लोखंडी सापळा कोसळला, महामार्ग चौपदरीकरणाचे काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 11:36 AM2019-12-14T11:36:06+5:302019-12-14T11:37:06+5:30
तळेरे येथे मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणातील पुलाचे काम सुरू असताना गुरुवारी दुपारी अचानक पुलाचा तयार करीत असलेला लोखंडी सळ्यांचा सापळा खाली पडला. त्याखाली काम करीत असलेले तीन कामगार त्यात सापडले. त्यामध्ये त्यांना किरकोळ दुखापत झाली असून अधिक उपचारासाठी त्यांना कणकवली येथील खासगी रूग्णालयात हलविण्यात आले. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.
तळेरे : तळेरे येथे मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणातील पुलाचे काम सुरू असताना गुरुवारी दुपारी अचानक पुलाचा तयार करीत असलेला लोखंडी सळ्यांचा सापळा खाली पडला. त्याखाली काम करीत असलेले तीन कामगार त्यात सापडले. त्यामध्ये त्यांना किरकोळ दुखापत झाली असून अधिक उपचारासाठी त्यांना कणकवली येथील खासगी रूग्णालयात हलविण्यात आले. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.
तळेरे एसटी स्थानकासमोर महामार्गाच्या पुलाचे काम सुरू आहे. या कामासाठी पाया टाकून झाला असून त्यावरील काम करण्यासाठी कंपनीचे कामगार स्टील बांधून त्याचा सापळा तयार करीत होते. या दरम्यान अचानक संपूर्ण सापळा खाली पडला. त्यावेळी खाली काम करीत असलेले तीन कामगार त्याखाली सापडले. कित्येक टनाच्या असलेल्या त्या सापळ्याखाली सापडूनही हे कामगार किरकोळ जखमी झाले.
ही घटना घडताच घटनास्थळी बघ्यांची प्रचंड गर्दी जमली. खाली सापडलेल्या त्या तिघांना इतर कामगारांनी बाहेर काढले आणि ताबडतोब अधिक उपचारासाठी कणकवली येथे घेऊन गेले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
विशेष म्हणजे जिथे हा अपघात घडला त्याठिकाणी कोणीही इंजिनिअर अथवा अधिकारी उपस्थित नव्हते. त्यामुळे या कामाच्या बेफिकिरीपणाबद्दल ग्रामस्थांमध्ये चर्चा सुरू होती. यातील जखमींची नावे मिळू शकलेली नाही.