समुद्रात वादळाची तीव्रता वाढली

By admin | Published: October 9, 2015 11:30 PM2015-10-09T23:30:32+5:302015-10-09T23:30:32+5:30

नौका स्थिरावल्या बंदरात : मच्छिमारांना सतर्कतेच्या सूचना

The intensity of the storm increased in the sea | समुद्रात वादळाची तीव्रता वाढली

समुद्रात वादळाची तीव्रता वाढली

Next

मालवण : भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे समुद्रात वादळाची तीव्रता वाढली आहे. हवामान खात्याने वादळी वाऱ्यांचा जोर वाढल्याने मच्छिमारांना मासेमारीला जाऊ नये, असा इशारा दिला आहे. बंदर विभागाने सिंधुदुर्ग किनारपट्टीवर धोक्याचा तीन
नंबरचा बावटा लावला असून, मच्छिमारांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, बुधवारी मध्यरात्रीपासून समुद्रात वादळसदृश स्थितीमुळे मालवण बंदरात आधारासाठी आलेले कर्नाटक, केरळ व तमिळनाडू राज्यांतील १९ हायस्पीड ट्रॉलर्स शुक्रवारीही बंदरात स्थिरावले होते. तर मालवणमधील ट्रॉलर्ससह मोठ्या नौकांनी सुरक्षित असे देवगड बंदर गाठले आहे. गोवा राज्याकडून नैऋत्य दिशेला ४१० किलोमीटर व मुंबईपासून ६३० किलोमीटर अंतरावर उद्भवलेल्या या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने व प्रसंगी ते ५० किलोमीटरपर्यंत वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
बंदर विभागाने मच्छिमारांना समुद्रात मासेमारीला न जाण्याचा इशारा देत मासेमारीस गेलेल्या मच्छिमारांना माघारी बोलावण्याच्या सूचना केल्या आहेत. समुद्री वादळामुळे मासेमारीवरही परिणाम झाला आहे. त्यामुळे मासळीचे दर दोन दिवसांत गगनाला भिडण्याची चिन्हे आहेत. वादळी वाऱ्यांचा जोर येत्या २४ तासांत कायम राहणार असून, पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
मुख्यालय सोडू नये : भंडारी
अरबी समुद्राच्या पूर्व मध्य दिशेला निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे वादळ व अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यानुसार आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने सर्वांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी केले आहे. वादळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय प्रमुखांनी परवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये, असे आदेशही देण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)

कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मासेमारीला मनाई
रत्नागिरी : पूर्व मध्य अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून, तो पुढील २४ तासांमध्ये उत्तरेकडे सरकण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. पश्चिम किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी व वादळाचा तडाखा बसण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाकडून मच्छिमार नौकांना समुद्रात जाण्याची मनाई करण्यात आली आहे.
मच्छिमार बांधवांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये. तसेच मासेमारीसाठी गेलेल्या बोटींनी किनाऱ्यावर परतावे, असा इशारा अप्पर उपजिल्हाधिकारी गोपाळ निगुडकर यांनी दिला आहे. त्यामुळे शुक्रवारीच या बोटी किनाऱ्यावर परतल्या आहेत.

Web Title: The intensity of the storm increased in the sea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.