‘कार्बन’चा मुद्दा गंभीर होणार
By admin | Published: March 7, 2016 11:26 PM2016-03-07T23:26:40+5:302016-03-08T00:40:47+5:30
राजेंद्र पत्की : जंगलांना नष्ट होण्यापासून वाचवणं गरजेचं
निसर्गाचा समतोल राखणारी जंगले व वन्यजीव नष्ट होऊ लागल्याने पर्यावरणाचा असमतोल वाढला आहे. आता आपल्याला मिळणारा कार्बन, मोकळी हवा ही मोफत मिळते. वृक्षापासून कार्बन मिळतो. परंतु, भविष्यात जंगले नष्ट झाली, तर कार्बन क्रियेटचा मुद्दा फार गंभीर होणार आहे. भविष्यातील काळाची पाऊले ओळखून जंगले नष्ट होण्यापासून रोखली तरच कार्बनचा मुद्दा सुटू शकेल. अन्यथा...भविष्यात कार्बन विकत घेण्याची वेळ मनुष्यावर येऊ शकते. आता अनेक ठिकाणी डोंगर उघडेबोडके झाले आहेत. डोंगरांवरील वनसृष्टी नाहीशी होऊ लागली तर तापमानात तर वाढ होईलच; परंतु, वन्यप्राण्यांचा मानवी वस्तीतील वावरही वाढेल. आत्तापासूनच वन्यप्राण्यांचा वावर हा चिंतेचा विषय झाला आहे, असे मत वन परिक्षेत्र अधिकारी राजेंद्र पत्की यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
प्रश्न : वनसंपदा नष्ट होतेय का?
उत्तर : पूर्वीच्या काळी नैसर्गिक वनसंपदा होती. आता मात्र नैसर्गिक वनसंपदा नष्ट होऊन सिमेंटची जंगले निर्माण होत आहेत. ज्या शेतकऱ्याकडे स्वत:ची जमीन आहे, शेतीसाठी त्या जमिनीतील जंगल तोडण्यात येत आहे. शेतकरी आपल्या जागेतील झाडे तोडून शेती करत आहेत. काही ठिकाणी शेतातील झाडे तोडून शेतकरी उदरनिर्वाह करत आहे, पारंपरिक सण, वन्य प्राण्यांपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी जंगले तोडली जात आहेत, शेतीची अवजारे, फर्निचर, जळाऊ लाकूड यासाठी मोठ्या प्रमाणात जंगलतोड केली जात आहे. त्यामुळे जंगले नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. वनसंपदा, वन्यजीव दरही कमी होत असल्याने मानवी जीवनावर होणारे अनेक दुष्परिणाम आपण पाहिले आहेत.
प्रश्न : कार्बन क्रियेट करण्याची गरज आहे का?
उत्तर : मानवाला झाडांपासून कार्बन मिळतो. परंतु, अलीकडच्या काळात जंगले नष्ट होण्याच्या वाटेवर असल्याने कार्बनचा मुद्दा गंभीर होत आहे. कार्बन क्रियेट करण्यासाठी काही जंगली झाडं लावण्याची गरज आहे. कारण या झाडापासून मोठ्या प्रमाणावर कार्बन मिळू शकतो. परदेशात कार्बन क्रियेटमधून शेतकऱ्याला रुपये मिळतात. कार्बनची उणीव भासू नये म्हणून अनेक मोठ्या कंपन्या थेट शेतकऱ्यांना झाडे लावायला सांगतात. शेतकऱ्याला झाडापासून उत्पन्न मिळते. कंपनीला त्यापासून कार्बन मिळतो. त्यामुळे शेतकऱ्याचा दुहेरी फायदा होतो. परंतु आपल्या देशात शेतकऱ्याने सांभाळलेल्या झाडाचा फायदा सर्वांना होतो. अशी झाडे ज्या शेतकऱ्याच्या जमिनीत आहेत त्यांना कार्बनपासून आर्थिक लाभ मिळण्याची गरज आहे. भविष्यात झाडे तोडल्याने नाहीतर झाडे जगवल्याने जास्त उत्पन्न मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कार्बनमुळे चांगला आर्थिक फायदा होऊ शकतो. परंतु त्यासाठी गरज आहे जंगले रोखण्याची व वृक्ष लागवडीची.
प्रश्न : वनसंपदा टिकेल यासाठी वन विभाग कोणते प्रयत्न करतंय?
उत्तर : वनसंपदा टिकवण्याची जबाबदारी केवळ वन विभागाची नाही. वनसंपदा टिकवण्यासाठी समाजाने पुढाकार घेण्याची गरज आहे. वन विभाग केवळ सरकारी जागेतील वनसंपदेचे रक्षण करु शकते. परंतु, खासगी मालकीच्या जमिनीतील वृक्षतोड टाळण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे. वन विभाग प्रत्येक ठिकाणी प्रतिबंध घालू शकत नाही. कायद्याच्या चौकटीत राहून शासनाला काम करावे लागते. आम्ही जनजागृती करु शकतो. जंगले टिकवण्याची जबाबदारी समाजाची आहे. अवैध वृक्षतोड टाळणे, कुऱ्हाडबंदी, शिमग्याला होळीसाठी झाडाची होळी लावून पेटवणे यासाठी वृक्षतोड केली जाते, हे टाळले पाहिजे.
प्रश्न : वन व्यवस्थापन समितीची कार्य कोणती?
