इन्सुली घाटी समस्यांच्या गर्तेत
By admin | Published: February 4, 2015 10:07 PM2015-02-04T22:07:33+5:302015-02-04T23:57:53+5:30
वाहनचालकांतून नाराजी : जीर्ण झाडे, रस्त्याची दुरवस्था, वाहतुकीची कोंडी
संतोष परब- मडुरा -मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर बांद्याहून सावंतवाडीच्या दिशेने जाताना लागणारी इन्सुली घाटी ही समस्यांच्या विळख्यात सापडलेली दिसून येत आहे. इन्सुली घाटीत रस्त्याच्या दुरवस्थेसह धूप झाल्याने उन्मळून पडलेले वृक्ष यासारख्या विविध समस्या निर्माण झाल्याने ही घाटी वाहनचालकांसाठी मृत्यूचा सापळा बनली आहे. या घाटीत वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असूनही येथील समस्यांकडे राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याने वाहनचालकांतून नाराजी व्यक्त होत आहे. या घाटीत होणाऱ्या अपघातांमुळे आतापर्यंत कित्येकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. यामुळे या घाटीतील समस्यांचे तातडीने निराकरण करण्याची मागणी होत आहे.
मुंबई, पुणे, कोल्हापूरमार्गे गोव्यात जाणारी मोठी अवजड वाहतूक याच घाटीतून होत असते, त्यामुळे या घाटीतील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. खड्ड्यांमुळे व घाटीतील धोकादायक ‘यू’ वळणामुळे वारंवार अपघातांची मालिका होत आहे. या अपघातामुळे तातडीची उपाययोजना न झाल्यामुळे येथे कित्येक तास वाहतुकीची कोंडी होताना दिसते.
गोवा हे पर्यटन राज्य असल्याने देशातील तसेच महाराष्ट्रातील पर्यटक सावंतवाडीहून गोव्यात जाताना या मार्गाचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. त्यांना या घाटीने प्रवास करणे अतिशय जिकिरीचे होते. सावंतवाडी हे तालुक्याचे स्थान असल्यामुळे बांदा, मडुरा, इन्सुली अशा मोठ्या दशक्रोशीतून लोकांचे ये-जा याच मार्गवरुन होत असते.
इन्सुली घाटीला पर्यायी झाराप- पत्रादेवी महामार्गाची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र, गोव्याहून तसेच बांद्याहून सावंतवाडी शहरात जाण्यासाठी इन्सुली घाटीतील रस्ताच हा वाहनचालकांसाठी पर्यायी ठरतो. तालुक्यातील महत्त्वाची शासकीय कार्यालये तसेच खासगी आस्थापने सावंतवाडी शहरात असल्याने
तसेच सावंतवाडी हे पर्यटन शहर असल्याने या मार्गावर वाहनांची वर्दळ असते.
कोसळण्याच्या स्थितीतील झाडे तोडावीत
घाटीतील दुतर्फा असलेली जुनाट झाडे ही जीर्ण झाली असून ती केव्हाही कोसळण्याच्या स्थितीत आहेत. ही झाडे एखादेवेळीस वाहनांवर पडल्यास यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या वर्षभरात या घाटीतील झाडे कित्येकदा उन्मळून पडली आहेत. मात्र, सुदैवाने अपघात झाले नाहीत. यामुळे कोसळण्याच्या स्थितीत असलेली झाडे तोडून टाकावीत, अशी मागणी होत आहे. - नारायण राणे, पंचायत समिती सदस्य, सावंतवाडी
दिशादर्शक
फलकांचीही दैना
बांदा- सावंतवाडी मार्गावरील इन्सुली घाटरस्ता हा समस्यांच्या गर्तेत सापडला आहे.
घाटीतील दिशादर्शक फलकांची दैना झाली आहे. घाटीत संरक्षक कठडे नसल्याने वाहनाचा अपघात झाल्यास वाहनचालकांना गंभीर दुखापतींना सामोरे जावे लागते.
घाटीतील रस्ते हे अरुंद असल्याने यामुळे अवजड वाहने आल्यास घाटीत वाहनांची कोंडी होते.
गोव्यातून मुंबई, पुणे, सुरत, अहमदाबाद येथे जाणाऱ्या खासगी बसेस याच घाटीतून जातात.
गोवा, दोडामार्ग, बांदा परिसरातून होणारी एसटी वाहतूक ही पुर्णपणे याच घाटीतून होत असते.
घाटीतील रस्त्यांची साईडपट्टीदेखील खचल्याने
दुचाकीचालकांना याचा त्रास
होत आहे.
इन्सुली घाटीत अपघातांची मालिका घडूनही राष्ट्रीय महामार्ग विभागाचा समस्यांकडे कानाडोळा होत आहे.
येथील समस्यांबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनी वेळोवेळी आवाज उठविला. मात्र, या घाटीतील समस्यांचे अद्यापही निराकरण करण्यात आले नाही.
गोवा राज्यातील पर्यटन हंगाम सुरु झाल्याने या मार्गावर वाहतुकीची वर्दळ वाढणार आहे.