भराडीदेवीच्या दर्शनाला जनसागर लोटला
By admin | Published: February 8, 2015 12:56 AM2015-02-08T00:56:10+5:302015-02-08T01:00:39+5:30
लाखोंनी नवस फेडले : विनोद तावडे, दीपक केसरकर यांच्यासह राजकीय नेत्यांची हजेरी; आज मोडयात्रेने सांगता होणार
चौके : दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि लाखो भक्तांच्या नवसाला पावणाऱ्या भराडीदेवीच्या यात्रोत्सवास शनिवारी थाटात प्रारंभ झाला. राज्याच्या विविध भागांतून आलेल्या लाखो भाविकांनी भराडीदेवीचे दर्शन घेऊन नवस फेडले. त्यामुळे संपूर्ण आंगणेवाडी परिसर भराडीदेवीच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता.
राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे, पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर, खासदार विनायक राऊत, खासदार राजन विचारे, खासदार अरविंद सावंत, आमदार वैभव नाईक, आमदार विजय सावंत यांच्यासह विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी भराडीदेवीच्या यात्रोत्सवाला हजेरी लावत देवीचे दर्शन घेतले.
महाप्रसाद खास आकर्षण
आंगणेवाडीतील गृहिणींनी दिवसभर उपवास करून बनविलेल्या महाप्रसादाची ताटे रात्री साडेदहाच्या सुमारास मंदिरात आणून देवीला नैवेद्य दाखविल्यानंतर त्या प्रसादाचे वाटप आंगणेवाडी महिला भगिनी व कार्यकर्ते दर्शनासाठी उभारण्यात आलेल्या ओव्हरब्रीजवरून करतात. हा प्रसाद मिळविण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने गर्दी करतात. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस यंत्रणेने चोख बंदोबस्त ठेवला होता.
आज मोडयात्रेने सांगता
दीड दिवस साजरा होणाऱ्या या यात्रोत्सवाची सांगता आज, रविवारी मोडयात्रेने होणार आहे. मोडयात्रेमध्ये खास करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि स्थानिक ग्रामस्थ दर्शन घेतात. त्यामुळे आज, रविवारी सायंकाळपर्यंत यात्रोत्सवाची सांगता होणार आहे.
पहाटेपासूनच दर्शनासाठी गर्दी
आंगणेवाडीच्या भराडीदेवीचे दर्शन घेण्यासाठी यात्रोत्सवात पहाटे अडीच वाजल्यापासून दर्शनरांगा लागल्या होत्या. यात्रोत्सवात मालवणकडून येणाऱ्या भाविकांसाठी आणि कणकवलीकडून येणाऱ्या भाविकांसाठी वेगवेगळ्या दर्शनरांगा लावण्यात आल्या होत्या. या रांगांमधून भाविकांनी भराडीदेवीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती.
नऊ रांगांतून दर्शन
यात्रोत्सवाच्या निमित्ताने देवीचे दर्शन सुलभतेने व्हावे यासाठी यावर्षी नऊ ठिकाणांहून दर्शन व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे भाविकांना सुलभतेने दर्शन होत होते. गतवर्षी दर्शनाच्या सहा रांगा होत्या. यावर्षी तीन रांगा वाढविण्यात आल्याने मोठ्या रांगा लागलेल्या दिसत नव्हत्या. मंदिराभोवती व मंदिरामध्ये क्लोज सर्किट कॅमेऱ्यांद्वारे नियंत्रण ठेवण्यात आले होते. राजकीय व्यक्ती व अती महनीय व्यक्तींसाठी खास व्यवस्था करण्यात आली होती.
४आंगणेवाडी ग्रामविकास मंडळ मुंबई व स्थानिक, पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन, जिल्हा परिषद आरोग्य विभाग तसेच सर्व प्रशासकीय यंत्रणेने चोख व्यवस्था पार पाडल्याने यात्रोत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही.
४आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळातर्फे नरेश आंगणे, मंगेश आंगणे, भास्कर आंगणे, आनंद आंगणे व इतर आंगणे कुटुंबीय येणाऱ्या भाविकांचे आणि महनीय व्यक्तींचे स्वागत करत होते.