मल्टीस्पेशालिटीच्या जागेचा गुंता कायम, बैठकीत तोडगा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2020 04:36 PM2020-11-02T16:36:16+5:302020-11-02T16:38:38+5:30

Sawantwadi, hospital, sindhudurg, abdulsattar, deeakkesrkar, सावंतवाडीतील मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाच्या जागेबाबतचा तिढा सुटलेला नाही. हा तिढा सुटावा म्हणून महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी येथील राजवाड्यात जाऊन खेमसावंत भोसले यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेतून जागेचा प्रश्न मार्गी लागलाच नाही. पण गुंता अधिकच वाढला.

The issue of multispeciality space remains, there is no settlement in the meeting | मल्टीस्पेशालिटीच्या जागेचा गुंता कायम, बैठकीत तोडगा नाही

महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी राजवाड्यात जाऊन खेमसावंत भोसले यांंची भेट घेतली. यावेळी दीपक केसरकर, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, वसंत केसरकर आदी उपस्थित होते.

Next
ठळक मुद्देमल्टीस्पेशालिटीच्या जागेचा गुंता कायम, बैठकीत तोडगा नाही केसरकरांनी आपली जमीन द्यावी : खेमसावंत

सावंतवाडी : सावंतवाडीतील मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाच्या जागेबाबतचा तिढा सुटलेला नाही. हा तिढा सुटावा म्हणून महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी येथील राजवाड्यात जाऊन खेमसावंत भोसले यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेतून जागेचा प्रश्न मार्गी लागलाच नाही. पण गुंता अधिकच वाढला.

खेमसावंत यांनी बैठकीत माजी मंत्री दीपक केसरकर यांच्यावर शरसंधान केले. आम्ही बाजारभावापेक्षा कमी दराने जमीन देत असताना तुम्ही आमची जमीन पाडून का मागता? मग तुमचीच जमीन द्या, असे सांगितले. तर मंत्री सत्तार यांना तुम्ही आपली जमीन दिली असता का, असा थेट सवाल करीत आम्ही आमचा प्रस्ताव महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना दिला असल्याचे सांगितले.

सावंतवाडी मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाच्या जागेबाबतचा प्रश्न अद्याप सुटला नसून, यावर तोडगा काढण्यासाठी महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे रविवारी राजवाड्यात आले होते. यावेळी माजी मंत्री दीपक केसरकर, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत वसेकर, प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, तहसीलदार राजाराम म्हात्रे, शिवसेना नेते वसंत केसरकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, तालुकाप्रमुख रूपेश राऊळ आदी उपस्थित होते.

सावंतवाडी शहरात मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभे राहत आहे. मात्र, या रुग्णालयाच्या जागेचा वाद आहे. या जागेवर भूमिपूजन झाले आहे पण अद्याप पुढचे काम सुरू झाले नाही. या जागेचा वाद सुटावा यासाठी सध्या शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. मात्र अद्याप तोडगा निघत नाही. त्यामुळे या जागेचा वाद मिटावा म्हणून महसूल राज्यमंत्री सत्तार यांनी राजवाड्यात जाऊन खेमसावंत भोसले यांची भेट घेतली. मंत्री सत्तार यांनी यात तोडगा काढण्याचा प्रयत्न केला पण आम्ही आमच्या दरावर ठाम असल्याचे खेमसावंत भोसले यांनी सांंगितले.

तुम्ही राजा आहात, यावर तोडगा काढा : सत्तार

यावेळी मंत्री सत्तार यांनी तुम्ही राजा आहात. तुमचेच हे सगळे आहे. त्यामुळे तुम्ही चांगल्या कामाला जमीन देणार आहात. त्यामुळे त्यावर तोडगा काढा, अशी विनवणी केली. पण खेमसावंत भोसले यांनी याला स्पष्ट शब्दांत नकार दिला.

तसेच आम्ही आमचा प्रस्ताव महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे पाठवल्याचे सांगितले. तसेच जिल्हाधिकारी यांनाही कल्पना दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी मंत्री सत्तार यांनी आम्ही औरंगाबाद येथे वैद्यकीय महाविद्यालयासाठी १०० एकर जमीन दान स्वरुपात दिल्याची आठवणही खेमसावंत भोसले यांना सांंगितली.

राजघराण्याचा गैरसमज दूर करा

मंत्री सत्तार यांनी बरीच विनवणी केली. पण त्यातून कोणताही तोडगा निघत नसल्याचे पाहून मंत्री सत्तार यांनी काढता पाय घेतला. तर माजी मंत्री दीपक केसरकर यांनी राजघराण्याचा काही तरी गैरसमज झाला असेल. तो दूर केला जाईल, असे सांगितले. त्यामुळे हा प्रश्न पुन्हा रेंगाळणार आहे.
 

Web Title: The issue of multispeciality space remains, there is no settlement in the meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.