बंदर निरीक्षकांना विचारला जाब, मनसे पदाधिकाऱ्यांची धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 03:39 PM2020-07-23T15:39:35+5:302020-07-23T15:41:31+5:30
मालवण : गेले काही महिने मालवण बंदरात मोडून पडलेल्या हवामान विषयक माहिती देणाऱ्या बावटाकाठीच्या दुरुस्तीकडे बंदर विभागाने दुर्लक्ष केले आहे. ...
मालवण : गेले काही महिने मालवण बंदरात मोडून पडलेल्या हवामान विषयक माहिती देणाऱ्या बावटाकाठीच्या दुरुस्तीकडे बंदर विभागाने दुर्लक्ष केले आहे. याबाबत माहिती समजताच संतप्त बनलेल्या मनसेच्या पदाधिकाºयांनी मनसे जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर यांच्या नेतृत्वाखाली मालवण बंदर विभागाचे निरीक्षक अमोल ताम्हणकर यांना जाब विचारत धारेवर धरले.
दरम्यान, याबाबत राजन दाभोलकर यांनी सागरी अभियंता व मेरीटाईम बोर्ड मुंबईचे मुख्य सर्व्हेअर प्रकाश चव्हाण यांच्याशी फोनवर चर्चा करीत लक्ष वेधले असता मोडलेली बावटाकाठी आणि बोयांवरील लाईट हे दोन्ही प्रश्न चार दिवसांच्या आत सोडविण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
मालवण बंदरातील कलंडलेली बावटाकाठी व लाईट न पेटणारे नौकायन बोया या आणि बंदरातील विविध समस्या गेले अनेक महिने सोडविल्या न गेल्याबाबत मनसेचे जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर यांनी मालवण बंदर कार्यालयात बंदर निरीक्षकांना जाब विचारला.
यावेळी त्यांच्यासमवेत मनसे तालुकाध्यक्ष विनोद सांडव, मनविसे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर, शैलेश अंधारी, विल्सन गिरकर, विनायक गावडे, गुरू तोडणकर, भारती वाघ, विशाल ओटवणेकर आदी उपस्थित होते.
यावेळी राजन दाभोलकर यांनी मालवण बंदरात मच्छिमारांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत मालवण बंदर निरीक्षक अमोल ताम्हणकर यांच्याबरोबर विस्तृत चर्चा केली. मालवण बंदर क्षेत्रातील समुद्रात मच्छिमारांना दिशादर्शक ठरणारे ५ नौकायन बोया स्थापित केले होते. मात्र, सध्या एकाही बोया वरील लाईट सुरू नसल्याचे राजन दाभोलकर यांनी निदर्शनास आणुन दिले.
तसेच मच्छिमारांना हवामान विषयक माहिती देणारी आणि वादळी स्थितीच्या धोक्याची माहिती देणारी मालवण बंदरातील मेढा राजकोट येथील बावटाकाठीही सद्यस्थितीत एका बाजूला कलंडली गेली आहे, असेही दाभोलकर यांनी निदर्शनास आणून दिले.
चार दिवसांच्या आत समस्या सोडविण्याचे आश्वासन
गेले अनेक महिने ही बावटाकाठी कलंडलेल्या अवस्थेत असून समुद्रातील मच्छिमारांना या बावटाकाठीचा कोणताही उपयोग होत नाही, असे राजन दाभोलकर यांनी सांगत नवीन मत्स्य हंगाम जवळ येऊन ठेपला असताना अद्यापही या बावटाकाठीची दुरुस्ती का झाली नाही ? असा सवाल केला.
बावटाकाठी व बोयाबाबत सद्यस्थितीची माहिती बंदर निरीक्षकांनी दिल्यानंतर दाभोलकर यांनी सागरी अभियंता व महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे मुख्य सर्व्हेअर प्रकाश चव्हाण यांच्याशी फोनवर चर्चा केली. दाभोलकर यांनी बंदरातील समस्यांबाबत माहिती दिल्यावर चव्हाण यांनी चार दिवसांच्या आत दोन्ही समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.