सराईत आंतरराज्यीय गुन्हेगारास सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक, ३० लाखांचा मुद्देमाल जप्त
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: July 13, 2023 02:14 PM2023-07-13T14:14:57+5:302023-07-13T14:15:27+5:30
कर्नाटक, गोवा व महाराष्ट्र राज्यामध्ये एकुण ४५ घरफोडीकरून चोरींमध्ये सहभाग
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यासह महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा राज्यात तब्बल ४५ घरफोडी करून चोरी करणार सराईत आंतरराज्यीय गुन्हेगारास बुधवारी (१२ जुलै) स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे ताब्यात घेतले आहे. प्रकाश विनायक पाटील (३७ रा. घाटवाडा, पडोसे सत्तरी नॉर्थ गोवा) असे त्या संशयिताचे नाव असून त्याच्याकडून ३० लाख ४८ हजार ७८४ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप भोसले यांच्यासह संशयिताला ताब्यात घेणारी टीम उपस्थित होती. यावेळी पोलीस अधीक्षक अग्रवाल म्हणाले की, १२ जुलै २०२३ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची टीम कणकवली पोलिस ठाणे हद्दीत पेट्रोलींग करीत असताना त्यांना घरफोडीचे गुन्हे करणारा सराईत गुन्हेगार प्रकाश विनायक पाटील हा त्याच्याकडील कार नं. जीए- ०५ एफ ४६०१ ने प्रवास करताना मिळून आला.
त्याला ताब्यात घेवून त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याच्याकडे चोरीसाठी लागणारे साहित्य, चोरी केलेले पैसे व दागिने आणि हत्यारे आढळून आली. त्यामुळे या संशयित आरोपी विरोधात कणकवली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. या गुन्हयाचा पुढील तपास कणकवली पोलिस ठाण्यामार्फतीने सुरु आहे.
तब्बल ४५ गुन्ह्यांची नोंद
संशयित आरोपी प्रकाश पाटील हा घरफोडी चोरी करणारा सराईत गुन्हेगार असून त्याचेविरुध्द सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये ८ गुन्हे, कोल्हापूर जिल्हयामध्ये ९ गुन्हे, गोवा राज्यात ४, कर्नाटक राज्यात २४ असे एकूण ४५ गुन्हे दाखल आहेत. तसेच तो काही गुन्हयांमध्ये पाहिजे व काही गुन्हयांमध्ये फरार आरोपी म्हणून घोषीत आहे.
अग्नीशस्त्र, घातक तलवारी, कोयता, चाकू, सुरा केला जप्त
या संशयित आरोपी विरोधात कणकवली पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करून आरोपीकडून हस्तगत करण्यात आलेली अग्नीशस्त्र व घातक तलवारी, कोयता, चाकू, सुरा यांचा कोणत्या कारणासाठी साठा केलेला होता. याबाबत सखोल चौकशी करण्यात येत असल्याची माहिती पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी दिली.
३० लाख ४८ हजार ७८४ चा मुद्देमाल जप्त
कणकवली तालुक्यातील वागदे येथून ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित आरोपीकडून १ गावठी कट्ठा, ३ जिवंत राऊंड, १ काडतूस बंदूक, २७ जिवंत काडतूसे, ५ तलवारी, ४ लाख ६९ हजार ९५० रोख रक्कम, लोखंडी हातोडे, पक्कड, कटावणी, ११ विविध कंपन्यांचे मोबाईल हॅन्डसेट, १६६ ग्रॅम १६ मिली वजनाचे ९ लाख ६८ हजार ४९० रुपयांच्या किमतीचे सोन्याचे दागिने, ३ लाख ३५ हजार ८४४ रुपये किंमत असलेले ५ किलो ३०० ग्रॅम चांदीच्या विटा व दागिने, पैसे मोजण्याची ईलेक्ट्रीक मशिन, सोने चांदी वितळविण्याची इलेक्ट्रीक मशिन, ३ ड्रिल मशिन, एक दुचाकी व एक चार चाकी वाहन असा एकूण ३० लखा ४८ हजार ७८४ रुपयांचा मुद्देमाल मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
या पथकाने केली कारवाई
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संदिप भोसले, सहा पोलिस निरीक्षक महेंद्र घाग, पोलिस उप निरीक्षक रामचंद्र शेळके, सहा. पोलिस उप निरीक्षक गुरुनाथ कोयंडे, पोलिस अंमलदार राजेंद्र जामसंडेकर, कृष्णा केसरकर, प्रकाश कदम, अनुपकुमार खंडे, आशिष गंगावणे, रुपाली खानोलकर, आशिष जामदार, चंद्रकांत पालकर, चंद्रहास नार्वेकर, रवि इंगळे यांनी केलेली आहे.