खेडमध्ये जाखडी, भजनी मंडळांनी धरला नवा ताल
By admin | Published: August 12, 2015 11:03 PM2015-08-12T23:03:22+5:302015-08-12T23:03:22+5:30
गणेशोत्सवाचे वेध : शेकडो भजनी मंडळे संत परंपरा जपण्यात मग्न
श्रीकांत चाळके-खेड -गणेशोत्सव आता महिन्यावर आला आहे. या सणाचे खास आकर्षण असलेल्या जाखडी नृत्य आणि भजन मंडळांनी आतापासूनच ताल धरला आहे. जाखडी कलाकारांनी आपल्या सरावाला आतापासूनच प्रारंभ केला आहे. दुसऱ्या बाजूला भजनी मंडळांनी वर्षानुवर्षे सुरू असलेल्या संत परंपरा जपण्यात आपले आजवरचे संगीतमय परिश्रम पणाला लावले आहेत.
गणेशोत्सव जवळ आल्याने आता जाखडीनृत्याचे साऱ्यांनाच वेध लागले आहेत. येत्या १७ सप्टेंबरला गणेश चतुर्थी आहे, मांगल्य आणि परंपरेचे प्रतीक असलेल्या या सणाचे महत्त्व काही औरच असते. म्हणूनच कोकणातील जाखडीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जाखडीमध्ये बालकलाकारांसह मोठ्यांनाही नृत्य करण्याची संधी असते. मात्र, जुने झुगारून दिल्याने आधुनिकतेमध्ये समरस होण्याच्या दृष्टीने जाखडीमध्ये लहान कलाकारांनाच जास्त संधी दिली जाते. नृत्य करणारे ८ कलाकार, दोन ढोलकीपटूंसह झांजपथक आणि गायक असा १३ कलाकारांचा समूह म्हणजे जाखडीचा नवा आविष्कारच असतो.
पारंपरिक जाखडीतील तोचपणा वगळून रसिकांना नव्याने आस्वाद घेता यावा, याकरिता जाखडीतील प्रत्येक कलाकार नवा आणि वैविध्यपूर्ण पोशाख परिधान करतो़ गौरी आणि गणपतींसमोर आपली कला सादर करणाऱ्या या जाखडी नृत्य मंडळाला ही अनोखी संधी मिळत असल्याने ही कला अधिकाधिक वृध्दिंगत झाली आहे़
या कलेच्या माध्यमातून जाखडी आणि भजनी मंडळांनी या लोककला सातासमुद्राबाहेर पोहोचविल्या. गेल्या काही वर्षांत जाखडी नृत्याच्या कॅसेटची गणेशोत्सवात विक्रमी विक्री केली जाते. त्यामुळे प्रतिवर्षी विविध ढंगातील, विविध चालीतील जाखडीच्या कॅसेटस् बाजारात येतात.
खेड तालुक्यातील जाखडी आणि भजनी मंडळांनी आपल्या या लोककला संगीताच्या रूपाने स्वरबध्द केल्या आहेत. तालुक्यात शेकडो भजनी मंडळे सुरू आहेत. या सण उत्सवाच्या माध्यमातून आपल्या लोककला जोपासत आहेत. बाप्पाच्या स्वागताकरिता ठिकठिकाणी कमानी उभारून गणेशभक्तांनी आपल्या कार्यकर्तृत्त्वाची प्रचिती आणून दिली आहे. तालुक्यातील नामांकित अनेक जाखडी मंडळांनी बालगोपाळांच्या सरावाकरिता आरंभ केला आहे. श्रीगणेशाचे जोरदार स्वागत करण्यासाठी प्रत्येक वर्षी नवा ताल आणि सुरांची गाणी रचण्यासाठी ही मंडळे आता जोरदार सराव करू लागली आहेत. कोकणातील सांस्कृतिक परंपरेचे हे स्थान जाखडी आणि भजनाच्या या कलांद्वारे समृध्द झाले आहे.
तालुक्यातील संगीतप्रेमींनी आपल्या संगीत भजनाची व जाखडी नृत्याची सांगड घालण्यास प्रारंभ केला आहे. खेड तालुक्यातील १० भजन मंडळांनी तालुका आणि जिल्हास्तरावर आपली कला सादर केली. केवळ महिनाभराच्या अंतराने येत असलेल्या गणरायाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर या कला अधिकाधिक जोपासता येणार आहेत.
जाखडी नृत्य नव्या रुपात, नव्या ढंगात.
दरवर्षी गणेशोत्सवात जाखडी नृत्याच्या कॅसेटची होते विक्रमी उलाढाल.
ग्रामीण भागात जाखडी नृत्याचा सराव सुरु.
गणेशोत्सवाची चाहूल.