जलसीमा जागर मोहीम रॅली ‘विजयदुर्ग’वर दाखल
By admin | Published: February 8, 2016 12:05 AM2016-02-08T00:05:42+5:302016-02-08T00:34:27+5:30
देवगडहून मालवण किल्ल्यावर रवाना : ११ जिल्ह्यांतील १0७ शिवप्रेमी सहभागी
देवगड : जलसीमा जागर मोहिमेची रॅली विजयदुर्ग किल्ल्यासह देवगडात रविवारी दाखल झाली. या मोहिमेमध्ये ११ जिल्ह्यांतील १०७ शिवप्रेमी दाखल झाले होते. विजयदुर्ग येथे ही रॅली दाखल होताच या रॅलीचे स्वागत शिवसेना तालुकाप्रमुख विलास साळसकर यांनी केले. यानंतर ही रॅली देवगडवरून कुणकेश्वर मंदिराचे दर्शन घेऊन मालवण किल्ल्यावर रवाना झाली आहे.
‘सागर जलसीमा सुरक्षा जागर मोहीम मराठा आरमाराची भरारी..... करूया दर्यावर स्वारी....’ अशी घोषणा देत देवगड किल्ल्याचा परिसर दणाणून सोडला होता. यामुळे शिवरायांच्या आठवणीही यावेळी जाग्या झाल्या. या मोहिमेचा प्रारंभ ३० जानेवारी २०१६ रोजी सकाळी १०.३० वाजता संभाजी महाराज समाधी वड बु्रद्रुक तालुका शिरूर, जिल्हा पुणे येथून करण्यात आली. या मोहिमेचा प्रारंभ कोल्हापूरचे छत्रपती संभाजी राजे यांच्या हस्ते करण्यात आले. मोहिमेला वडगाव, ठाणे, अंबरनाथ, कल्याण, डहाणू, जाई येथे समुद्राची ओटी भरून १ फेब्रुवारी रोजी या मोहिमेला खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला. यावेळी जाई येथील मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष नारायण विंदे, रमेश बारी, डॉ. आशाताई वरतकर यांनी सागराची खणानारळाने ओटी भरून या मोहिमेला सुरूवात झाली. त्यानंतर पालघर, तारापूर, शिरगाव, माहिम, केळवे, विरार, वसई, मुंबई येथे नौदलाने या रॅलीचे स्वागत करून नौदलामध्ये कशाप्रकारे कारभार हाकला जातो याची माहिती दिली. यानंतर इतिहासप्रेमी राजू परूळेकर यांनी या रॅलीतील शिवप्रेमींना घेऊन किल्ला भ्रमंती करून विजयदुर्ग किल्ल्याची माहिती दिली. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख विलास साळसकर, विभागप्रमुख संदीप डोळकर उपस्थित होते. यानंतर रविवारी दुपारी देवगड किल्ल्यावर या रॅलीचे आगमन झाले. देवगड किल्ल्याला भ्रमंती करून ही रॅली कुणकेश्वर मंदिराचे दर्शन घेऊन मालवणला रवाना झाली. (प्रतिनिधी)
विजयदुर्ग ग्रामस्थांकडून शिवप्रेमींचे स्वागत
बेलापूर, अलिबाग, कुलाबा, मुरूड, पद्मदुर्गा, श्रीवर्धन, बाणकोट, हर्णेबंदर, सुवर्णदुर्ग, दापोली, दाभोळ बंदर, गुहागर, जयगड, रत्नागिरी, पावस येथे मुक्काम करून पूर्णगड, नाटे, यशवंतगड करून विजयदुर्ग किल्ल्यावर रविवारी सकाळी रॅलीचे आगमन झाले. शिवप्रेमींचे विजयदुर्ग ग्रामस्थांंनी स्वागत केले.