जलयुक्त शिवार अभियान..
By admin | Published: September 20, 2015 09:16 PM2015-09-20T21:16:08+5:302015-09-20T23:42:11+5:30
जिल्ह्यात केवळ ६ महिन्यात ५१५ कामे पूर्ण
राज्यातील सततच्या टंचाईसदृश्य परिस्थितीवर मात करण्यासाठी पाणी टंचाईमुक्त महाराष्ट्र २०१९ अंतर्गत जलयुक्त शिवार अभियान हाती घेण्यात आले आहे. शासनाचे हे अभियान टंचाईमुक्त महाराष्ट्राच्या दिशेने पडलेलं एक महत्वाचं आणि आश्वासक पाऊल आहे. राज्यभरात प्रशासनाने अभियानावर आपलं संपूर्ण लक्ष केंद्रीत केलं आहे. आजमितीस राज्याच्या ६ हजार गावांमध्ये एकूण ७० हजार जलसंधारणाची कामे जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सुरू आहेत. अभियानाच्या अंमलबजावणीत रत्नागिरी जिल्हाही आघाडीवर असून, पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात अभियानाची अंमलबजावणी सुरू आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात प्रचंड प्रमाणात पडणाऱ्या पावसाचे बहुतांश पाणी वाहून जाते. जलयुक्त शिवार अभियानामुळे हे पाणी गावात अडवले जाणार आहे. त्यामुळे काही अंशी पाणी प्रश्न सुटू शकणार आहे. त्याचबरोबर जमिनीत पाणी जिरल्यामुळे जिल्ह्याची सिंंचन क्षमता वाढून भात, फळपिके, कडधान्य यांच्या लागवडीखालील क्षेत्रात वाढ होऊ शकेल. यामुळेच भौगोलिक स्थिती व पीक पद्धती यांचा विचार करुन अभियानाची आखणी करण्यात आली. जिल्ह्यातील अभियानांतर्गत निवडलेल्या ४७ गावांचे सविस्तर आराखडे तयार करण्यात आले आहेत.
जिल्ह्यात या अभियानाअंतर्गत एकूण ३२५८.६८ लाख इतक्या निधीपैकी १२९७.७४ लाख इतका अंमलबजावणी यंत्रणांना निधी प्राप्त झालेला आहे. यात डी. पी. डी. सी.मधून ४३७.२५ लाख, राज्य योजनेतून १४.१२ लाख, जलयुक्त शिवार अभियानातून २७८.११ लाख, एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रमातून २४८.७१ लाख, महात्मा फुले जलभूमि अभियानातून १०३.८२ लाख, कोडवाहू अभियानामधून १५.७३ लाख आणि विविध संस्थांच्या सामाजिक दायित्व निधीतून २०० लाख रुपये इतका निधी प्राप्त झालेला आहे.
जिल्ह्यात केवळ ६ महिन्यात ५१५ कामे पूर्ण
जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत ९ तालुक्यात कृषी विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग आणि लघुसिंंचन विभागाकडून एकूण १०९७ कामे घेण्यात आली आहेत. पैकी ५१५ कामे पूर्ण झाली आहेत. जलयुक्त शिवार अभियानात एकूण ४७ गावांपैकी रत्नागिरी तालुक्यातील ५ गावांमध्ये एकूण ६० कामांपैकी ३२ कामे पूर्ण झाली असून, २८ कामे सुरू आहेत. लांजा तालुक्यातील ५ गावांमध्ये एकूण ७८ कामांपैकी २५ पूर्ण आणि ५३ प्रगतीपथावर, राजापूर तालुक्यातील ५ गावांमध्ये १४५ कामांपैकी ४९ कामे पूर्ण आणि ९६ कामे प्रगतीपथावर, चिपळूण तालुक्यातील ५ गावांमध्ये ७७ कामांपैकी ६७ कामे पूर्ण व १० कामे प्रगतीपथावर, गुहागरमधील ५ गावांमध्ये १२४ कामांपैकी ९९ कामे पूर्ण आणि २५ कामे प्रगतीपथावर, संगमेश्वर तालुक्यातील ५ गावांमध्ये ७१ कामांपैकी ६३ कामे पूर्ण व ८ कामे प्रगतीपथावर, खेड तालुक्यातील ७ गावांमध्ये २४१ कामांपैकी ६८ कामे पूर्ण व १७३ कामे प्रगतीपथावर, दापोली तालुक्यातील ५ गावांमध्ये १२० कामांपैकी ५८ पूर्ण व ६२ प्रगतीपथावर आणि मंडणगड तालुक्यातील ५ गावांमध्ये ४४ कामांपैकी २८ कामे पूर्ण झाली असून, १६ कामे सुरू आहेत. तसेच ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या ८७ कामांपैकी ५८ कामे पूर्ण झाली आहेत तर लघु सिंंचन विभागाची दोन कामे प्रगतीपथावर आहेत. नरेगामधून एकूण ४८ कामांपैकी ३८ कामे पूर्ण व १० कामे प्रगतीपथावर आहेत.
-विजय कोळी
जिल्हा माहिती अधिकारी