राजापूर तालुक्याच्या विभाजनाचा मुद्दा ऐरणीवर

By admin | Published: August 18, 2015 11:12 PM2015-08-18T23:12:23+5:302015-08-18T23:12:23+5:30

सर्वांचे लक्ष : रायपाटण, पाचलबाबत चर्चांना ऊत

The issue of partition of Rajapur taluka is on the anvil | राजापूर तालुक्याच्या विभाजनाचा मुद्दा ऐरणीवर

राजापूर तालुक्याच्या विभाजनाचा मुद्दा ऐरणीवर

Next

राजापूर : राज्य शासनाने २२ नवीन जिल्हे व ४९ तालुक्यांच्या निर्मितीबाबत सकारात्मकता दाखवल्याने राजापूर तालुक्याच्या विभाजनाचा मुद्दा आता ऐरणीवर आला आहे. त्यानुसार मागील अनेक वर्षे सातत्याने मागणी होत असलेल्या पूर्व परिसरातील रायपाटण व पाचल या दोन गावांच्या नावाची नवीन तालुक्यासाठी चर्चा सुरु झाली आहे.गेली अनेक वर्षे राजापूर तालुक्याचे विभाजन करून नवीन तालुका निर्माण करावा, अशी मागणी सातत्याने रेटून धरली जात आहे. त्यानुसार तालुक्याचे नियोजित ठिकाण हे आपल्या गावी असावे, अशी मागणीही मागील काही वर्षे रायपाटणसह पाचलवासीयांनी कायम ठेवली आहे.
राजापूर तालुका हा भौगोलिकदृष्ट्या आकारमानाने विशाल असून, पूर्वेकडे सह्याद्री, तर पश्चिमेला अरबी समुद्र असा विस्तारलेला आहे. राजापूर शहर तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण असले तरी त्या ठिकाणापासून अनेक गावे खुप दूरवर आहेत. त्यामध्ये पुर्व परिसरातील गावे तर अती दुर्गम अशा ठिकाणी आहेत. परिणामी शासकीय कामकाजासाठी जनतेला राजापूरला येताना खूप दगदग सहन करावी लागते. त्यामुळे राजापूर तालुक्याचे विभाजन करुन नवीन तालुक्याची निर्मिती करावी, अशी सातत्याने मागणी होत आहे.रायपाटण व पाचलने ही मागणी रेटून धरली असली तरी रायपाटण गावची एक ‘फाईल’ यापूर्वीच मंत्रालयात सादर झाली आहे. याआधीच्या अनेक विधिमंडळ अधिवेशनात रायपाटण तालुका निर्मितीबाबतचे प्रश्न वेळोवेळी उपस्थित केले होते. मात्र, वेळोवेळी आर्थिक चणचण हेच कारण पुढे करत वेळ मारुन नेण्यात आली होती. आता खुद्द शासनानेच २२ नवीन जिल्हे व ४९ तालुक्यांच्या निर्मितीचा प्रश्न हाती घेत सकारात्मकता दाखवली आणि तालुका विभाजनासह पूर्व परिसरातील नवीन तालुका निर्मितीचा धूळ खात पडून राहिलेला प्रश्न अचानक उसळी मारत वर येण्याच्या मार्गावर आहे.
सध्या दोन गावात तालुक्यांसाठी प्रचंड चुरस आहे. त्यामध्ये मोठी बाजारपेठ व विभागाची महत्वपूर्ण शासकीय कार्यालये असल्याची पाचलची हीच जमेची बाजू असतानाच दुसरीकडे तालुका निर्मितीनंतर शासकीय कार्यालयीन इमारतींसाठी लागणारी आवश्यक जागा रायपाटण गावात आहे. ही बाब रायपाटणच्या पथ्यावर पडणारी आहे. त्यामुळे आता शासन प्रथम राजापूर तालुक्याचे विभाजन करत नवीन तालुक निर्मितीसाठी आग्रही आहे का, हा खरा सवाल आहे.
शासन त्यासंदर्भात सकारात्मक राहिले तर रायपाटण की पाचल, यापैकी कुणाची निवड करते की, अन्य पर्याय निवडते याकडे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)


जैतापूरलाही आशा
देशातील सर्वांत मोठा सुमारे १० हजार मेगावॅट अणुऊर्जा निर्मिती करणारा प्रकल्प जैतापुरात होऊ घातला आहे. पश्चिम भागातील सुमारे ४० ते ५० गावांसाठी यापूर्वी सागरी पोलीस ठाणे, नाटे येथे स्थापन करण्यात आले आहे. त्यामुळे भविष्यात जैतापूर परिसराचा होणारा विकास लक्षात घेता शासन त्या परिसराची नवीन तालुक्यासाठी निवड करु शकते.

Web Title: The issue of partition of Rajapur taluka is on the anvil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.