राजकोट किनाऱ्यावर शिव पुतळा उभारण्याचे निश्चित, किल्ले सिंधुदुर्गच्या दिशेने असणार दर्शनी बाजू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2023 03:43 PM2023-09-30T15:43:36+5:302023-09-30T15:44:10+5:30
यंदाचा भारतीय नौसेना दिन ४ डिसेंबर रोजी किल्ले सिंधुदुर्गवर साजरा होणार,
मालवण: यंदाचा भारतीय नौसेना दिन ४ डिसेंबर रोजी किल्ले सिंधुदुर्गवर साजरा होणार आहे कार्यक्रमापूर्वी सुमारे ३५ फूट उंचीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा राजकोट समुद्रकिनारी बसविण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा दर्शनीभाग हा किल्ले सिंधुदुर्गच्या दिशेने असणार आहे. छत्रपतींच्या हातात तलवार असलेला पुतळा उभारण्यात येणार आहे. या पुतळ्याचे सादरीकरण मुंबईत झाल्यानंतर पहिल्यांदा पुतळ्याची प्रतिकृती पाहायला मिळाली आहे. पुतळ्याच्या परिसरात किल्ले सिंधुदुर्गप्रमाणे तटबंदी उभारण्यात येणार आहे. संपूर्ण परिसर या शिवकालीन वातावरण निर्माण करणारा बनविण्यात येणार असल्याचीही माहिती उपलब्ध झालेली आहे.
यंदाचा नौसेना दिवस छत्रपती शिवाजी महाराजांच्या लौकिकाला साजेसा आणि भव्य दिव्य स्वरुपात झाला पाहिजे, यासाठी सर्व कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्यात यावीत, असे निर्देश उपस्थित अधिकाऱ्यांना पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले आहेत. यामुळे प्रशासनाकडून युद्धपातळीवर कार्यवाही सुरू करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
मालवण शहरात एकही शिवपुतळा नाही
छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी व पराक्रमाची साक्ष देत गेली साडेतीनशे वर्षे ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला अरबी समुद्रात डौलाने उभा आहे. येथील किल्ल्यात महाराजांचे शिवराजेश्वर मंदिर आहे. म्हणूनच 'किल्ले सिंधुदुर्ग'ला असंख्य शिवप्रेमी खरेखुरे राष्ट्रीय 'शिवस्मारक' मानतात. छत्रपती शिवाजी महाराज खऱ्या अर्थाने भारतीय नौदलाचे जनक आहेत. ते तमाम मराठीजनांचे स्फूर्तिस्थान आहेत. मालवण शहर छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पुनित झालेले आहे. मात्र, शहर व शिवलंका किल्ले सिंधुदुर्गवर छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा अद्याप उभारला गेला नसल्याची खंत शिवप्रेमींच्या मनात होती. भारतीय नौदलाने राजकोट समुद्रकिनारी पुतळा बसविण्याचा निर्णय घेतल्याने आज सर्वत्र आनंदी वातावरण पसरले आहे.
पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण?
पुतळ्याचे अनावरण ४ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होण्याची दाट शक्यता आहे. गतवर्षी २ सप्टेंबर रोजी भारताची स्वदेशनिर्मित सर्वात मोठी विमानवाहू नौका 'विक्रांत'चे उद्घाटन मोदींच्या हस्ते झाले होते. या कार्यक्रमात मोदींच्या हस्ते नौदलाला नवे ध्वजचिन्ह प्रदान करण्यात आले होते. हे ध्वजचिन्ह शिवाजी महाराजांना समर्पित असल्याची घोषणा पंतप्रधानांनी केली होती.
नौदलाकडून कार्यक्रम निश्चित
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत यंदाचा नौसेना दिन सिंधुदुर्ग किल्ल्यावर साजरा करण्यासाठी नौदलाकडून जोरदार हालचाली सुरू आहेत. तसा कार्यक्रमही निश्चित झाला आहे. जिल्हा प्रशासन त्या अनुषंगाने कामालाही लागले आहे. या सोहळ्याच्या प्राथमिक तयारीचा भाग म्हणून वेस्टर्न नेव्हल कमांड फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ दिनेश त्रिपाठी यांनी किल्ला परिसराची पाहणी केली होती. ३ आणि ४ डिसेंबर असे दोन दिवस हा सोहळा रंगेल. मुख्य कार्यक्रम ४ डिसेंबरला होईल. फोटो