तळवडेतील पोषण आहाराचा वाद वाढू लागला
By admin | Published: July 25, 2016 12:37 AM2016-07-25T00:37:18+5:302016-07-25T00:37:18+5:30
राजकीय सावटामुळे गुंता वाढला : संस्था चालकांनी योग्य तोडगा काढण्याची गरज
तळवडे : पोषण आहार योजनेत प्रशालेचे मुख्याध्यापक, प्रशासकीय कर्मचारी शिक्षकवर्ग बळी पडत आहेत. असाच प्रकार तळवडे श्री जनता विद्यालयात घडला आहे. या विद्यालयातील पोषण आहाराचा वाद काहीही केल्या मिटत नसल्याचे दिसत असून, उलट वाढण्याचीच चर्चा आहे. पण या वादावर प्रशालेच्या संस्थाचालकांनी योग्य तोडगा काढणे गरजेचे आहे.
तळवडे विद्यालयात पोषण आहार वाद गेले आठ महिने गाजत आहे. या पोषण आहारावरून या प्रशालेचे मुख्याध्यापक श्यामसुंदर मालवणकर यांना पोषण आहारात दोषी आढळल्याचे कारण देत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षण विभागाच्या आदेशानुसार निलंबित केले होते. त्यानंतर या प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक म्हणून मनीषा पाटील यांची नियुक्ती शिक्षण विभागाच्या आदेशानुसार व संस्था, पदाधिकारी यांच्या आदेशानुसार करण्यात आली. पण या दोन्ही मुख्याध्यापकांना पालकांच्या आक्षेपाला सामोरे जावे लागले.
पोषण आहार हा असा घटक आहे की, मुलांच्या खाण्यावरून त्याचे प्रमाण कमी-जास्त होत असते. याची योग्य नोंद ठेवणे प्रत्येक प्रशालेच्या मुख्याध्यापकासाठी कठीण गोष्ट आहे. कारण यात तांत्रिक त्रुटी आहेत.
यापूर्वी या प्रशालेचे मुख्याध्यापक श्यामसुंदर मालवणकर याच्यावर पोषण आहाराचा वाढीव साठा आढळल्याने कारवाई करण्यात आली होती. पण आता विरोधी प्रकाश परब गटाने सुध्दा शिक्षण विभाग व प्रशासनाला या शाळेच्या पोषण आहाराची तपासणी करण्यासाठी भाग पाडले. त्यामुळे याठिकाणी प्रभारी मुख्याध्यापक यांच्या कार्यकाळातही पोषण आहार साठा जास्त आढळला. पोषण आहार शिल्लक आढळल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.
काही दिवसांपासून हा पोषण आहार वाद वाढत असल्याने या विद्यालयातील विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जात नाही. या प्रशालेतील पालकांचे वारंवार पोषण आहारावरून वाद होतात. त्यामुळे पोषण आहार संबंधित कर्मचाऱ्यांनी शिजवू नये, असे पत्र प्रभारी मुख्याध्यापक मनीषा पाटील यांना शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले आहे.
त्याचप्रमाणे या प्रशाळेच्या पोषण आहारावरून दोन गट गावात पडले आहेत. हा वाद कायदेशीर लढाईच्या तयारीत आहे. तळवडे जनता विद्यालयाच्या शालेय पोषण आहारावरून निलंबित करण्यात आलेले मुख्याध्यापक श्यामसुंदर मालवणकर यांना संस्थेच्या सचिवांनी हजर करून घेतले. त्यामुळे संस्थेच्या अध्यक्षांनी पोलिस ठाणे गाठले. मुख्याध्यापक मालवणकर यांना पोषण आहारात दोषी ठरवून शिक्षण विभाग व संस्थेच्या अध्यक्षांनी, पदाधिकाऱ्यांनी निलंबित केले होते. विलंबन होऊन १२० दिवस उलटले होते. त्यामुळे संस्थेचे सचिव अरूण मालवणकर यांनी श्यामसुंदर मालवणकर यांना मुख्याध्यापक पदावर रूजू करून घेतले. त्यामुळे यासंदर्भात संस्थाध्यक्ष विष्णू पेडणेकर यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
तळवडे येथील जनता विद्यालय व मळेवाड विद्यालय. श्री जनता विद्यालयाचा हा वाद न्यायालयात गेला आहे. (प्रतिनिधी)
हेव्यादाव्यांची मुख्याध्यापकांना झळ
जिल्ह्यातील प्रत्येक प्रशालेत पोषण आहार शिल्लक राहतोच. यात कुठलाही मुख्याध्यापक तोडगा काढू शकत नाही. हे शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनाही माहीत आहे. पण प्रशासनाने पोषण आहार योजना प्रशालेच्या मुख्याध्यापकांवर सोपविल्याने शिक्षणाचा दर्जा ढासळला आहे. याचा विद्यार्थ्यांवर परिणाम होत आहे. एखाद्या संस्थेत राजकीय वाद, हेवेदावे असल्यावर मुख्याध्यापक भरडले जातात. अशा राजकीय वादाचा फटका तळवडेतील मुख्याध्यापक श्यामसुंदर मालवणकर व प्रभारी मुख्याध्यापक मनीषा पाटील यांना बसत आहे.