बेजबाबदार अधिकारी धडा घेणार का?

By admin | Published: December 6, 2015 10:16 PM2015-12-06T22:16:58+5:302015-12-07T00:21:53+5:30

कोनाळकट्टा पोस्टात दोनदा अपहार : पोस्टावरील जनसामान्यांच्या विश्वासाला तडा

The irresponsible officer will take the lesson? | बेजबाबदार अधिकारी धडा घेणार का?

बेजबाबदार अधिकारी धडा घेणार का?

Next

गजानन बोंद्रे- साटेली भेडशी--ठेव ठेवण्यासाठी सर्वांत विश्वासार्ह्य म्हणून पोस्ट खात्याकडे पाहिले जाते; पण या विश्वासार्ह्यतेलाच दोडामार्गात तब्बल दोनदा अपहाराने तडा गेला आहे. दोनदा झालेल्या अपहारामुळे केंद्राच्या अखत्यारित असलेल्या पोस्टावरच्या जनसामान्यांच्या आणि ठेवीदारांच्या विश्वासावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दीड महिना सुरू असणाऱ्या चौकशी समितीच्या मंद कामकाजामुळे यातील केवळ एका आरोपीला अटक केली आहे. त्यामुळे यातील मुख्य आरोपी कोण? आणि याविरोधात वरिष्ठ अधिकारी आतातरी येथील कारभाराबाबत धडा घेणार का? असा सवाल निर्माण झाला आहे.
कोनाळकट्टा कार्यालयातील पोस्टमन सुरेश बांदेकरने ठेवीदारांचा मोठा विश्वास संपादन केला होता. त्यामुळे पोस्टातील पैसे काढणे, भरणे यासाठी अनेक खातेदार हे पोस्टात जातच नसत. अशा अनेक खातेदारांचा व्यवहार सुरेश बांदेकरबरोबर कार्यालयाबाहेरही व्हायचा. आपला वेळ आणि त्रास वाचवण्याच्या उद्देशाने अनेक खातेदार कार्यालयात जात नसत. यामुळेच त्यांच्या पायावर कुऱ्हाड कोसळली अन् कोटीच्या अपहाराला हे ठेवीदार बळी पडले. सुरेश बांदेकरने सुरुवातीला दाखवलेला प्रामाणिकपणाच त्याच्या पथ्यावर पडत गेला. त्यामुळेच ठेवीदारांच्या रकमेच्या अपहारालाही चालना मिळत गेली. महिनाभरापूर्वी येथील मुसा नामक ठेवीदाराने आपल्या खात्यातील दोन लाख रुपयांची मागणी केली. मात्र, पोस्टाकडून त्यांना पैसे देण्यास टाळाटाळ होऊ लागली. त्याचवेळी पोस्टमन सुरेश बांदेकर हा गायब झाल्याने मुसा यांना शंका आली. त्यावेळी त्यांनी पोस्टात चौकशी केली असता, त्यांच्या खात्यावर रक्कम शिल्लक नसल्याचे निदर्शनास आले आणि या अपहार प्रकरणाचा उलगडा झाला. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि खातेदारांच्या तक्रारी पोलीस ठाण्यात येऊ लागल्या. पोस्ट कार्यालयात रोज मोठी गर्दी होऊ लागली. त्यावेळी तपासात अनेक ठेवीदारांच्या लाखोंच्या ठेवीच गायब झाल्याचे उघडकीस आले. यातील सर्व ठेवीदार गोरगरीब असून, त्यांना हा एक मोठा मानसिक धक्काच होता. अनेक ठेवीदारांना आपले अश्रू आवरत नव्हते. अनेकवेळा उपाशी राहून, पोटाला चिमटा काढून भविष्यासाठी राखून ठेवलेली संपूर्ण जीवनाची कमाईच गायब झाल्याने त्यांना बसलेला धक्का न पेलवणाराच होता. आमच्या बुडालेल्या ठेवी कोण देणार? आम्ही आता कसे जगावे? आम्हाला कोण आधार देईल? असे प्रश्न ते हतबल होऊन स्वत:ला विचारत होते. त्यामुुळे आता आपण संपलो, अशी भावनाही काही ठेवीदारांनी व्यक्त केली. मात्र, त्यावेळी काही स्थानिक लोकप्रतिनिधींनी अशा ठेवीदारांना धीर देत पैसे परत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले; पण त्यामध्येही सातत्य राहिल्याचे आढळून आले नाही. त्यामुळे हे ठेवीदार हवालदिल झाले आहेत. या अपहार प्रकरणी पोस्टाने सावंतवाडी येथील उपअधीक्षक इंगळे यांच्यासह चौकशी समिती नेमली. या समितीमार्फत खातेदारांच्या खात्यांची चौकशी सुरू झाली. हळूहळू अपहाराच्या रकमेत वाढ होत गेली. त्यानंतर प्राथमिक चौकशीत दोषी आढळलेल्या दोन कर्मचाऱ्यांना पोस्टाने निलंबित केले आणि खातेदारांचे पैसे महिनाभरात देण्याचे आश्वासन पोस्टाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आले. ठेवीदारांच्या संघर्ष समितीच्या सततच्या पाठपुराव्यामुळे ठेवीदारांना एकप्रकारे धीर मिळत होता, पण पोटाला चिमटा काढून जमवलेला पैसा त्यांच्या गरजेला मिळत नसल्याने हे खातेदार रोज पोस्टात चकरा मारत आहेत. त्यांच्या डोळ्यातील आसवे आता आटली आहेत; पण त्यांच्या मनाला बसलेला चटका मात्र त्यांच्या चेहऱ्यावर जाणवत आहे. आज मिळतील, उद्या मिळतील अशा आशेवर हे ठेवीदार आपल्या रकमेकडे डोळे लावून आहेत.
दरम्यान, स्थानिक समितीला हटवून बाह्य जिल्ह्यातील अधिकारी या चौकशीसाठी आणावेत, अशी मागणी ठेवीदार संघर्ष समितीकडून करण्यात आल्याने गुरुवारी रत्नागिरी आणि कोल्हापूर येथील अधिकारी दाखल झाले. त्यांनी या प्रकरणाची रीतसर चौकशी करत ठेवीदारांच्या ठेवींचा परतावा करण्यासाठी क्लेम फॉर्म भरून घेण्यास सुरुवात केली आहे.
पोस्टाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या रीतसर तक्रारीनुसार पोस्टमन बांदेकरला दोडामार्ग पोलिसांनी गोव्यातून अटक केली असता न्यायालयाने त्याला १० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली.


