भुसभुशीत माती असते तेथेच घुशी घुसतात
By Admin | Published: June 29, 2015 11:24 PM2015-06-29T23:24:18+5:302015-06-30T00:16:40+5:30
राज ठाकरेंचा सावधानतेचा इशारा : दोडामार्गात मनसेचा कार्यकर्ता मेळावा
दोडामार्ग : मुंबईत उपऱ्यांच्या घुसखोरीमुळे जशी परिस्थिती निर्माण झाली, तीच परिस्थिती दोडामार्ग तालुक्याचीदेखील आहे. केरळीयनांची घुसखोरी याठिकाणी वाढली आहे. पण लक्षात ठेवा, जिथे भुसभुशीत माती असते, त्याचठिकाणी घुशी घुसतात. त्यामुळे जर महाराष्ट्र वाचवायचा असेल, तर कातळासारखे, खडकासारखे घट्ट बना. महाराष्ट्र नवनिर्माण सेना परप्रांतीयाविरोधात नेहमी तुमच्या पाठीशी राहील, असे उद्गार मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दोडामार्ग येथे काढले.
दोडामार्ग येथील महालक्ष्मी सभागृहात आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी मनसेचे कोकण संघटक परशुराम उपरकर, जिल्हाध्यक्ष धीरज परब, तालुकाध्यक्ष संतोष आईर, दीपक गवस, श्रेया देसाई उपस्थित होती.
ठाकरे पुढे म्हणाले की, दोडामार्ग तालुका हा निसर्गसंपन्न तालुका आहे. आतापर्यंत याठिकाणी हत्तींचा हैदोस असल्याचे ऐकले होते. मात्र, याठिकाणी आल्यावर केरळीयनांचे प्रताप वाढल्याचे कळले. आज जी परिस्थिती मुंबईत आहे, तीच याठिकाणी सुध्दा आहे. मुंबईत उपऱ्यांचे काय झाले, हे सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळे याठिकाणची भूमी जर वाचवायची असेल, तर परप्रांतीयांना धडा शिकवलाच पाहिजे.
कुठून कुठच्या लुंगीत येतात आणि जमिनी बळकावतात. यांना गप्प राहता कामा नये. नाहीतर एक दिवस रडत बसण्याची वेळ येईल. लक्षात ठेवा, ज्या ठिकाणी भुसभुशीत जमीन असते, तेथेच घुशी घुसतात आणि ज्या ठिकाणी कातळ जमीन असते, त्याठिकाणी घुसखोरी होत नाही. त्यामुळे आपली भूमी आणि महाराष्ट्राला वाचवायचे असेल, तर कातळाप्रमाणे खडकाळ बना. या परप्रांतीयांना धडा शिकवा. आज आपल्यासारखी परिस्थिती इतर राज्यात नाही.
इतर राज्यांमध्ये आपल्याच माणसाची बाजू तिथली राज्य सरकारे, पोलीस यंत्रणा घेत असतात. फक्त आपल्या माणसाची परिस्थिती आहे. आपलीच लोक परप्रांतीयांना प्रोत्साहन देत आहेत.
हे पूर्णत: चुकीचे आहे. त्यामुळे जर आपला महाराष्ट्र वाचवायचा असेल, तर आपल्या या भूमीकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना गप्प बसता कामा नये. मी आणि माझी महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमीच तुमच्या पाठीशी उभी आहे, असे ठाकरे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)