कणकवलीत स्त्री शक्तीचा आविष्कार
By admin | Published: August 15, 2016 12:02 AM2016-08-15T00:02:10+5:302016-08-15T00:02:10+5:30
श्रावणसरी कार्यक्रम : मिळून साऱ्याजणी महिलामंचचे आयोजन
कणकवली : आपल्या दैनंदिन कामातून थोडासा वेळ काढत ‘फू बाई फू, फुगडी फू दमलास काय माझ्या गोविंदा तू’ अशा विविध फुगडी गीतांच्या साथीने महिलांनी फेर धरला. श्रावणातील फुगड्यांच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने संघटीत स्त्री शक्तिचा जणू आविष्कारच पहायला मिळाला. निमित्त होते ते येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘श्रावणसरी’ या कार्यक्रमाचे.
येथील मिळून साऱ्याजणी महिला मंचच्यावतीने दुर्गाराम मंगल कार्यालयात माजी नगरसेविका मधुरा पालव यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात महिलांचा सहभाग लक्षणीय होता.
श्रावण महिना आला की या महिन्यात अनेक सणही येतात. पूर्वी या सणांच्या निमित्ताने महिला फुगड्या खेळत रात्र जागवित असत. अलीकडे काही गावात अजूनही महिलांकडून फुगड्या घातल्या जात असल्या तरी पूर्वीसारखे चित्र आता पाहायला मिळत नाही. त्यामुळे लोप पावत चाललेल्या या फुगड्यांच्या परंपरेला ऊर्जितावस्था आणण्यासाठी दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन मिळून साऱ्याजणी महिला मंचच्यावतीने केले जाते. कणकवली शहराबरोबरच परिसरातील महिला या कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होत असतात. विरंगुळ्याबरोबरच आपल्या सखींशी हितगुज साधण्याची संधी महिलांना या निमित्ताने मिळत असते. त्यामुळे या कार्यक्रमात बहुसंख्येने महिला सहभागी होत असतात.
यावेळीही काहीशी अशीच स्थिती रेल्वेस्थानकाशेजारील दुर्गाराम मंगल कार्यालयात पाहायला मिळाली. उपस्थित महिलांनी विविध फुुगड्यांचे प्रकार येथे सादर केले. बस फुगडी, कोंबडा, पिंगा अशा प्रकारांचा यात समावेश होता. फुगडीगीतांच्या साथीने फेर धरत महिलानी आनंद लुटला. तर सासरबरोबरच माहेरच्या आठवणी या गीतांच्या माध्यमातून मांडल्या. महिलांसाठी हळदीकुंकू समारंभही यावेळी झाला. यावेळी माजी नगरसेविका समृद्धी पारकर, तेजल लिंग्रज उपस्थित होत्या. (वार्ताहर)