सावंतवाडी नगराध्यक्षांच्या खुर्चीचा अपमान: शिवसेनेच्या नगरसेवकांकडून घटनेचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 08:43 PM2019-11-10T20:43:55+5:302019-11-10T20:44:38+5:30

येत्या काही महिन्यांत नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे. त्यामुळे सावंतवाडीतील जनता नगराध्यक्षपदी कोणाची निवड करते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

  Insult to the chair of the city president: Shiv Sena councilors protest against the incident | सावंतवाडी नगराध्यक्षांच्या खुर्चीचा अपमान: शिवसेनेच्या नगरसेवकांकडून घटनेचा निषेध

सावंतवाडी नगराध्यक्षांची खुर्ची एका बाजूला ठेवली असल्याचे नगरसेविका अनारोजीन लोबो यांनी निदर्शनास आणून दिले.

Next
ठळक मुद्देसावंतवाडी नगरपालिकेतील प्रकार

सावंतवाडी : सावंतवाडीचे तत्कालीन नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर या पदावर प्रभारी नगराध्यक्षा म्हणून अन्नपूर्णा कोरगावकर यांनी कार्यभार स्वीकारला. त्यानंतर नगराध्यक्षांची खुर्ची तेथून हलवून इतरत्र ठेवली, असा आरोप सावंतवाडी नगरपालिकेच्या ज्येष्ठ नगरसेविका अनारोजीन लोबो यांनी केला आहे. जोपर्यंत नगराध्यक्षांची खुर्ची होती त्या जागेवर ठेवली जात नाही तोपर्यंत आम्ही नगराध्यक्षांच्या केबिनमध्ये पाय ठेवणार नाही, असा इशारा लोबो यांनी दिला आहे. तसेच याबाबत आम्ही मुख्याधिकारी संतोष जिरगे यांचीही भेट घेणार असल्याचे नगरसेवक आनंद नेवगी यांनी स्पष्ट केले आहे.

सावंतवाडीच्या ज्येष्ठ नगरसेविका अनारोजीन लोबो यांनी शनिवारी येथील पालिका सभागृहात विकासकामांची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. यावेळी नगरसेवक बाबू कुडतरकर, आनंद नेवगी, सुरेंद्र बांदेकर, नगरसेविका भारती मोरे, शुभांगी सुकी आदी उपस्थित होते.

नगरसेविका लोबो म्हणाल्या, विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याने बहुतांशी विकासकामांबाबत कोणतीही माहिती घेतली नव्हती. मात्र, गेले दोन दिवस आम्ही सर्व विकासकामांची माहिती घेत असून, अनेक कामे प्रगतीपथावर आहेत.
तसेच संत गाडगेबाबा भाजी मंडईचे कामही लवकरात लवकर सुरू करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. आम्ही सावंतवाडीवासीयांना विकासाचे दिलेले आश्वासन पूर्ण करणार आहोत, असेही लोबो यांनी सांगितले.

सावंतवाडीचे तत्कालीन नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा मंजूरही झाला आहे. त्यामुळे प्रभारी नगराध्यक्षा म्हणून उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर या काम पहात आहेत. त्यांना आमचा अजिबात विरोध नाही. पण त्यांनी काम करीत असताना काही मूल्यांची जपणूक करणे बंधनकारक आहे. त्यांनी नगराध्यक्षांची जी खुर्ची होती ती काढून टाकणे योग्य नाही. आम्ही त्यांना सांगितले की तुम्ही त्या खुर्चीच्या बाजूला खुर्ची लावून काम करा. पण त्यांनी तसे न करता ती खुर्ची बाजूला केली हे कितपत योग्य आहे?

मी स्वत: तसेच प्रशासनाच्यावतीने मुख्याधिकारी यांनीही त्यांना याची कल्पना दिली होती. असे असताना त्यांनी तो मान राखला नाही, असा आरोपही लोबो यांनी केला असून, या घटनेनंतर आम्ही नगराध्यक्षांच्या केबिनमध्ये पाय ठेवला नसून, ज्यावेळी ती खुर्ची होती त्या जागेवर ठेवली जाईल तेव्हाच पाय ठेवू असेही लोबो यांनी सांगितले. तसेच या विषयावर आम्ही सोमवारी मुख्याधिकारी संतोष जिरगे यांची भेट घेणार असून, ती खुर्ची होती त्याठिकाणी ठेवण्यास सांगणार असल्याचे नगरसेवक आनंद नेवगी यांनी सांगितले.

सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी राजीनामा देऊन विधानसभा निवडणूक लढविली. त्यांनी राजीनामादिल्याने नगराध्यक्ष पद रिक्त झाले आहे. येत्या काही महिन्यांत नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे. त्यामुळे सावंतवाडीतील जनता नगराध्यक्षपदी कोणाची निवड करते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

दोन खुर्च्यांमुळे अडथळा होत होता
नगराध्यक्षांच्या खुर्चीचा मी कोणताही अवमान केला नाही. फक्त नगराध्यक्षांच्या खुर्चीच्या बाजूला खुर्ची लावल्यामुळे मला फोन घेता येत नव्हता. तसेच बेल मारता येत नव्हती. यामुळेच ती खुर्ची बाजूच्या केबिनमध्ये ठेवली आहे.
त्याचे एवढे राजकारण होईल, असे मला वाटले नव्हते, असे मत प्रभारी नगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर यांनी व्यक्त केले.


 

Web Title:   Insult to the chair of the city president: Shiv Sena councilors protest against the incident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.