.
कोयनेचे पाणी मुंबईत नेण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे ऐकिवात असून, याबाबत वस्तुस्थिती काय आहे? या प्रश्नावर या विषयीच्या समिती अध्यक्षपदी सुभाष देसाई असून, अद्याप याविषयी कोणताही निर्णय झालेला नसल्याचे सांगितले. डॉ. वसंत ओक यांनी खासदार निधीबाबत माहिती विचारल्यानंतर खासदारांना १५ कोटी निधी वर्षाला मिळत असून, २२ टक्के निधी आरक्षित असतो हा निधी जिल्हाधिकाऱ्यांकडे येऊन खासदारांनी विकासकामांची यादी दिल्यानंतर आवश्यक पूर्तता केल्यानंतर खर्ची पडतो. खासदार निधी १०० टक्के खर्ची पाडणारा मी कदाचित एकमेव खासदार असेन, असेही गीतेंनी सांगितले.
कोयनेमधून पाणी लिफ्ट करुन येणारा खर्च खूप मोठा आहे. याबाबतचा कोणतीही पावले उचलली नाहीत. कोकणात रेल्वेचा एक तरी प्रकल्प यावा यासाठी रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंकडे पाठपुरावा करत असल्याचे सांगितले.
कोकणात पर्यटनाला मोठा वाव असताना सीआरझेडमुळे अडचणी येत असल्याने हॉटेल व्यावसायिक शाम खातू यांनी कैफीयत मांडली. याबाबत पर्यावरणविषयक समस्या व सीआरझेड याविषयी उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची सह्याद्रीवरती आॅक्टोबरमध्ये विशेष बैठक होणार असल्याचे अनंत गीते यांनी यावेळी सांगितले.
यावेळी व्यासपीठावर शिवसेना जिल्हाध्यक्ष सचिन कदम, गुहागर तालुकाध्यक्ष महेश नाटेकर, श्री दुर्गादेवी देवस्थान अध्यक्ष किरण खरे उपस्थित होते. (प्रतिनिधी)


गुहागरच्या विकासासंदर्भात श्री दुर्गादेवी देवस्थानने प्रथमच परिसंवाद आयोजित केला होता. प्रत्यक्षात काही निवडक लोकांनीच या परिसंवादाला हजेरी लावली. त्यामुळे गुहागरच्या विकासाबाबत नागरिकांना आस्थाच नसल्याचे पुढे आले. केवळ राज्यकर्त्यांना दोष देऊन शांत बसत गुहागरचा विकास साधला जात नाही, त्यासाठी नागरिकांचा सहभाग हवा.


गुहागर येथे आयोजित केलेल्या परिसंवादावर माजी आमदार विनय नातू यांनी टीका केली होती. २५ वर्षानंतर गुहागरचा विकास दिसला का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. यावर अनंत गीते काय बोलतात याकडे लक्ष लागले होते. मात्र, हा राजकीय कार्यक्रम नसल्याचे सांगून या टिकेकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे सर्वांचा भ्रमनिरास झाला आहे.

Web Title: The institution should come forward for the hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.