कंपनीचे पोट भरण्यासाठीच विमा योजना
By admin | Published: November 6, 2015 11:12 PM2015-11-06T23:12:31+5:302015-11-06T23:40:20+5:30
रणजित देसाई : कृषी समिती सभेत खळबळजनक आरोप, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केवळ ४ कोटी 30 लाखांचीच नुकसानभरपाई
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातून फळपीक विमा योजनेंतर्गत सुमारे
४ कोटींचे हप्ते विमा कंपनीला भरण्यात आले, तर नुकसानीपोटी केवळ विमा कंपनीकडून ४ कोटी ३० लाख मिळाले. विमा कंपनीचे पोट भरण्यासाठीच विमा योजना जिल्ह्यात राबविली जात आहे, असा खळबळजनक आरोप सभाध्यक्ष रणजित देसाई यांनी कृषी समिती सभेत केला. विमा कंपनीचे प्रतिनिधी जर सभेत येऊन योजनेची परिपूर्ण माहिती देत नसतील तर यापुढे शेतकऱ्यांनी विमा योजनेत सहभाग घेऊ नये असे जाहीर करावे लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हा परिषदेची कृषी समितीची सभा कृषी सभापती तसेच जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी पार पडली. यावेळी सदस्य मधुसूदन बांदिवडेकर, रेश्मा जोशी, सोनाली घाडीगांवकर, विभावरी खोत, दिलीप रावराणे, योगिता परब, प्रमोद सावंत आदींसह खातेप्रमुख, अधिकारी उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून फळपीक विमा योजनेला चांगला प्रतिसाद लाभला. मात्र, या योजनेपोटी शेतकरी व शासन हिस्सा म्हणून संबंधित विमा कंपनीला सुमारे ४ कोटी एवढा (प्रीमियम) हप्ता जमा करण्यात आला. मात्र, विमा कंपनीकडून शेतकऱ्यांचे तीन ते चार दिवस अवेळी पाऊस पडूनही केवळ एक दिवसाचे नुकसान दाखवून नुकसानीपोटी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केवळ ४ कोटी ३० लाख भरपाई देण्यात आली.
विमा कंपनीकडून देण्यात आलेली नुकसानभरपाई अल्प स्वरूपात आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यातील विमा कंपनीची ८ ते १० पर्जन्य व तापमानमापक केंद्रे बंद स्थितीत आहेत. मग कोणत्या आधारावर ही नुकसानभरपाई विमा कंपनीने दिली. विमा कंपनीचे निकष जिल्ह्यात लागू होत नाहीत. ही पॉलिसीच सदोष आहे.
विमा कंपनीचे पोट भरण्यासाठीच जिल्ह्यात फळपीक विमा योजना राबविली जात असल्याचा खळबळजनक आरोप सभापती रणजित देसाई यांनी सभेत केला, तर या विमा योजनेची माहिती, निकष याबाबत बोलवूनही विमा कंपनीचे प्रतिनिधी सभेत येत नाहीत. त्यांच्याकडून शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे तरी जर विमा कंपनीकडून परिपूर्ण माहिती दिली जात नसेल तर यापुढे शेतकऱ्यांनी विमा योजनेत सहभागी होऊ नये असे आवाहन शेतकऱ्यांना करावे लागेल, असे सभेत स्पष्ट केले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात यावर्षी पाऊस कमी व अनियमित झाल्याने भातपिकाचे सुरुवातीलाच पेरणीच्यावेळी नुकसान झाले. त्यानंतर आता भात कापणीवेळी पडलेल्या पावसानेही शेतकऱ्यांच्या भातपिकाचे मोठे नुकसान झाले आहे. याकडे सदस्य मधुसूदन बांदिवडेकर यांनी सभागृहाचे लक्ष वेधत तत्काळ नुकसानीचे पंचनामे करा अशी मागणी केली. मात्र, अद्याप जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश नसल्याने पंचनामे केलेले नाहीत. मात्र, आदेश प्राप्त होताच नुकसानीचे पंचनामे करू, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. यावर सभापती रणजित देसाई यांनी झालेल्या नुकसानीचा सर्व्हे करून अहवाल तयार करा.
तो जिल्हाधिकाऱ्यांना सादर करा. नुकसानीची सद्य:स्थिती लक्षात घेऊन जिल्हाधिकारी आदेश देतील. तसा ठराव करून जिल्हाधिकाऱ्यांना सभागृहाच्या भावना कळवा, अशी सूचना दिली.
जलयुक्त शिवार योजनेंतर्गत जिल्ह्यात बांधण्यात आलेले बंधारे आॅक्टोबरमध्येच कोरडे पडलेले दिसत आहेत. तरी जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेतून किती बंधारे बांधले, किती बंधाऱ्यात पाण्याचा साठा झाला आहे याचा अहवाल पुढील सभेत द्या, असे आदेश सभापती रणजित देसाई यांनी संबंधित राज्य कृषी विभागाला दिले. (प्रतिनिधी)