सावंतवाडी ‘चर्च’चा वाद संपुष्टात

By admin | Published: April 10, 2016 09:51 PM2016-04-10T21:51:02+5:302016-04-11T00:54:31+5:30

राष्ट्रीय लोकअदालतीचे यश : ४० वर्षांनंतर नूतनीकरणाला परवानगी

The issue of Sawantwadi 'church' ended | सावंतवाडी ‘चर्च’चा वाद संपुष्टात

सावंतवाडी ‘चर्च’चा वाद संपुष्टात

Next

सावंतवाडी : सावंतवाडी-सालईवाडा येथील जुन्या चर्चच्या नूतनीकरणासंदर्भात गेली ४० वर्षे सुरू असलेला वाद शनिवारी येथे झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत मिटविण्यात आला. ज्या लोकांचा नूतनीकरणासाठी विरोध होता, त्यांची समजूत घालून चर्चच्या नूतनीकरणासाठी परवानगी मिळाल्याने वादपूर्व प्रकरण हाताळण्यास लोकअदालतीला यश मिळाले आहे.
तालुका विधी सेवा समिती सावंतवाडी आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीचे शनिवारी येथील न्यायालयात आयोजन करण्यात आले होते. याचे उद्घाटन न्यायाधीश खालिद भेंडवडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सहदिवाणी न्यायाधीश दस्तगीर पठाण, प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, नगरपरिषद मुख्याधिकारी विजयकुमार द्वासे, तहसीलदार सतीश कदम, सहायक गटविकास अधिकारी मोहन भोई, अ‍ॅड. शामराव सावंत, आदी उपस्थित होते.
सावंतवाडी न्यायालयात आयोजित करण्यात आलेल्या लोकअदालतीत ३६२ खटले ठेवण्यात आले होते. यातील १५९ खटले निकाली काढण्यात आले व ८ लाख ९ हजार ४६० एवढा दंड न्यायालयाने वसूल केला आहे. यामध्ये राष्ट्रीय बँका, नगर परिषद सावंतवाडी, तहसीलदार, प्रांत कार्यालय अदखलपात्र गुन्हे यांचा समावेश होता. या लोकअदालतीत सालईवाडा येथील ३६० वर्षे झालेल्या जुन्या चर्चच्या नूतनीकरणावरून गेली ४० वर्षे वाद सुरू होता. हे प्रकरण तडजोडीने मिटविण्यात यावे, यासाठी फादर इलियास रॉड्रिग्स व नूतनीकरणाला विरोध असणारे सर्वजण लोकअदालतीस उपस्थित होते. यावेळी चर्चच्या नूतनीकरणाला संमती देऊन हा वाद संपुष्टात आणण्यात आला. (वार्ताहर)

Web Title: The issue of Sawantwadi 'church' ended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.