कडावल परिसरात भातकापणीत पावसाचा व्यत्यय
By Admin | Published: October 13, 2015 11:11 PM2015-10-13T23:11:05+5:302015-10-13T23:26:09+5:30
वैरणीच्या टंचाईची भीती : हातातोंडाशी आलेल्या पिकांना सतावतोय धोका
कडावल :कडावल परिसरात भातकापणीस सरुवात झाली असली, तरी रिमझीम पडणाऱ्या पावसामुळे या कामात खोळंबा होत आहे. पावसामुळे कापलेले पीक वाळवता येत नसल्याने भाताच्या दाण्यांना कोंब येण्याचा धोका निर्माण झाला आहे. सरल्याच्या पेंढाही ओल्या राहत असल्याने त्या कुजून पुढील काळात वैरणीची टंचाई निर्माण होण्याची भीती शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.यंदाच्या खरीप भातशेती हंगामात निसर्गाच्या प्रतिकूलतेचा फटका शेतकऱ्यांना वारंवार बसत आहे. यंदा हंगामाच्या सरुवातीला भातपेरणीच्या कालावधीत योग्य प्रमाणात पाऊस पडला. त्यामुळे पेरणीची कामगत विनासायास पार पडली. मात्र, नंतर भात लावणीच्या काळात कित्येक दिवस पाऊस गायब झाल्यामुळे भात लावणीची कामगत बऱ्याच विलंबाने पूर्ण झाली. भातपिकाला ज्या अवस्थेमध्ये पाण्याची सर्वाधिक गरज असते. त्या पोटरी अवस्थेतही पाण्याअभावी पिकांचे हाल झाले. भात पिकाला पाण्याची गरज होती, तेव्हा पाऊस गायब झाला आणि आता भात कापणीच्या वेळी पाऊस व पाऊससदृश वातावरणामुळे शेतकरी पुन्हा अडचणीत सापडले आहेत.यावर्षी परिसरात हळव्या जातीचे काही भाताचे वाण गणेशोत्सव काळातच कापणी योग्य झाले होते. तेव्हा वातावरण कामास अनुकूल होते. पाऊस पडत नव्हता. आकाशही निरभ्र होते. मात्र, गणेशोत्सवाच्या धामधुमीत नाही. आता काही शेतकऱ्यांना भातकापणीस सुरुवात केली असली, तरी पाऊस व पाऊस सदृश वातावरणामुळे कामात अडथळा निर्माण होत आहे. कडावल व हिर्लोक पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी भातकापणीस सुरूवात केली आहे. परंतु भात कापणीच्या मुहूर्ताबरोबरच पावसाचेही पुन्हा आगमन झाल्यामुळे कामांचा खोळंबा होत आहे. अधुनमधून पडणारा पाऊस व अवकाळी वातावरणामुळे शेतकऱ्यांना पूर्ण क्षमतेने काम करता येत नाही.कापून झालेले भातपीक उन्हात वाळविणे गरजेचे असत; परंतु पावसाच्या भीतीने पीक वाळविण्याच्या कामात अडथळा निर्माण होत आहे. कापलेले पीक न वाळवता कवळ्या ठेवून तशीच झोडणी केली जात आहे.त्यामुळे ओलसरपणामुळे भाताला कोंब येण्याचा धोका निर्माण झाला आहे. सरसाच्या पेंढ्याही ओल्या राहत असल्याने त्या कुजून पुढील काळात वैरणीची टंचाई होण्याचीही भीती शेतकरी वर्गातून व्यक्त करण्यात येत आहे. (वार्ताहर)