इन्सुली ग्रामस्थांचे खड्ड्यांत बसून आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2020 07:40 PM2020-11-20T19:40:31+5:302020-11-20T19:43:04+5:30
highway, road, sindhudurgnews मुंबई-गोवा महामार्गावरील इन्सुली घाटीपासून जुन्या आरटीओ तपासणी नाक्यापर्यंत अनेक खड्डे पडले आहेत. त्यामुळे इन्सुली ग्रामस्थांनी कुडवटेंब येथे खड्ड्यांत बसून आंदोलन केले. राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी येईपर्यंत सुमारे दोन तास केलेल्या आंदोलनामुळे वाहतूक कोंडी झाली.
बांदा : मुंबई-गोवा महामार्गावरील इन्सुली घाटीपासून जुन्या आरटीओ तपासणी नाक्यापर्यंत अनेक खड्डे पडले आहेत. त्यामुळे इन्सुली ग्रामस्थांनी कुडवटेंब येथे खड्ड्यांत बसून आंदोलन केले. राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी येईपर्यंत सुमारे दोन तास केलेल्या आंदोलनामुळे वाहतूक कोंडी झाली.
यावेळी संबंधित विभागाचे अधिकारी अनिल आवटी यांनी आठ दिवसांत खड्डे बुजवून रस्ता सुरळीत करतो, असे आश्वासन दिले. त्यानंतर इन्सुली ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले. गेले अनेक महिने खड्डे पडूनही संबंधित विभागाने दुर्लक्ष केल्याने त्यांना जाग आणण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते स्वागत नाटेकर यांच्या नेतृत्वाखाली खड्ड्यांत बसून इन्सुली कुडवटेंब येथे गुरुवारी आंदोलन केले.
या महामार्गावरील इन्सुली घाटापासून जुन्या आरटीओ तपासणी नाक्यापर्यंत रस्ता खड्डेमय झाला आहे. या खड्ड्यांत बरेच अपघात होऊन नागरिक जखमी होत आहेत. त्यात काहींना गंभीर दुखापत होऊन अपंगत्व आले आहे. तर दुचाकीवरून या ठिकाणाहून प्रवास करणे वाहन चालकांना खूपच जिकिरीचे ठरत आहे. त्यामुळे आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
यावेळी स्वागत नाटेकर, माजी सरपंच तात्या वेंगुर्लेकर, नंदू पालव, नाना पेडणेकर, माजी उपसरपंच सत्यवान केरकर, ग्रामपंचायत सदस्य महेश धुरी, केतन वेंगुर्लेकर, गजानन गायतोंडे, बाबलो झाट्ये, पिंटो हांडेकर, बाळा कापडोसकर, जयराम पालव, रवी परब, हरी तारी, प्रिया नाटेकर, महादेव पेडणेकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.