पंधरा दिवसात कागदपत्रांची पूर्तता करावी
By admin | Published: December 11, 2014 11:09 PM2014-12-11T23:09:30+5:302014-12-11T23:43:27+5:30
नवाबाग येथे मच्छिमारांची बैठक : वसंत तांडेल यांनी केले मार्गदर्शन
वेंगुर्ले : मासेमारीसाठी लागणारी बोटीची कागदपत्रे, मासेमारी नौकांसाठी रजिस्टेशनची कागदपत्रे ही बऱ्याचअंशी मच्छिमारांकडे पूर्ण नसून विशेषत: एक टनाखालील नौकांची कागदपत्रे पूर्ण नसल्याने त्यांना समुद्रात मासेमारी करताना शासनाच्या मत्स्य व्यवसाय विभागाकडून कारवाईच्या सदराखाली आर्थिक, मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागतो, याकरिता येत्या १५ दिवसात कागदपत्रांची पूर्तता मुदत देण्यात यावी. त्याचबरोबर सध्या सुरु असलेल्या मच्छिमारांच्या संघर्षाचा यशस्वी तोडगा काढण्यात येऊन समुद्रात मासेमारी करण्याबाबत मालवणच्या बैठकीत निर्णय घेण्याचे ठरविण्यात आले.
वेंगुर्ले नवाबाग जेटीच्या ठिकाणी निवती, मालवण, देवबागमधील पर्ससीननेट मासेमारीमुळे झालेल्या संघर्षावर यशस्वी तोडगा काढण्यासाठी रापण, गिलनेट, न्हैय, मिनी पर्ससीननेटधारक मच्छिमारांची बैठक पार पडली. यावेळी मच्छीमार नेते वसंत तांडेल, दादा कुबल, पुंडलिक केळुसकर, बाबी रेडकर, अशोक सारंग यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी निवती व वेंगुर्लेच्या कुठल्याही पर्ससीननेट मच्छिमारांनी मालवण परिसरात जात मासेमारी न करण्याचा निर्णय घेतला.
तसेच कोणत्याही परिस्थितीत मासेमारीला बाधा येणार नाही, याची दक्षता घ्यावी. याचबरोबर मासेमारीसाठी मत्स्य विभागाने दिलेला परवानाच अंतिम परवाना असेल. त्यामुळे अन्य साधनाने मासेमारी करताना वेगळ्या परवान्याची अट असू नये, असा ठराव घेण्यात आला. यावेळी अशोक सारंग, कमलेश मेतर, सुरेश पडते, आबा कोचरेकर, सुरेश कोचरेकर, सुहास तोरसकर, बाळ तोरसकर, हेमंत येरागी, सूर्या सांगवेकर, बाबी रेडकर, मोहन सागवेकर, सतिश हुले, आनंद वेंगुर्लेकर, अनंत केळुसकर, अशोक खराडे, जनार्दन कुबल, सुबोध खडपकर, जनार्दन खडपकर, आशिष तोरस्कर, राजन तोरस्कर, भाग्यवान गिरप, राजन घाटवळ, विनोद नाईक, गोपाळ बटा, दिलीप नाईक, रमेश बटा, अण्णा सागवेकर आदी मच्छीमार उपस्थित होते. (प्रतिनिधी)