पारदर्शी कारभाराचे आव्हान
ठेवीदारांच्या रकमा परत देण्याचे आश्वासन पोस्टामार्फत दिले जात आहे. मात्र, रक्कम हातात मिळेपर्यंत खातेदारांना धीर मिळणार नाही. त्यामुळे सद्य:परिस्थितीत तरी परिसरातील लोकांच्या पोस्ट खात्यावरील विश्वासाला तडा गेला आहे. त्यामुळे पोस्ट खात्यावरचा विश्वास कायम राखायचा असेल, तर ठेवीदारांच्या रकमा या खात्याला संबंधित ठेवीदारांना लवकरात लवकर द्यावा लागतील. अन्यथा यापुढे कोणीही अशा कार्यालयांवर विश्वास ठेवणार नाही. दोनदा अपहार होऊनही या पोस्टातील कारभारावर अजूनही कोणाचा वचक राहिल्याचे निदर्शनास येत नाही. तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आता तरी यावरून धडा घ्यावा, अशी अपेक्षा सर्वसामान्यांतून व्यक्त होत आहे. शिवाय येथील पोस्ट कार्यालयासह जिल्ह्यातील सर्वच पोस्ट कार्यालयांचा कारभार पारदर्शी करण्याचे आव्हान पोस्टातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर उभे ठाकले आहे.

Web Title: The irresponsible officer will take the lesson?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.