भास्कर जाधवांचे चिपळूणमधील प्रकार उघडकीस आणायला वेळ लागणार नाही, भाजप तालुकाध्यक्षाने दिला इशारा
By सुधीर राणे | Published: October 19, 2022 01:46 PM2022-10-19T13:46:15+5:302022-10-19T13:47:30+5:30
भास्कर जाधव हे, मी उद्धव ठाकरेंचा समर्थक आहे असे आता सांगत आहेत. मात्र, त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांना ज्या शिव्या घातलेल्या त्याची क्लिप आमच्याकडे आहे.
कणकवली: केंद्रीय मंत्री नारायण राणे व त्यांच्या कुटुंबावर आमदार भास्कर जाधव यांनी केलेले आरोप खोटे असून आम्ही भाजपाच्यावतीने त्याचा निषेध करतो. तसेच जाधव यांनी चिपळूण मध्ये आतापर्यंत केलेले प्रकार उघडकीस आणण्यास आम्हाला वेळ लागणार नाही. यापुढे राणेंच्या विरोधात ते बोलतील तर जिल्ह्याच्या सीमेवर खारेपाटण मध्ये ते येताच त्यांचा 'करेक्ट' कार्यक्रम होईल. असा इशारा कणकवली भाजप तालुकाध्यक्ष संतोष कानडे यांनी दिला आहे.
कणकवली येथील भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रवींद्र उर्फ बाळा जठार,भाजप युवा मोर्चा संघटन सरचिटणीस संदीप मेस्त्री, संदीप सावंत, उमेश घाडीगावकर, लक्ष्मण घाडीगावकर आदी उपस्थित होते.
संतोष कानडे म्हणाले, भास्कर जाधव यांनी अनेक कृत्ये केली आहेत. त्यांनी आपल्या कार्यालयात इम्तियाज मुकादम या व्यक्तीला बोलावून मारहाण केली. तसेच एका पत्रकाराला इमारतीच्या पहिल्या माळ्यावरून खाली ढकलले आहे. आता शिवसेनेचे नेते म्हणून ते मिरवत आहेत. हिंदू धर्माचे आराध्य दैवत असलेल्या शारदा देवीच्या मंदिरामध्ये त्यांनी लोकांना शिवीगाळ केली होती. आता नारायण राणेंवर शिवराळ भाषेत टीका करीत आहेत. त्यांचे मानसिक संतुलन बिघडलेले आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कोकणामध्ये भरपूर काही केलेले आहे. मात्र, शरद पवार यांनी जाधव यांना नऊ खात्याचा मंत्री केल्यानंतर त्यामाध्यमातून किती फायदा चिपळूणला मिळवून दिला ते त्यांनी सांगावे.
उद्धव ठाकरेंना शिव्या घातलेली आमच्याकडे क्लिप
जाधव हे, मी उद्धव ठाकरेंचा समर्थक आहे असे आता सांगत आहेत. मात्र, २०१४ साली शिवसेनेची पहिली आमदार पदासाठी यादी जाहीर झाली, त्यात त्यांचे नाव नव्हते. त्यावेळी त्यांनी गाडीत बसून उद्धव ठाकरे यांना ज्या शिव्या घातलेल्या आहेत त्याची क्लिप पण आमच्याकडे आहे. त्यांनी त्यावेळी चिपळूणमध्ये येऊन आपल्या कार्यकर्त्याना सांगितले होते की, उद्धव ठाकरे यांनी माझ्याकडे निवडणूकीत उमेदवारी देण्यासाठी दोन कोटी रुपये मागितले होते. असा गौप्यस्फोटही केला.
त्यांच्याच भाषेत उत्तर दिले जाईल
आमच्या नेत्यांवर टीका करणारा माणूस जिल्ह्यात येत असेल तर त्याला सीमेवरतीच त्याची जागा दाखवण्याची तयारी आम्ही केलेली आहे. त्यामुळे भास्कर जाधव हे यापुढे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आल्यानंतर त्यांना त्यांच्याच भाषेत योग्य उत्तर दिले जाईल असेही संतोष कानडे म्हणाले.