ठाकरेंमुळेच सिंधुदुर्गला वैद्यकीय महाविद्यालय दिसले- विनायक राऊत
By अनंत खं.जाधव | Published: February 2, 2024 08:05 PM2024-02-02T20:05:26+5:302024-02-02T20:05:38+5:30
मंत्री केसरकरांना प्रत्युत्तर
सावंतवाडी: मंत्री दीपक केसरकर हे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून अडीच वर्षांत काय केले असे विचारणे म्हणजे केलेले उपकार विसरण्यासारखे आहेत सिंधुदुर्गला वैद्यकीय महाविद्यालय ठाकरेंमुळेच दिसले अन्यथा हे महाविद्यालय कधी झालेच नसते असे प्रत्युत्तर शिवसेना नेते खासदार विनायक राऊत यांनी मंत्री केसरकर यांना दिले आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे रविवारी सावंतवाडीत येत आहेत त्या दौऱ्यानिमित्त आढावा बैठक खासदार विनायक राऊत यांनी घेतली त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाप्रमुख संजय पडते,सहसंर्पक प्रमुख शैलेश परब गितेश राऊत,रुची राऊत,तालुकाप्रमुख रूपेश राऊळ,बाळा गावडे,आबा सावंत उपस्थित होते.
खासदार राऊत म्हणाले,दीपक केसरकर हे आज कितीही मंत्री नारायण राणे यांचे गुणगान गात असले तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनता सुज्ञ आहे.ते सगळ ओळखतात त्याना माहिती आहे.राणेंचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात दहशतवाद आहे म्हणून ओरड मारणाऱ्या केसरकरांना एवढ्या लवकर साक्षात्कार कसा काय झाला हे आता जनतेने शोधावे असा टोला ही राऊत यांनी मारला.माजी खासदार निलेश राणे यांनी केसरकर यांना ड्रायव्हर म्हटले होते.याची आठवण ही राऊत यांनी यावेळी करून दिली.
मंत्री केसरकर हे उध्दव ठाकरे यांनी अडीच वर्षांत काय केले म्हणून विचारतात पण त्याना हे माहीत नाही कि ठाकरे मुख्यमंत्री होते म्हणूनच सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय येऊ शकले हे त्यांनी लक्षात ठेवावे या वैद्यकीय महाविद्यालयाला केंद्रिय मंत्री नारायण राणे यांचा तीव्र विरोध होता असे असतना ठाकरे यांनी हे महाविद्यालय होण्यासाठी केंद्रात जो पाठपुरावा केला त्यामुळेच हे शक्य झाल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.हे कदाचित केसरकर विसरले असतील पण येथील जनता विसरणार नसल्याचे त्यांनी नमूद केले.
राजू शेट्टीनी हातकणंगले मधून लढावे
राजू शेट्टी यांनी हातकणंगले मधून लढावे अशी भावना महाविकास आघाडीची आहे.तसेच तेथील शेतकरी व ऊसउत्पादक शेतकरी पण मागणी करत आहेत त्यामुळे आमचा ही आग्रह हाच राहिल असेही खासदार राऊत यावेळी म्हणाले.
प्रमोद जठार दलाल त्यांच्याबद्दल काय बोलणार
खासदार म्हणून माझी भुमिका जनतेला अभिप्रेत अशीच असेल मला जमिनीची दलाली करायची नाही आणि दलाली वर माझे घर चालत नाही माजी आमदार प्रमोद जठार दलाल आहेत. गुजराती लोकांची दलाली करून जमिनी विकल्या असा आरोप राऊत यांनी जठारावर केला आहे.