ते बांधकाम तोडण्याचे निर्देश : राष्ट्रीय महामार्ग विभागाची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2020 05:09 PM2020-01-31T17:09:56+5:302020-01-31T17:12:07+5:30
शासन नियमाप्रमाणे राष्ट्रीय महामार्गाच्या नियत्रंण रेषामार्गिकेच्या मध्यापासून ७५ मीटरवर औद्योगिक बांधकाम झाले पाहिजे. मात्र, ठेकेदार कंपनीने केवळ २६ मीटरवर संरक्षक भिंतीचे बांधकाम केले आहे.
बांदा : बांदा सटमटवाडी सीमा तपासणी नाका व त्या संबंधित इमारतीचे बांधकाम सर्व नियम धाब्यावर बसवून केल्याचे सिद्ध झाले आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या नियत्रंणरेषा मार्गिकेच्या मध्यापासून ७५ मीटरवर नियमानुसार बांधकाम होणे अपेक्षित असताना केवळ २६ मीटरवर बांधकाम केले आहे. हे बांधकाम अनधिकृत असून पंधरा दिवसांत स्वखर्चाने बेकायदा बांधकाम तोडण्याचे आदेश राष्ट्रीय महामार्ग विभाग रत्नागिरी (कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय) यांनी महाराष्ट्र राज्य रस्तेविकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता, बांद्रा (पूर्व), मुंबई यांना दिले आहेत. या आदेशामुळे ठेकेदार कंपनी मोठ्या अडचणी सापडली आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ (जुना रा.म.क्र. १७) मधील बांदा सटमटवाडी स. १८९ क्षेत्र ११.९५.५० हे.आर. येथील आरटीओ विभागाचा सीमा तपासणी नाका भूसंपादन प्रक्रियेपासूनच वादाचा ठरला आहे. सर्व नियम धाब्यावर बसवून मनमानीपणे हा टोलनाका व त्या संबंधित इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यात आलेले आहे.
याविरोधात प्रकल्पग्रस्त शेतकरी तथा सामाजिक कार्यकर्ते साईप्रसाद कल्याणकर यांनी लढा उभारला आहे. बेसुमार वृक्षतोड, खनिजयुक्त मातीचोरी, बेकायदा बांधकाम त्यांनी सिद्ध करून दाखविले आहे.
शासन नियमाप्रमाणे राष्ट्रीय महामार्गाच्या नियत्रंण रेषामार्गिकेच्या मध्यापासून ७५ मीटरवर औद्योगिक बांधकाम झाले पाहिजे. मात्र, ठेकेदार कंपनीने केवळ २६ मीटरवर संरक्षक भिंतीचे बांधकाम केले आहे.
शासनस्तरावरून हे बांधकाम करण्याची परवानगी मिळविल्यास, तसे अभिलेखे सादर करण्याच्या सूचना राष्ट्रीय महामार्ग विभाग, रत्नागिरी कार्यालयाकडून देण्यात आल्या होत्या. मात्र, अद्यापपर्यंत तसे कोणतेही पुरावे सादर केलेले नाहीत.