कळसवली प्राथमिक शाळेला ‘आयएसओ’
By admin | Published: March 2, 2016 10:49 PM2016-03-02T22:49:46+5:302016-03-02T23:57:03+5:30
राजापूर तालुका : मानांकन मिळविणारी तालुक्यातील पहिलीच शाळा
वाटूळ : राजापूर तालुक्यातील कळसवली जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा नं. १ला अत्यंत प्रतिष्ठेचे ‘आयएसओ’ मानांकन जाहीर झाले आहे. २६ जानेवारी २०१६ ते १४ सप्टेंबर २०१८ असे दोन वर्षांसाठी हे मानांकन आहे. हे मानांकन मिळालेली राजापूर तालुक्यातील कळसवली ही पहिली शाळा ठरली आहे.
राष्ट्रीय महामार्गापासून ६ किलोमीटर आत असलेल्या या अत्यंत दुर्गम भागातील शाळेची ही प्रगती थक्क करणारी आहे. १२०० लोकसंख्या असलेल्या कळसवली गावातील शाळेची पटसंख्या ७१ इतकी असून, शाळेमध्ये पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग आहेत. मुख्याध्यापक रमाकांत गार्डी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद आदर्श पुरस्कारप्राप्त शिक्षक सीताराम कोसंबी यांनी शाळेचा संपूर्ण कायापालट करुन दाखविला आहे. सन २०१५-१६ या शैक्षणिक वर्षामध्ये शैक्षणिक उठावाच्या माध्यमातून २ लाख ५ हजार इतकी रक्कम शाळेने प्राप्त केली आहे. शाळेमध्ये संगणक-प्रिंटरसहीत झेरॉक्स उपलब्ध असून, विद्यार्थी स्वत: या गोष्टी हाताळतात.
शाळेच्या दर्शनी भागामधील वाढदिवस बाग अत्यंत आकर्षक असून, प्रत्येक विद्यार्थी-विद्यार्थिनी आपल्या वाढदिवसाला एक रोप लावून या बागेचे जतन व संवर्धन करत असतो. भव्य असा प्रार्थना हॉलही शाळेमध्ये बांधण्यात आला आहे. छत्रपती शिवरायांचा इतिहास समजून घेताना मुलांना किल्ल्यांची माहिती होण्यासाठी शिक्षिका भूमिका सावंत यांच्या प्ररेणेने उत्तमप्रकारे किल्ल्यांची प्रतिकृती लावून तसेच शाळेच्या दर्शनी भागावर व वर्गामध्ये शिवरायांच्या जीवनातील ठळक प्रसंगांची चित्रे बसवून विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाच्या आठवणी मूर्त स्वरुपात जाग्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
शाळेच्या यशामध्ये मुख्याध्यापक रमाकांत गार्डी, शिक्षक सीताराम कोसंबी, वृशाली मसुरकर, भूमिका सावंत, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मधुकर शेवडे, तुळसवली सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, केंद्रप्रमुख उदय पांगरीकर यांचा सहभाग आहे. आयएसओ मानांकन मिळवणारी राजापूर तालुक्यातील ‘आयएसओ’ मानांकन प्राप्त करणारी कळसवली ही पहिलीच शाळा ठरल्याने माजी शिक्षण सभापती शरद लिंगायत, उपसभापती उमेश पराडकर, प्रभारी गटशिक्षणाधिकारी सोळुंके आदींनी अभिनंदन केले आहे. (वार्ताहर)