अवैध पोस्टर्स, बॅनर्स रविवारपर्यंत काढा
By Admin | Published: April 21, 2017 10:50 PM2017-04-21T22:50:31+5:302017-04-21T22:50:31+5:30
अवैध पोस्टर्स, बॅनर्स रविवारपर्यंत काढा
सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद व नगरपंचायत हद्दीतील अवैध पोस्टर्स, बॅनर्स, होर्डिंग्स, जाहिरातीचे फलक २३ एप्रिलपर्यंत संबंधितांनी काढावेत. अन्यथा २४ पासून अशांवर पोलिस व नगरपरिषद व पालिका प्रशासनाच्यावतीने संयुक्त धडक मोहीम राबवून अवैध पोस्टर्स, बॅनर्स व जाहिरात लावणाऱ्यांवर विद्रुपीकरण कायद्यान्वये गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक अमोघ गावकर यांनी आयोजित बैठकीत दिली.
शहरांमध्ये लावल्या जाणाऱ्या पोस्टर्स, बॅनर्स, होर्डिंग्सवर कारवाई करण्याच्या दृष्टीने जिल्हा पोलिस अधीक्षक अमोघ गावकर यांच्या अध्यक्षतेखाली अधीक्षक कार्यालयात बैठक पार पडली. यावेळी सावंतवाडी उपविभागीय पोलिस अधिकारी दयानंद गवस सर्व तालुका पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, जिल्ह्यातील सर्व नगरपंचायत व नगरपरिषदेचे मुख्याधिकारी उपस्थित होते.
नगरपालिका व नगरपरिषद हद्दीत राजकीय पक्ष, सामाजिक संस्था व सामान्य नागरिक यापैकी ज्यांनी-ज्यांनी अवैध पोस्टर्स, बॅनर्स, होर्डिंग्स, जाहिराती लावलेल्या आहेत, त्यांनी हे फलक २३ एप्रिल २०१७ पर्यंत काढावेत. २४ रोजी पोलिस प्रशासन व नगरपालिका, नगरपरिषद प्रशासनाच्यावतीने संयुक्त मोहीम राबवून अवैधरित्या लावलेले फलक काढण्यात येणार आहेत. तसेच असे फलक लावणाऱ्यांवर विद्रुपीकरण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच ही कारवाई करणार असल्याचे अमोघ गावकर यांनी बैठकीमध्ये स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
परवानगी घेऊनच
फलक लावावेत
यापुढे नगरपालिका व नगरपरिषद हद्दीमध्ये राजकीय पक्ष, सामाजिक संस्था व सामान्य नागरिक यांना पोस्टर्स, बॅनर्स, होर्डिंग्स व जाहिरातीचे फलक उभारायचे झाल्यास स्थानिक नगरपालिका किंवा नगरपरिषद प्रशासनाकडून कायदेशीर परवानगी घेणे बंधनकारक राहणार असल्याचे पोलिस अधीक्षक अमोघ गावकर यांनी स्पष्ट केले.
...तर छपाई करणाऱ्यांवरही कारवाई
बॅनर्स, होर्डिंग्स, पोस्टर्स, जाहिरातींची छपाई करणाऱ्यांनी छपाई करण्यात आलेल्या व्यक्ती, किंवा संघटनांकडून रितसर परवानगी असल्याबाबत व बॅनर लावण्यात येण्याचा कालावधी याबाबत माहिती द्यावी व ती इतर मजकुरासोबत बॅनर्सवर छापावी, अन्यथा विद्रुपीकरण कायद्यान्वये त्यांच्यावरही कारवाई होऊ शकते, असे संकेत जिल्हा पोलिस अधीक्षक अमोघ गावकर यांनी दिले आहेत.