आम्ही आमच्या कार्यालयात प्लास्टिकचा वापर करीत नाही, तुम्ही...?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2019 04:54 PM2019-10-09T16:54:59+5:302019-10-09T16:59:04+5:30
आम्ही आमच्या कार्यालयात प्लास्टिकचा वापर करीत नाही, तुम्ही...? असे फलक जिल्हा प्रशासनाच्या प्रमुखांच्या दालनाबाहेर लावण्यात आले आहेत. हे फलक कामानिमित्त जिल्हाभरातून येणाऱ्या शेकडो नागरिकांचे लक्ष वेधत आहेत. ही संकल्पना मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजुलक्ष्मी यांची आहे.
सिंधुदुर्गनगरी : आम्ही आमच्या कार्यालयात प्लास्टिकचा वापर करीत नाही, तुम्ही...? असे फलक जिल्हा प्रशासनाच्या प्रमुखांच्या दालनाबाहेर लावण्यात आले आहेत. हे फलक कामानिमित्त जिल्हाभरातून येणाऱ्या शेकडो नागरिकांचे लक्ष वेधत आहेत. ही संकल्पना मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजुलक्ष्मी यांची आहे.
हागणदारीमुक्त अभियानात आशिया खंडात प्रथम बाजी मारणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याने स्वच्छ जिल्हा स्पर्धेत पठारी भागात देशात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. शासनाच्या प्रत्येक योजनेत अग्रेसर असणाºया जिल्हा परिषदेने आता प्लास्टिकमुक्त जिल्हा यासाठी पुढचे पाऊल उचलले आहे.
२ आॅक्टोबर या दिवशी केंद्र सरकारने महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधून पूर्ण देशात प्लास्टिक पिकअप डे हा उपक्रम राबविला. हा उपक्रमसुद्धा सिंधुदुर्ग प्रशासनाने उत्तम नियोजन करून जिल्ह्यातील ४३१ ग्रामपंचायत क्षेत्रे व जिल्ह्यातील सर्व समुद्रकिनारे याठिकाणी राबविला. ११ टनांपेक्षा जास्त प्लास्टिक या मोहिमेतून गोळा करण्यात आले. त्याची विल्हेवाट २७ आॅक्टोबरपर्यंत लावण्याचे नियोजन गटविकास अधिकारी स्तरावर करण्यात आले आहे.
जिल्हा प्रशासनाने प्लास्टिक मुक्तीसाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. याची सुरुवात जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांनी प्लास्टिक वापर बंदीचा संदेश देण्यासाठी वेगळी युक्ती लढवित सुरू केली आहे. जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजुलक्ष्मी, जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश जोंधळे यांच्या दालनाबाहेर फलक लावण्यात आले आहेत. या फलकावर आम्ही आमच्या कार्यालयात प्लास्टिकचा वापर करीत नाही, तुम्ही...? असे लिहिण्यात आले आहे.
यातून आम्ही प्लास्टिक वापरत नाही. तुम्हीही प्लास्टिकचा वापर करू नका, असा संदेश द्यायचा आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या संकल्पनेतून हा प्लास्टिक बंदीचा नवा फंडा सुरू करण्यात आला आहे.