'जाधवांची ओळख वाळू, लाकूडचोर'; सावंतवाडीत भाजप पदाधिकारी आक्रमक
By अनंत खं.जाधव | Published: October 19, 2022 03:12 PM2022-10-19T15:12:19+5:302022-10-19T15:14:56+5:30
सावंतवाडीत भाजप पदाधिकारी आक्रमक: जशास तसे उत्तर देण्याचा इशारा
सावंतवाडी : वाळू आणि लाकुड चोर म्हणून ओळख असलेल्या भास्कर जाधव यांनी आमचे नेते नारायण राणेंच्या विरोधात तोंड सांभाळून बोलावे, अन्यथा तुमचे सिंधुदूर्गात आमच्या पध्दतीने स्वागत करू, असा इशारा भाजपाचे प्रवक्ते तथा माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी दिला. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. सिंधुदूर्गात दहशतवाद नव्हताच हे आमच्या सोबत आल्यानंतर मंत्री दिपक केसरकर यांना सुद्धा कळले असा टोला ही परब यांनी लगावला कुडाळ येथे झालेल्या सभेत राणे यांच्यावर शेलक्या भाषेत टिका करणार्या शिवसेना नेते भास्कर जाधव यांचा परब यांनी समाचार घेतला.
यावेळी शहर अध्यक्ष अजय गोंदावळे, माजी नगरसेवक आनंद नेवगी, दिलीप भालेकर, बंटी पुरोहीत, अजय सावंत, अमित परब उपस्थित होते.
परब म्हणाले,भास्कर जाधव यांची वाळू आणि लाकुड चोर म्हणून ओळख आहे. त्या ठीकाणी असलेले लोक त्यांना शिवीगाळ करतात ही वस्तूस्थिती आहे, अशा परिस्थिती ज्यांची आपल्या मतदार संघात पात्रता नाही, त्यांनी आमच्या नेत्यावर टिका करणे योग्य नाही. असाच प्रकार त्यांच्याकडुन सुरू राहील्यास आम्ही आमच्या पध्दतीने त्यांचे जिल्ह्यात स्वागत करू, जाधव हे स्वतः गद्दार आहेत. त्यांनी यापुर्वी शिवसेना सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरे व उध्दव ठाकरे यांच्यावर टोकाची टिका केली होती. त्यामुळे त्यांनी आता निष्ठेच्या गोष्टी सांगू नयेत. राणेंवर बोलण्याची त्यांची पात्रता नाही. कात विकून युवा पिढी बरबाद करणार्यांना आम्ही धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही.असा इशारा ही परब यांनी दिला आहे.
सिंधुदूर्गात मूळात दहशतवाद नव्हता. त्यावेळी मंत्री दिपक केसरकर हे आपल्या राजकीय फायद्यासाठी तशा प्रकारची टिका करीत होते. मात्र आज त्यांची आमच्या सोबत युती झाल्यानंतर जिल्ह्यातील दहशतवाद नसल्याचे त्यांनीही मान्य केले असावे असा टोला ही यावेळी परब यांनी लगावला.