जन्मोजन्मी हिच पत्नी लाभू दे, पुरूषांकडून वटपौर्णिमा साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2020 03:51 PM2020-06-06T15:51:37+5:302020-06-06T15:53:31+5:30
कुडाळ येथील विविध क्षेत्रातील पुरूषांनी सतत नवव्या वर्षी ही आगळीवेगळी वटपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली. शहरातील गवळदेव येथे पुरुषवर्गाने मोठ्या उत्साहात वटपौर्णिमा साजरी केली.
कुडाळ : कुडाळ येथील विविध क्षेत्रातील पुरूषांनी सतत नवव्या वर्षी ही आगळीवेगळी वटपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली. शहरातील गवळदेव येथे पुरुषवर्गाने मोठ्या उत्साहात वटपौर्णिमा साजरी केली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ येथे गेली नऊ वर्षे पुरुष मंडळी एकत्र येत आगळ्यावेगळ्या पद्धतीने वटपौर्णिमा साजरी करीत अनोखी प्रथा जोपासत आहेत. महिला जशी जन्मोजन्मी हाच पती मिळावा अशी प्रार्थना करतात तशीच प्रार्थना पुरुषांनी हीच पत्नी मिळावी यासाठी केली.
पत्नीला निरोगी आयुष्य लाभावे अशी प्रार्थनाही पुरुषांनी केली. कुडाळ येथे बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उमेश गाळवणकर व प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. संजय निगुडकर यांच्या संकल्पनेतून आलेली पुरुषांची वटपौर्णिमा नऊ वर्षे पुरुष मंडळी वडाला फेऱ्या घालून साजरी करीत आहेत.
यंदाही कोरोना या आजाराचे संकट घोंगावत असताना सोशल डिस्टंन्सिंगचे नियम पाळून उत्साहात महिलांप्रमाणेच पुरुषवर्गाने वटपौर्णिमा साजरी केली.
उमेश गाळवणकर म्हणाले, स्त्रीच्या साथीशिवाय, तिच्या त्यागाशिवाय पुरुष आपली प्रगतीची वाट चोखाळू शकत नाही. ती समर्थपणे संसार सांभाळते म्हणूनच पुरुष आपले कर्तृत्व सिद्ध करु शकला आहे. तिच्या या योगदानाचा गौरव म्हणजेच हे पुरुषांच्या वटपौणिमेच्या सणाचे आयोजन होय. अशा सणांना सर्व समाजाची साथ असणे महत्त्वाचे आहे.
याप्रसंगी बॅ. नाथ पै महिला महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य अरुण मर्गज म्हणाले, ह्यस्वामी गौरवार्थ अमृतह्ण असं म्हणत संसार करणारी स्त्री पुरुषाच्या प्रति किती निष्ठावान असते. हे लक्षात घेऊन ती निष्ठा आणि तिच्याबद्दलचा श्रद्धाभाव अशा उपक्रमातून आपण हाती घेऊन तो वाढीस लावला पाहिजे. पुरुषांच्या बरोबरीने समाजात असणारे स्त्री चे महत्त्व प्रतिपादन केले.
यावेळी डॉ. व्यंकटेश भंडारी, परेश धावडे, प्रा. नितीन बांबर्डेकर, किरण करंदीकर, पांडुरंग पाटकर, प्रसाद परब, रोशन राऊळ, प्रसाद कानडे, प्रितम वालावलकर, किरण सावंत, संतोष पडते, सुरेश वरक, बळीराम जांभळे. प्रसाद राणे आदींसह अनेक पुरुष मंडळी उपस्थित होती. गेली ९ वर्षे उमेश गाळवणकर यांच्या संकल्पनेतून कुडाळमध्ये हा उपक्रम वटपौर्णिमेच्या दिवशी सातत्याने राबविण्यात येत आहे. त्यामुळे त्याचे कौतुकही होत आहे.
उमेश गाळवणकर यांच्या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर : निगुडकर
डॉ. संजय निगुडकर म्हणाले, पुरुष आपली विविध क्षेत्रे स्वयंसिद्ध करत असताना स्त्रीची साथ महत्त्वाची असते. स्त्री जर जन्मोजन्मी हाच पती मिळावा अशी प्रार्थना करून वडाला फेऱ्या मारत असेल तर पुरुषांनी सुद्धा घरची जबाबदारी सांभाळून स्त्री समर्थपणे साथ देते म्हणून आपल्याला कार्य करायला मोकळीक मिळते हे लक्षात घेतले पाहिजे. अशी पत्नी जन्मोजन्मी आपल्याला सहचारिणी मिळावी यासाठी हे व्रत करणे आवश्यक असल्याचे नमूद केले.
बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर यांनी नऊ वर्षांपूर्वी पुरुषांच्या वटपौर्णिमेचे लावलेले रोपटे आता दिवसेंदिवस भव्य रूप धारण करत आहे, हे आजच्या संसारामध्ये पुरुषांच्या बरोबरीने स्त्रीचे महत्त्व वाढत असल्याचे द्योतक आहे. समाजाने अशा उपक्रमाच्या पाठीशी राहून हे उपक्रम जास्तीत जास्त दूर देशी पोहोचण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे सांगत या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या व कौतुकही केले.