विद्यार्थ्यांकडून करताहेत व्याज आकारणी
By admin | Published: December 7, 2015 11:25 PM2015-12-07T23:25:43+5:302015-12-08T00:37:13+5:30
बँक आॅफ इंडियामधील प्रकार : लोकशाही दिनात जिल्हाधिकाऱ्यांची माहिती
सिंधुदुर्गनगरी : शैक्षणिक कर्जावर १०० टक्के व्याज माफ असताना विद्यार्थ्यांकडून व्याज आकारणी करणाऱ्या बँक आॅफ इंडियाच्या पिंगुळी व कुडाळ शाखेविरोधात तक्रार अर्ज आल्याची माहिती सोमवारी जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी लोकशाही दिनात दिली. लोकशाही दिनानंतर आयोजित ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी रविंद्र सावळकर, जिल्हा पुरवठा अधिकारी शरदचंद्र शिरोडकर, नायब तहसीलदार शरद गोसावी उपस्थित होते.
या लोकशाही दिनात दहा अर्ज आले होते. यापैकी चार अर्ज हे लोकशाही दिनाच्या निकषात न बसणारे असल्याने निकाली काढण्यात आले.
प्रत्येकी दोन अर्ज जिल्हा परिषद व महसूल विभागाशी संबंधित होते. कांदळगांव (ता. मालवण) येथील मौखिक परवानगीवर शौचालय बांधकाम केल्यामुळे ते पाडून टाकण्याची कारवाई करणाऱ्या ग्रामपंचायती विरोधातही तक्रार प्राप्त झाली आहे.
जिल्ह्यात २३ केंद्रांवर भात खरेदी मंगळवारपासून सुरु होणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. जिल्ह्यातील भाताची प्रतही दुय्यम असल्यामुळे १४१० रुपये प्रती क्विंटल दर भाताला मिळणार आहे. जिल्ह्यात धान्य उतरविण्यासाठी रॅक उपलब्ध झाल्यावर तसेच या रॅकपासून मुख्य रस्त्यापर्यंत येणारा ६०० मीटरचा रस्ता पूर्ण झाल्यावर जिल्ह्यातील धान्याची अडचण दूर होईल असे यावेळी सांगण्यात आले.
सिंधुदुर्गनगरीतील टाऊन पार्कची तात्पुरती देखभाल करण्याचे कंत्राट कुडाळ येथील बजाज मिल्स या कंपनीने घेतले आहे. या अंतर्गत टाऊन पार्कमध्ये लहान मुलांसाठी खेळणी, बसण्याचे बाकडे लावण्यात येणार आहेत. येथील सुशोभिकरणही त्यांच्यामार्फत केले जाणार आहे असे जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
कुडाळ, पिंगुळीतील शाखेविरोधात तक्रार
शैक्षणिक कर्ज योजनेखाली विद्यार्थ्यांना देण्यात येणारे कर्ज हे १०० टक्के व्याज माफ करून दिले जाते. मात्र, कुडाळ तालुक्यातील दोन विद्यार्थ्यांनी घेतलेल्या शैक्षणिक कर्जावर बँक आॅफ इंडिया कुडाळ व पिंगुळी या दोन शाखांनी व्याज आकारणी केली. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज दाखल झाला. या संदर्भात बँक आॅफ इंडियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे विचारणा करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी सांगितले.