उत्तर : वन व्यवस्थापन समितीमार्फत वनसंवर्धन व वन्यजीव प्राणी संरक्षण करण्याचा मुख्य हेतू शासनाचा आहे. गावातील अवैध वृक्षतोड रोखणे, कुऱ्हाडबंदी, जंगलतोड बंदी, वृक्ष लागवड करणे, वनांचे महत्त्व पटवून देणे, वन्य प्राण्यांचे महत्त्व पटवून देणे ही वन व्यवस्थापन समितीची कार्ये आहेत. गावागावात वन व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने वन विभागाला बळकटी मिळत आहे. अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे सर्वच ठिकाणी वन विभाग कर्मचाऱ्यांना पोहोचणे शक्य नसते. कारण एका कर्मचाऱ्यावर १० ते २० गावे सोपवली आहेत. प्रत्येक ठिकाणी पोहोचणे शक्य नसते. मात्र, शासनाने प्रत्येक गावात आता वन व्यवस्थापन समिती स्थापन केल्यामुळे वन्यजीव संरक्षण व वनसंवर्धन होण्यास मदत होत आहे.
प्रश्न : वन्य प्राण्यांची शिकार हा चिंतेचा विषय आहे का?
उत्तर : वन्यप्राणी शिकार हा चिंतेचा विषय आहे. कारण वन्यजीव प्राणी संख्या घटत चालली आहे. त्याची अनेक कारणे आहेत. वन्य प्राण्यांच्या शिकारीतून अवयवांची तस्करी केली जाते. जागतिक बाजारपेठेत वन्य प्राण्यांच्या अवयवांची वाढलेली किंमत तस्करीला प्रोत्साहन देणारी आहे. यावर प्रतिबंध घालण्यासाठी शासनाने कठोर कायदा केला आहे. परंतु, या क्षेत्रात तज्ज्ञ व आधुनिक यंत्रसामुग्रीची गरज आहे. शिकारीमुळे वन्य प्राण्यांची संख्या घटते आहे. काही ठिकाणी तर भूकबळीमुळे वन्य प्राण्यांचा मृत्यू होऊ लागला आहे. दुष्काळामुळे पाण्याचे प्रवाह बदलत आहेत. पाणीटंचाईचा फटका वन्य प्राण्याला बसून त्याचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्याने वन्य प्राण्यांसाठी पाणवठे निर्माण करणे, तळे निर्माण करणे यावर लक्ष देण्यात येत आहे. काही वन्यजीवांचे खाद्य संपुष्टात आल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. निसर्गाच्या चक्रातील अनेक महत्त्वाच्या प्रजाती भूतलावरुन नष्ट झाल्या आहेत. अनेक प्रजाती दुर्मिळ होत आहेत. त्या जगविण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे.
प्रश्न : वनग्राम योजना काय आहे?
उत्तर : संत तुकाराम वनग्राम योजना राज्यात सुरु आहे. या योजनेच्या माध्यमातून वन व्यवस्थापन समितीच्या मदतीने अवैध वृक्षतोड, अवैध शिकार, रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे. लोकांमध्ये जनजागृती निर्माण करुन वृक्ष लागवड व वनांचे महत्त्व पटवून दिले जात आहे. संत तुकाराम वनग्राम पुरस्कार जाहीर करुन शासनाने चांगला संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.
प्रश्न : बिबट्या, गिधाड यांची स्थिती सध्या काय आहे?
उत्तर : दुर्मिळ वनस्पती व वन्यजीव जगविण्याचे मोठे आव्हान वन विभाग, पर्यावरणप्रेमी यांच्यासमोर आहे. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी निसर्गाच्या साखळीतील प्रत्येक घटकाचे फार महत्त्व आहे. त्यामुळे शासन याबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करत आहे. देशात बिबट्यांच्या संख्येत होणारी घट चिंताजनक आहे. निसर्गाचा स्वच्छतादूत म्हणून ओळखली जाणारी गिधाडे दुर्मिळ होऊ लागली आहेत. यासाठी त्यांची घरटी शोधणे व त्याठिकाणी पाणी, खाद्य उपलब्ध करुन देण्याचे काम सुरु आहे. यासाठी शासन स्तरावरुन मोठ्या प्रमाणावर प्रयत्न होऊ लागल्याने दुर्मिळ गिधाड व बिबट्यांच्या संख्येत अलिकडे वाढ झाली आहे.
प्रश्न : सामान्य नागरिकांना आपण वन खात्यातर्फे काय सांगाल?
उत्तर : जंगलतोडीमुळे वन्यप्राणी अन्नाच्या शोधात मानवी वस्तीत प्रवेश करत असल्याच्या घटना अलीकडे वाढल्या आहेत. बिबट्यांचे वस्तीवरील हल्ले वाढले आहेत. याबाबत आपण वारंवार वृत्तपत्र किंवा टेलिव्हिजनच्या माध्यमताून पाहतो, वाचतो. परंतु, याला जबाबदार कोण? कारण वन्य प्राण्यांच्या जंगलावर आपण आक्रमण केले आहे. मग प्राण्यांनी कुठे जायचे. जंगली प्राण्यांच्या होत असलेल्या शिकारीमुळे अनेक प्रजाती नष्ट होत आहेत.
अनेक हिंस्त्र प्राणी अन्नाच्या शोधात वस्तीवर हल्ले करत आहेत. आपण म्हणतो वन्य प्राण्यांचे वस्तीवर हल्ला केला. ज्यांचे घर आपण नष्ट केले, तर त्यांनी जगायचे कसे? जीवन हे निसर्गचक्रावर अवलंबून आहे. या निसर्गचक्रात वन्य प्राण्यांचे जीवन फार महत्त्वाचे आहे. कार्बन क्रियेटसाठी जंगलाचा वापर झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक लाभ होईल व शेतकरी वृक्ष तोडून उत्पन्न मिळवण्याऐवजी वृक्ष वाढवून पैसे मिळवतील.
- शिवाजी गोरे