उपअभियंता पवार यांची चौकशी
By admin | Published: January 22, 2016 11:56 PM2016-01-22T23:56:54+5:302016-01-23T00:47:29+5:30
बुर्ली पेयजल अपहार प्रकरण : दोषींवर बडतर्फीची कारवाई
सांगली : राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेच्या बुर्ली (ता. पलूस) येथील नळपाणी पुरवठा कामात ६१ लाख रुपयांच्या अपहारप्रकरणी निलंबित तत्कालीन प्रभारी उपअभियंता एस. एस. पवार यांची विभागीय चौकशी करण्यात येणार आहे. या चौकशीमध्ये दोषी आढळल्यास त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात येणार आहे.
राष्ट्रीय पेयजल योजनेतून २०११-१२ मध्ये बुर्ली येथील नळ पाणी पुरवठा योजनेसाठी १.२५ कोटी रुपये मंजूर झाले होते. या योजनेवर १.१३ कोटी रुपये खर्च झाल्याचे मूल्यांकन तत्कालीन शाखा अभियंता व पलूसचे प्रभारी उपअभियंता पवार यांनी केले होते. या योजनेच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य हेमंत पाटील यांनी सर्वसाधारण सभेत केला होता. त्यांच्या आरोपांची दखल घेत चौकशीचे आदेश अध्यक्षा होर्तीकर यांनी दिले होते.
ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या तासगाव उपविभागाचे उपअभियंते आर. आर. सरक यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. सरक यांच्या अहवालानुसार बुर्ली येथील योजनेच्या कामांचे मूल्यांकन ५२ लाख रुपये झाले होते. तरीही पवार यांनी ते १.२५ कोटी रुपयांचे केले. यामध्ये ६१ लाख रुपयांची तफावत असल्याचा अहवाल त्यांनी दिला होता. हा अपहार असल्याने उपअभियंता पवार यांच्या निलंबनाचे आदेश प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पाटील यांनी दिले आहेत.
दरम्यान, पवार यांची विभागीय चौकशीही करण्यात येणार आहे. या चौकशीत पवार दोषी आढळले तर त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
ठेकेदार संशयाच्या भोवऱ्यात
बुर्ली येथील नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा ठेका सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शन या फर्मला मिळाला होता. या फर्ममध्ये अधिकाऱ्याची पत्नी भागीदार असल्याचा आरोप हेमंत पाटील यांनी केला होता. त्याच्या चौकशीची मागणी होत आहे. ठेकेदाराच्या कामाची चौकशी होणार असून त्याचा अहवाल आल्यानंतर कारवाई केली जाईल, असे जिल्हा परिषदेच्या सूत्रांनी सांगितले.