महामार्ग दूरवस्थेबाबत कुडाळ येथे जेलभरो आंदोलन, सर्व विरोधी पक्ष एकवटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 11:48 AM2019-07-17T11:48:42+5:302019-07-17T11:50:37+5:30
कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गाची चौपदरीकरण कामाअतंर्गत झालेली दूरवस्था, सत्ताधाऱ्यांच्या कामगिरीचा निषेध करीत सर्व विरोधी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी मंगळवारी ...
कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गाची चौपदरीकरण कामाअतंर्गत झालेली दूरवस्था, सत्ताधाऱ्यांच्या कामगिरीचा निषेध करीत सर्व विरोधी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी मंगळवारी कुडाळ येथे जेलभरो आंदोलन छेडले. यापुढेही जनतेच्या प्रश्नांसाठी सर्व विरोधक एकत्र येऊन लढा देतील. तसेच ३१ जुलै रोजी जिल्हा दौऱ्यांवर येणारे बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांना महामार्गावर अडविण्यात येईल, असा इशारा आंदोलकनकर्त्यांनी दिला. यावेळी सुमारे २६४ आंदोलनकर्त्यांवर कुडाळ पोलीस ठाण्यात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.
चौपदरीकरणाच्या कामात महामार्गाची झालेली दुरवस्था, शासनाकडून कणकवली येथील आंदोलन दडपण्याचा झालेला प्रयत्न व आंदोलनकर्त्यांवर केलेल्या कारवाईच्या विरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे व महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्यावतीने हे जेलभरो आंदोलन छेडण्यात आले.
या आंदोलनात मनसेचे सरचिटणीस व माजी आमदार परशुराम उपरकर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष विकास सावंत, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश गवस, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई, मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब, राजन दाभोलकर, सावंतवाडी नगराध्यक्ष बबन साळगावकर, कुडाळ नगराध्यक्ष ओंकार तेली, काँग्रेस प्रवक्ते काका कुडाळकर, राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक, राष्ट्रवादी प्रांतिक सदस्य अमित सामंत तसेच जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपरकर म्हणाले, पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मंत्रीपदाचा वापर हौस भागविण्यासाठी केला. मात्र, जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांना वेळ नाही. केसरकर यांनी आता साडेचार वर्षातील विकास सांगावा. अन्यथा आम्ही येत्या दोन महिन्यात त्यांनी व सरकारने काय केले व काय केले नाही याची पोलखोल करू. बबन साळगावकर यांनी केसरकर यांच्यावर टीका केली.
सत्ताधाऱ्यांना सोयरसुतक नाही
विकास सावंत म्हणाले, आम्ही आमच्या काळात कोणतेच आंदोलन चिघळू दिले नाही. मात्र, आमच्या काँग्रेस पक्षात त्यावेळी असलेले केसरकर व नाईक हे त्याला अपवाद आहेत. कारण ते काँग्रेमध्ये घडून सुध्दा एखाद्या मूर्तीत राहिलेल्या बुडबुड्याप्रमाणे होते. त्या दोघांनाही जनतेच्या समस्या कधीच समजल्या नाहीत. आताही जनतेच्या प्रश्नांबाबत त्यांना कोणतेही सोयरसुतक नाही.
कुडाळ शहर घोषणांनी दुमदुमले
या आंदोलनादरम्यान विरोधकांनी गली गली में शोर है, पालकमंत्री चोर है आदी घोषणा सत्ताधाऱ्याच्या निषेधार्थ केलेल्या घोषणांनी कुडाळ परिसर दुमदुमून गेला होता. तसेच उद्दाम बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांचा निषेध अशी बॅनरबाजीही करण्यात आली होती.