जिल्हा रुग्णालयात अपुरा रक्त साठा : धनंजय चाकुरकर यांची खंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2020 03:02 PM2020-03-06T15:02:45+5:302020-03-06T15:04:34+5:30
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे रक्तच नाही तर संस्कारही संक्रमित होत आहेत. या प्रतिष्ठानच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. मात्र, या जिल्हा रुग्णालयातील रक्त साठवणुकीची यंत्रणा अपुरी पडत आहे, अशी खंत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर यांनी धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केली. यावेळी ३०५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
सिंधुदुर्गनगरी : डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे रक्तच नाही तर संस्कारही संक्रमित होत आहेत. या प्रतिष्ठानच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. मात्र, या जिल्हा रुग्णालयातील रक्त साठवणुकीची यंत्रणा अपुरी पडत आहे, अशी खंत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर यांनी धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केली. यावेळी ३०५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदांडा यांच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय येथील नर्सिंग ट्रेनिंग स्कूल येथे मंगळवारी महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अविनाश नलावडे, निवासी शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, रक्तपेढी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश मोरे उपस्थित होते.
यावेळी डॉ. चाकुरकर म्हणाले, डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान स्वच्छता अभियान, विहिरींची स्वच्छता, वृक्षारोपण आदींसारखे सामाजिक उपक्रम राबवित आहे. या प्रतिष्ठानचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. या संस्थेच्यावतीने रक्तदानासारखे महान शिबिर आयोजित केले जाते. त्यांच्या या शिबिरांना रक्तदात्यांचा उदंड प्रतिसाद मिळतो.
हे प्रतिष्ठान रक्तदानच करीत नाही तर एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संस्कारही संक्रमित करीत आहे. हे त्यांचे कार्य अभिमानस्पद आहे, असे सांगतानाच या रक्तदानासाठी दाते मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात. मात्र, येथील रक्त साठवणूक करणारी यंत्रणा अपुरी पडत आहे, अशी खंतही डॉ. चाकुरकर यांनी यावेळी व्यक्त केली.
रक्तदानाला प्रतिसाद
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने जिल्ह्यात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात ३०५ जणांनी रक्तदान केले. यात जिल्हा रुग्णालय रक्तपेढीसाठी २१०, उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी रक्तपेढीसाठी ६० तर एसएसपीएम मेडिकल कॉलेज पडवे रक्तपेढीसाठी ३५ बाटल्या रक्ताचे संकलन करण्यात आले.