जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय बुद्धीस्ट सेंटर उभारणार
By admin | Published: May 17, 2016 01:40 AM2016-05-17T01:40:49+5:302016-05-17T01:44:54+5:30
महाथेरा संघसेना यांची घोषणा : बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी प्रयत्न, कणकवलीत आंबेडकर जयंत्ती महोत्सव
कणकवली : गौतम बुध्दांच्या विचाराने प्रेरित झालेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. त्यांचे नाव भारताच्या इतिहासात सोनेरी अक्षरांनी लिहिले गेले आहे. ते कधीही पुसले जाणार नाही. त्यांचे विचार सर्वांनी आत्मसात केल्यास भारत हा देश जागतिक पातळीवर पुन्हा ‘रोल मॉडेल’ बनेल. असे सांगतानाच भारता बरोबरच संपूर्ण जगात बौद्ध तत्वज्ञान प्रस्थापित करण्याबरोबरच शांततेचा संदेश देण्याचा आमचा प्रयत्न आहे. याचाच एक भाग म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘इंटरनॅशनल बुध्दिस्ट सेंटर’ स्थापन करण्यात येईल असे जागतिक बौद्ध महासंघाचे विश्वस्त महाथेरा संघसेना यांनी जाहीर केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १२५ वा जयंती महोत्सव सिंधुदुर्ग जिल्हा बौध्द सेवा संघाच्यावतीने येथील विद्यामंदिर हायस्कुलच्या पटांगणावर रविवारी आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवाचे उद्घाटन प. पू. महाथेरा संघसेना यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. भालचंद्र मुणगेकर, खासदार विनायक राऊत, पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार हुसेन दलवाई, माजी आमदार सुभाष चव्हाण, कोकण सिंचन मंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर, नगराध्यक्षा माधुरी गायकवाड, अरविंद कदम-कांदळगावकर, ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, नाटककार गंगाराम गवाणकर, बौध्द सेवा संघ मुंबईचे जिल्हाध्यक्ष एस. एस. मुंबरकर, बाबुराव सावडावकर, ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष संदीप कदम, सरचिटणीस प्रदीप सर्पे, सावित्रीबाई फुले महिला संघाच्या उपाध्यक्षा प्रज्ञा सर्पे, विद्याधर तांबे आदी उपस्थित होते.
यावेळी महाथेरा संघसेना म्हणाले, हिमालयाच्या पर्वत रांगांमध्ये बौध्द धर्म जतन करून ठेवण्यात आला आहे. आता या धर्माचा पुन्हा सर्वत्र प्रसार करायचा आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यालगत गोवा राज्य असून तेथे अनेक पर्यटक येत असतात. तेथे ही ‘मेडिटेशन सेंटर’ स्थापन करायचे आहे. त्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. लडाख येथे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल पार्क’ स्थापन करायचे असून आॅगस्ट मध्ये त्याठिकाणी त्यांचा पुतळा बसविण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले.
हुसेन दलवाई म्हणाले, बाबासाहेब हे सर्व समाजाचे होते. त्यांच्या विचाराने आम्ही चालणार आहोत. आता आमच्या एका जरी बांधवावर हात उचलला गेला तर आम्ही गप्प बसणार नाही. अन्याय व अत्याचाराविरुध अहिसेंच्या मार्गाने लढा देण्यासाठी रस्त्यावर उतरु. आमच्यातील काहीजण अधिकारी होतात, उच्च पदावर जातात आणि उड्या मारायला लागतात. त्यांना आता ठणकावून सांगायला पाहिजे की, तुम्हाला मिळालेले हे स्थान बाबासाहेबांमुळे आहे. आम्हाला समानता हवी आहे. समरसता नको. त्यामुळे आमची दिशाभूल करणाऱ्या समरसतेला आम्ही लाथ मारतो.
