Sindhudurg: महाबोधी महाविहार मुक्तीसाठी ओरोस फाटा येथे जेल भरो आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 15:54 IST2025-04-10T15:51:57+5:302025-04-10T15:54:47+5:30
बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क संघटनेच्यावतीने आयोजन

Sindhudurg: महाबोधी महाविहार मुक्तीसाठी ओरोस फाटा येथे जेल भरो आंदोलन
ओरोस : बिहार बोधगया येथील महाबोधी महाविहार मुक्तीसाठी महाबोधी महाविहार कायदा १९४९ रद्द करावा या मागणीसह अन्य मागण्यांसाठी बुधवारी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क संघटनेच्या वतीने देशभर जेलभरो आंदोलन केले. याचाच एक भाग म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातही ओरोस फाटा येथे बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क संघटना सिंधुदुर्गच्या वतीने जेलभरो आंदोलन छेडण्यात आले. यावेळी उपस्थित आंदोलनकर्त्यांना सिंधुदुर्गनगरी पोलिसांनी ताब्यात घेत समज देऊन सोडले.
सम्राट अशोक यांनी बिहार बोधगया येथे महाबोधी महाविहार निर्माण केले आहे. भारत स्वातंत्र्यानंतर काश्मिरी ब्राह्मणाने या स्थळावर कब्जा करण्याची योजना बनविली. त्यामध्ये बोधगया येथील महाबोधी महाविहार हे स्थळ आहे. बोधगया येथे महंत ब्राह्मणांनी स्वार्थापोटी कायदा बनवून तेथे कब्जा केला आहे. महाबोधी महा विहार मंदिर कायदा १९४९ बनवून ब्राह्मणांना महाबोधी महाविहारचे मालक दाखविण्यात आले आहे.
चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेला महाबोधी महाविहार कायदा १९४९ रद्द करावा व महाबोधी महाविहार मुक्त करावे यासाठी ईव्हीएमच्या विरोधात, बॅलेट पेपरच्या समर्थनार्थ यासह अन्य मागण्यांसाठी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क संघटनेच्या माध्यमातून देशव्यापी आंदोलन टप्प्याटप्प्याने सुरू असून, याचाच एक भाग म्हणून बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क सिंधुदुर्गचे पदाधिकारी यांनी आज ओरोस फाटा येथे जेलभरो आंदोलन केले. यावेळी सिंधुदुर्गनगरी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले तसेच पोलिस ठाण्यात आणून समज देऊन त्यांना सोडण्यात आले.