सुभाष चव्हाण म्हणाले, अलीकडे काहीजण घटनेमध्ये बदल करायला निघाले आहेत. मात्र, बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेला हात लावाल तर आम्ही गप्प बसणार नाही. विनायक राऊत म्हणाले, मला संसदेमध्ये जाण्याची संधी प्राप्त झाली आहे ती बाबासाहेबांच्या कल्पनेतून निर्माण झालेल्या घटनेमुळेच. त्यामुळे मी त्यांच्या चरणी कृतज्ञ आहे. बाबासाहेबांचे विचार प्रगल्भपणे राबविण्याची आज गरज आहे. त्यांचे विचार एका चौकटीत मावणारे नाहीत. डॉ. मुणगेकर बाबासाहेबांच्या विचारांची जोपासना करीत आहेत. त्यामुळे त्यांच्या विचारांनाही कोकण भूमी कधीही विसरणार नाही.
दीपक केसरकर म्हणाले, बाबासाहेबांमुळेच दलितांबरोबरच आदिवासी, अल्पसंख्यांक अशा समाजासाठी अर्थसंकल्पात तरतूद करावी लागते. बाबासाहेबांचे नुसते नाव घेऊन चालणार नाही. त्यांचे विचार आत्मसात करावे लागतील. डॉ. मुणगेकरांच्या स्वप्नातला आदर्श सिंधुदुर्ग जिल्हा बनविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करुया, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
मधु मंगेश कर्णिक म्हणाले, शिका, संघटित व्हा, आणि संघर्ष करा असा संदेश बाबासाहेबांनी दिला. मात्र, संघर्ष कुठे तरी संपला पाहिजे. असे मला वाटते. ‘दलित’ हा शब्द ज्यावेळी नष्ट होईल त्यावेळीच खऱ्या अर्थाने समाजातील संघर्ष संपेल. त्यासाठी सर्व समाजाला सुबुद्धी लाभो. यावेळी उर्मिला पवार, गंगाराम गवाणकर, प्रि. आर. एल. तांबे आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक एस. एस. मुंबरकर, संदीप कदम यांनी केले. सूत्रसंचालन राजेश कदम यांनी तर आभार बाबुराव सावडावकर यांनी मानले. या महोत्सवाच्या उदघाटनापूर्वी कणकवली बसस्थानका शेजारील बौद्ध विहाराजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. तर महोत्सव स्थळी शाहिर अजय देहाडे यांचा पोवाड्यांचा कार्यक्रम झाला. अभिवादन सभेनंतर सुप्रसिध्द गायक आदर्श शिंदे आणि सहकाऱ्यांची संगीत रजनी झाली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्मरणिका प्रकाशित करण्यात आली. यामध्ये बाबासाहेबांचे महत्वपूर्ण लेख, दुर्मिळ छायाचित्रांचा समावेश आहे. तर बाबासाहेबांचा जीवनपट उलगडणारी ध्वनिफित यावेळी दाखविण्यात आली. (वार्ताहर)
भालचंद्र मुणगेकर : जातीयता हा आपल्याला लागलेला कलंक
डॉ.भालचंद्र मुणगेकर म्हणाले, आपल्या देशाला अजूनही डॉ.बाबासाहेब आंबेडकर खऱ्या अर्थाने समजलेले नाहीत. देशातील अनेक विद्वान एकत्र केले तरी त्यांची विद्वत्ता बाबासाहेबांच्या पासंगालाही पुरणार नाही. बाबासाहेबांच्या वाट्याला दु:खी जीवन आले. महाभारतातील कर्ण हे एक शापित पात्र आहे. त्याप्रमाणे असामान्य विद्वत्ता असूनही बाबासाहेब सांस्कृतिक जीवनातील शापित आहेत. संस्कृतीच्या नावाखाली आपण गेली अडीच हजार वर्ष विकृतीची जोपासना करीत आहोत. जातीयता हा आपल्याला लागलेला कलंक आहे.